Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जुलै २०२६ सायंकाळी
६.१०
****
· प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी;खेलो इंडिया योजनेच्या विस्तारालाही मान्यता
· अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून वास्तविकतेचं भान होत असल्याचं
मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
· बीड-पुणे रेल्वे सेवा १७ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यासाठी प्रयत्नशील-उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांची ग्वाही
· छत्रपती संभाजीनगर इथं दुध डेअरीवर कारवाई-भेसळयुक्त पदार्थांचा
साठा जप्त-परवाने निलंबित
आणि
· हिंगोली जिल्ह्यात ३० पैकी २७ मंडळांमध्ये अतिवृष्टी;छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट
****
प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी
दिली आहे. आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी सुमारे पाच हजार
७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यातून
तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प विकासित केले जाणार आहेत.
‘खेलो इंडिया’ योजनेचा विस्तार करण्यास तसंच राष्ट्रीय
क्रीडा महासंघांना दिल्या जाणाऱ्या सहाय्यात वाढ करण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने
आज मंजुरी दिली. यासाठी २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीत एकूण ३६ हजार ४४१ कोटी रुपयांची
तरतूद केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले -
बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
****
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे
आजही बाधित झालं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीने सभागृहाच्या कामकाजात
व्यत्यय आणत असल्याची टीका लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी केली. विरोधकांचा गोंधळ
सुरूच राहिल्यानं आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज
तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेचं कामकाजही गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित झालं.
दरम्यान, राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी
समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं.
महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच एमएसीईटी परीक्षेत
घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात
निदर्शनं केली.
****
दुबई तसंच सिंगापूरच्या धर्तीवर राज्यात ‘लॅण्ड टायटलिंग कायदा’
लागू करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे इथं एका कार्यक्रमात
बोलतांना ही माहिती दिली.
या कायद्यानुसार मालमत्ताधारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल
तसंच प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ दिलं जाईल. याशिवाय, ‘आधी मोजणी,
नंतरच नोंदणी’ हा नियम लागू करण्यात येणार आहे. असा कायदा करणारं
महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल, असंही बावनकुळे यांनी
सांगितलं.
****
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून वास्तविकतेचं भान
होत असल्याचं,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत, चिरागनगर घाटकोपर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या
‘लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’ तसंच स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.
अण्णाभाऊंच्या साहित्याबाबत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले -
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पुणे
दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना शहा
यांच्या हस्ते उद्या १ ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या
हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
****
महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे
करत असून,
मनोज जरांगे यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. वेळ पडली
तर,
त्यांची भेट घेऊन समाधान करू, अशी
स्पष्ट भूमिका जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष डॉ.राधाकृष्ण विखे
पाटील यांनी मांडली आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा
आंदोलनाच्या दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मंत्री
विखे पाटील आज माध्यमांशी बोलत होते. राज्यात प्रथमच स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन
करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीयांप्रमाणे
शैक्षणिक सवलती तसंच सोयीसुविधा देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी सुरू असल्याकडे विखे पाटील यांनी यावेळी लक्ष वेधलं.
****
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात असून
१७ सप्टेंबरपर्यंत बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. त्या आज
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या -
बाईट - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
२०२६-२७ या वर्षासाठी बीड जिल्ह्याच्या ६२३ कोटी रुपयांच्या
जिल्हा वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून विविध विकासकामांना गती देण्याचे
निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री
वैद्यकीय सहायता कक्षाचं पालकमंत्री पवार यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा
रुग्णालयात अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकेचं लोकार्पणही पालकमंत्र्यांच्या हस्ते
करण्यात आलं. या सुविधेमुळे आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनाने चिकलठाणा परिसरात
एका दूध डेअरीवर छापा टाकून तीन लाख १२ हजार ३८० रुपयांचा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा
साठा जप्त केला. यामध्ये साडे नऊशे किलो तूप, क्रीम
आणि रिफाइंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे. शहरातील लक्ष्मी डेअरीच्या तीन विक्री केंद्रांवरही
कारवाई करण्यात आली असून, दूध डेअरीचा परवाना तात्काळ
निलंबित करून उत्पादन संच बंद करण्यात आले आहेत. तसंच जप्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
पाठवण्यात आले आहेत.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं
आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. या योजनेत पहिल्या यादीत जिल्ह्यातील
४७ हजार ८८६ शेतकऱ्यांचा समावेश असून लवकरच दुसरी यादी प्रसिद्ध होणार असून त्यात सुमारे
५१ हजार शेतकऱ्यांची नावं समाविष्ट असतील असं जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितलं.
****
ठाणे जिल्ह्यात भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातल्या गंगाराम वाडी
परिसरात काल रात्री चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख
रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन
यांनी केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी
असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तत्काळ गुन्हा
दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस कोसळला. २४ तासांत
जिल्ह्यात सरासरी १०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, ३०
पैकी तब्बल २७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे
कयाधू नदीला पहिल्यांदाच पूर आला आहे. शेतशिवारांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचंही प्रचंड
नुकसान झालं आहे. आज सकाळपासूनही हिंगोली जिल्हाभरात पावसाची संततधार सुरूच आहे.
***
छत्रपती संभाजीनगर इथंही पावसाची संततधार सुरू आहे.
राज्यात उत्तर महाराष्ट्र तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या
घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज जोरदार पावसाचा ऑरेंज
अलर्ट देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे आणि मराठवाड्यात बीड तसंच
जालना जिल्ह्याला आणि संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पैठणच्या जायकवाडी धरणातील जलसाठा
७५ टक्क्यांहून अधिक झाला आहे.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय
स्तरावरील राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’ २०२६ मध्ये १०० पैकी ९२ पूर्णांक ५ गुण
मिळवत देशात १२ वा क्रमांक पटकावला आहे. ‘ग्रीन मेंटर्स’ या संस्थेच्या वतीने राबवण्यात
येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशातील आयआयटी, एनआयटी,
ट्रिपल आय टी, केंद्रीय विद्यापीठं
तसंच अन्य प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थांचा सहभाग आहे.
****