Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जुलै २०२६ सायंकाळी
६.१०
****
·
सरकारने सदनात दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका चालू अधिवेशन
संपेपर्यंत काढण्याचे विधानसभाध्यक्षांचे आदेश
·
आरटीओतल्या कथित गैरप्रकरणांची उच्चस्तरीय चौकशीअंती कारवाई-सरकारचं
आश्वासन
·
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींची फाशी गुजरात उच्च
न्यायालयात कायम
आणि
·
नाशिक जिल्ह्यातलं ढगफुटीचं संकट टळलं;अनेक भागात अतिवृष्टी; जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू
****
राज्य
सरकारने आत्तापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या
परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी,
असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी
आज दिले. १७ डिसेंबर २०१५ रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण
मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा
अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष
पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा, असंही त्यांनी सरकारला सांगितलं.
****
राज्यात
सध्या सुमारे साडेचार लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी
त्यांच्यावर कारवाई करत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत
दिली. भविष्यात अशा बाईक टॅक्सींद्वारे तरुणांना रोजगार मिळण्यासोबतच सरकारलाही महसूल
मिळावा यासाठी या बाईक्सकडून प्रतिदिन पाच रुपये महसुलापोटी आणि प्रति राईड दोन टक्के
रक्कम जनकल्याण निधी म्हणून घेण्याची सरकारची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या
एक ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र
सक्तीचं केलं जाणार असल्याचंही परिवहनमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्याच्या
प्रादेशिक परिवहन कार्यालय-आरटीओ विभागातल्या कथित गैरव्यवहार,
कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणांची
उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं.
सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात वरिष्ठ
आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक -एसआयटी स्थापन
करण्यात आलं असून, या
पथकाला एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचं परिवहन मंत्री सरनाईक
यांनी सांगितलं. ते म्हणाले -
बाईट - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या कचरा व्यवस्थापनासंदर्भात पुढच्या आठवड्यात महापालिकेत बैठक घेणार
असून, हा
मुद्दा मार्गी लावण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. त्या आज
विधान परिषदेत माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर
बोलत होत्या. पडेगाव इथल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला
जात असून, शास्त्रोक्त
पद्धतीने प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड झाल्याचा
आरोप दानवे यांनी केला. या प्रकल्पाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,
तसेच साठलेला कचरा कालबद्ध पद्धतीने
हटवण्याची मागणी दानवे यांनी केली. यासंदर्भात बोलतांना मुंडे यांनी,
या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावर पुढील
वर्षी जून महिन्यापर्यंत शास्त्रोक्त प्रक्रिया पूर्ण होईल,
असं सांगतानाच,
दोषींवर कारवाईचं सुतोवाचही त्यांनी
केलं. त्या म्हणाल्या -
बाईट - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
****
कर्नाटक
राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याची पडताळणी
करावी, अशी
मागणी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी आज सरकारकडे केली. त्यासाठी महाधिवक्त्यांच्या
माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.
याबाबत कायदेशीर बाबी तपासू, असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिलं.
****
अहमदाबाद
इथे २००८ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशी तर इतर ११ जणांना
जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे.
विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले.
२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये ७० मिनिटांत २१ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात
५६ जणांचा मृत्यू झाला होता तर २०० जण जखमी झाले होते.
****
नाशिक
जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात संभाव्य
ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली. इगतपुरी आणि परिसरात
सुमारे दोनशे मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. इगतपुरीतल्या काही रहिवाशांचं स्थलांतर करावं
लागलं. या पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा, भावली, मुकणे, काश्यपी, गौतमी, कडवा, पालखेड या धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून,
नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे
अकरा हजार एकोणऐंशी दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी मराठवाड्याच्या दिशेनं येत
आहे. परिणामी पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा अठ्ठावीस टक्क्यांवर गेला आहे. धरणात
सध्या एक हजार तीनशे चव्वेचाळीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. छत्रपती
संभाजीनगर इथे गेल्या चोवीस तासात १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
****
अहिल्यानगर
जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या भागात पावसाळी पर्यटनाला
प्रशासनाने बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखर, आदी ठिकाणं पुढील आदेशापर्यत पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत.
नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातले अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान,
काल दरड पडल्याने बंद झालेली,
मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वरची वाहतुक
सुरळीत सुरू झाली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना मुंबई पुणे महामार्ग
देखील सुरळीत सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्हा हद्दीतली वाहतूकही सुरू
करण्यात आली आहे.
****
रत्नागिरी
जिल्ह्यात खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये काल रात्री दरड कोसळून ठार झालेल्या व्यक्तींच्या
वारसांना शासनातर्फे तातडीनं चार लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज खेड, चिपळूणमध्ये पाहणी दौरा केल्यानंतर ही माहिती दिली.
****
विशेष
सखोल पुनरिक्षण-SIR अंतर्गत
नांदेड जिल्ह्यात बूथस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गणना पत्रकं भरण्याची प्रक्रिया
सुरू आहे. विहित मुदतीत पूर्ण होणाऱ्या या प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार
नाही, अशी
ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. ते म्हणाले -
बाईट - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
****
श्री
संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान
केलं. तुकाराम महाराजांचा हा तीनशे एक्केचाळीसावा पालखी सोहळा आहे. उद्या पालखी पिंपरी-चिंचवडकडे
मार्गस्थ होणार आहे.
****
नांदेडहून
दुपारी साडेतीन वाजता सुटणारी हजूर साहिब नांदेड – हडपसर एक्सप्रेस आज रात्री साडेनऊ
वाजता नांदेडहून सुटणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याचं आवाहन दक्षिण मध्य
रेल्वेनं केलं आहे.
****
भारत
आणि इंग्लंड संघात तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या
या मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना यजमान इंग्लंड संघाने जिंकला आहे. मालिकेतले
पुढचे दोन सामने नऊ तसंच ११ जुलैला होणार असून, त्यानंतर उभय संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार
आहे.
****
नांदेडमध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने निळा रस्त्यावर दोन गावठी
पिस्तूल जप्त केले. याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगी
अपहाराच्या निषेधार्थ लातूर शहर जिल्हा
काँग्रेस कमिटीच्या वतीने आज लातूर इथं
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके
यांच्या नेतृत्वाखाली ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment