Saturday, 9 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ मे २०२ सकाळी.०० वाजता

****

पश्चिम बंगालचे नववे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी थोड्याच वेळात शपथ घेणार आहेत; कोलकाता इथल्या ऐतिहासिक 'ब्रिगेड परेड ग्राउंड'वर या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. याच शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नुकतच आगमन झालं असून भाजपचे वरिष्ठ नेते देखील सहभागी होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप प्रथमच आपली सत्ता स्थापन करत आहे.

****

निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीडीएस, जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ ३० मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन. एस. राजा सुब्रमणी, जनरल अनिल चौहान यांची जागा घेतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी १ सप्टेंबर २०२५ पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत.   

व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन् यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलातील कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास चार दशकांचा अनुभव आहे.  ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या जागी ही नेमणुक करण्यात आली आहे. 

****

एल् निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊसमान कमी होण्याची शक्यता गृहीत धरून, राज्यातली जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल वर्षा निवासस्थानी जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा आढावा बैठकीत ते बोलत होते.

भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून अशा ठिकाणी भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जलयुक्त शिवार-२ अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तींच्या कामांची निकड पाहून ही कामं आराखड्यात समाविष्ट करून तातडीनं पूर्ण करावीत तसंच, जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे येत्या १५ मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले.

****

राज्यातील सर्व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. ही खरेदी केंद्रं पोर्टल बंद केल्यानं रब्बी हंगामातील हरभरा खरेदी प्रक्रिया बंद पडलेली आहे. याबाबत पाथ्रीचे आमदार राजेश विटेकर यांनी पणन मंत्री रावल यांची भेट घेऊन ती सुरू करण्याबाबत विनंती केली होती. या निर्णयामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात  हरभरा उत्पादक शेतकरी वर्गाची संख्या १ लाख ९७ हजार ३२५ इतकी आहे, दरम्यान, तूर खरेदी प्रक्रियेलाही राज्यशासनाने मुदतवाढ दिली आहे. यासाठीच्या पूर्व नोंदणीची अंतिम मुदत २५ मे २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली असून प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया ३१ मे २०२६ पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात तूर पिकाची लागवड करणाऱ्या सुमारे ७४ हजार ६०४ शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातील शंभर वर्षांहून अधिक काळ बंद असलेला, असोला–मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयसिंह चव्हाण यांनी काल दिले. हा रस्ता खुला झाल्यामुळं ग्रामस्थांची दीर्घकालीन अडचण दूर होऊन वाहतूक, शेतीमालाची ने-आण आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, विविध स्तरांवरील दबावांना सामोरं जात आणि मर्यादित साधनस्रोतांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

****

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ  अधिनियम –‘पॉश’ कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागाने दिले आहेत. दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये, अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून, पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे.

****

लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेनं १ कोटी १८ लाख २७ हजार रुपयांच्या अंमली पदार्थांचा काल कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं नाश केला. यात सुमारे ७१३ पूर्णांक ९२ किलो गांजा, २१ पूर्णांक २०० किलो अफू आणि ९६ ग्रॅम एमडी ड्रग्जचा समावेश होता. 

****

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...