Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 May
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०७ मे
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
दहशतवादाचा पराभव करण्याच्या
आणि त्याला पोषक ठरणारी परिसंस्था मोडून काढण्याच्या आपल्या निर्धारावर देश ठाम असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त
समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी हा निर्धार व्यक्त केला. ऑपरेशन सिंदूरदरम्यान
भारतीय सैन्य दलांनी अतुलनीय शौर्य, अचूकता आणि दृढनिश्चयाचं प्रदर्शन
केलं. पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांवर हल्ला करण्याचं धाडस करणाऱ्यांना सैन्यदलांनी
चोख प्रत्युत्तर दिलं असून संपूर्ण देश सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करतो, असं मोदी म्हणाले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
यांनी देशाच्या सशस्त्र दलांच्या शौर्याची आणि त्यागाची प्रशंसा केली आहे. देशाच्या
सशस्त्र दलांचं शौर्य आणि समर्पण राष्ट्राचं रक्षण करत आहे. या ऑपरेशनदरम्यानच्या कृतीतून
अतुलनीय अचूकता, अखंड संयुक्तता आणि सर्व दलांमधील समन्वय दिसून आला असून, त्यामुळं आधुनिक लष्करी कारवायांसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला असल्याचं राजनाथ
सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
ऑपरेशन सिंदूर ही भारताची युगप्रवर्तक
मोहीम आहे. ही मोहीम, देशाच्या शत्रूंना सशस्त्र
दलांच्या अचूक प्रहारशक्तीची नेहमीच आठवण करून देईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पश्चिम बंगालमधील नवनिर्वाचित भाजप सरकारचा शपथविधी
सोहळा रवींद्र जयंतीच्या दिवशी, येत्या शनिवारी ९ तारखेला कोलकाता
इथं पार पडेल. शनिवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र
मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री
उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला
नाही, तर हा कार्यक्रम घटनात्मक नियमांनुसारच पार पडेल. राज्य
भाजप अध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी काल
राज्य सचिवालय नबन्ना इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सोहळ्याच्या तयारीवर आणि निवडणुकीनंतरचा
संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली. शमिक भट्टाचार्य, पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उद्या आपला संसदीय नेता निवडण्यासाठी बैठक घेतील.
****
केंद्र सरकारनं हरभरा खरेदीची
मुदत २९ मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे निर्धारित
कालावधीत विक्री न करू शकलेल्या
शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा
लाभ घेता येणार आहे. दरम्यान तूर खरेदीला ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खरेदीनंतर
शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ रक्कम जमा केली जात असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी
म्हटलं आहे.
****
राज्यातील आदिवासी तसंच दुर्गम
भागांतील आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास
करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली
सेठी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यास सरकारनं मंजूरी
दिली आहे. काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून त्यानुसार ही समिती पुढील
तीन वर्षांसाठी कार्यरत राहणार आहे. ही समिती राज्यातील सर्व १६ आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी
कार्य करणार असून, आरोग्य सेवा, पोषण, सिकलसेल नियंत्रण, मनुष्यबळ उपलब्धता, आंतरविभागीय समन्वय यांसारख्या विषयांवर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेचा नियमित आढावा
घेणार आहे.
****
प्रशासकीय पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा
प्रभावी वापर यामुळं नांदेड जिल्हा नोंदणी आणि मुद्रांक विभागाने २०२५-२६ या आर्थिक
वर्षात जिल्ह्यातील १८ सह दुय्यम निबंधक कार्यालयांच्या माध्यमातून तब्बल ६५ हजार ६७४
दस्तांची नोंदणी केली असून याद्वारे शासनाला २२१ कोटी ४३ लाख रुपयांचा महसूल मिळाला
आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी ही माहिती दिली. कार्यालयात येणाऱ्या
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी कार्यालयात एक विशेष
कक्ष तयार करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
रायगड जिल्ह्यात माणगाव इथं
काल झालेल्या भीषण रस्ता अपघातात तीन जण ठार झाले. माणगाव बाजारपेठेत भरधाव वेगात येणाऱ्या
टेम्पो ट्रॅव्हल्सचं नियंत्रण सुटलं. या टेम्पो ट्रॅव्हल्सने प्रथम सायकलला धडक दिली, नंतर दोन पादचाऱ्यांना चिरडलं. त्यानंतर दुचाकी आणि एका पोलीस जीपलाही धडक दिली.
या अपघातात तीन जण जागीच ठार झाले.
****
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या
सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था एमएसएफडीए च्या नवीन सुधारित संकेतस्थळाचं लोकार्पण उच्च तथा तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
यांच्या हस्ते काल करण्यात आलं. एमएसएफडीए ही संस्था राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील
अध्यापक आणि शैक्षणिक नेतृत्व यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून, गुणवत्ता वृद्धी, क्षमता विकास आणि शैक्षणिक
उत्कृष्टतेसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबवत आहे. www.msfda.ac.in या संकेतस्थळाद्वारे एमएसएफडीए च्या
सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment