Tuesday, 7 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश - मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

·      मुंबई, कोकण आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, मराठवाड्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा

·      यंदा आषाढी वारीत देहू-आळंदीऐवजी पुण्यातून सहभागी होण्याचा वारकऱ्यांना सल्ला

आणि

·      नांदेड–मुंबई तसंच नांदेड-टनकपूर या दोन गाड्यांना प्रारंभ

****

संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात एक बैठक घेऊन त्यांनी, पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तसंच संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याचा आढावा घेतला. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं रवाना करण्यात यावीत, आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळेल, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईसह कोकणातले सर्व जिल्हे, पालघर तसंच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसराला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि बुलडाण्यासह विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या चार दिवसात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.

पालघर जिल्ह्यात काल २०० नागरिकांचं तातडीने स्थलांतर करण्यात आलं, तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या ४५ जणांची सुटका करण्यात आली.

पुणे जिल्ह्यात आळंदी इथं पुराच्या वेढ्यात अडकलेल्या चारशेहून अधिक भाविकांची सुटका करण्यात आली. इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या इतर भाविकांसह १५० गायींचीही सुटका करुन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.

इंद्रायणी नदीवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदीला येण्याऐवजी वारकऱ्यांनी १० जुलैला पुण्यातून वारीत सहभागी व्हावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ते म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहुतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहेत.

**

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, अहिल्यानगरसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यांमध्ये आजही शाळा–महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.

**

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. जालना शहरासह परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून, धाराशिव जिल्ह्यातही संततधार सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. बीड जिल्ह्यातल्या लहान-मोठ्या एकूण १७३ धरणांमध्ये सध्या फक्त १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातले तब्बल ८१ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून, ७९ प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत.

****

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीला आठ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवेश फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.

****

राष्ट्रीय परीक्षा संस्था - एनटीए ने नीट युजी २०२६ परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत आठ लाख २९ हजार ५१० विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली असून, त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाली आहे. तीन मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्यानं हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत दिलं जातं आहे.

****

नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड एक्सप्रेस या दोन गाड्यांना काल प्रारंभ झाला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तर नांदेड रेल्वे स्थानकावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार  रवींद्र चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. नांदेड-टनकपूर गाडीमुळे नांदेडचा उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क स्थापित होईल तसंच पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल असं वैष्णव यांनी यावेळी नमूद केलं. ते म्हणाले…

बाईट- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

****

मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे विभाग करण्याची मागणी खासदार संदिपान भुमरे यांनी केली आहे. काल नांदेड इथं दक्षिण मध्य रेल्वे विभागाची वार्षिक आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आपण मांडत असलेल्या मुद्यांवर दक्षिण मध्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने, ही मागणी केल्याचं भुमरे यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणाच्या सूर्यरथाला खासदार भुमरे यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. हा सूर्यरथ पुढील सात दिवस शहरातल्या प्रमुख बाजारपेठा आणि निवासी वस्त्यांमध्ये फिरणार आहे. सूर्यघर योजनेची माहिती देण्यासाठी आजपासून पुढील १० दिवस क्रांती चौक उड्डाणपुलाखाली विशेष बूथ उभारला आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचा २०२६ चा भगवंत देशमुख वाङ्गमय पुरस्कार पुण्याच्या साहित्यिक कल्पना धुमाळ यांच्या जारवा या ललितलेख संग्रहाला जाहीर झाला आहे. तर संध्या देशमुख-मुळे उत्कृष्ट ग्रंथालय तथा ग्रंथपाल पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा वाचनालयाची निवड झाली आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्काराचं स्वरुप आहे. भगवंत देशमुख यांच्या जन्मदिनी येत्या पाच ऑगस्टला हे पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथं प्रदान केले जाणार आहेत.

****

पंढरपूरकडे निघालेल्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या पालखीतला पहिला रिंगण सोहळा काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर साजरा झाला. या रंगलेल्या अश्वरिंगण सोहळ्याला स्थानिक भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

**

आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेली अंधांची वारी काल परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड मार्गे परळी वैजनाथकडे मार्गस्थ झाली. ही दिंडी सात जूनला वाशिमहून निघाली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथून संत श्री एकनाथ महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

****

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रहितासाठी केलेला त्याग हा सर्वोच्च असून, त्यांचं जीवन देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श असल्याचं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे केलं आहे. मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काल जालना इथं, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी विचारमंचच्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात बागडे बोलत होते. मुखर्जी यांच्या विविध कार्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

****

धाराशिव जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी महत्वाच्या विविध ४५ प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं असल्याचं, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं असून, त्यासाठी विकासकामांना निर्धारित वेळेत अधिक गती देण्यासाठी 'फ्लॅगशिप प्रकल्प मॉनिटरिंग' मॉड्युल तयार करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.

****

अनुसूचित जात आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अनुसूचित जाती संघटनांच्या वतीने लातूर शहरात काल मोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजाच्या घटनात्मक अधिकारांवर परिणाम होणार असल्याची भूमिका मांडत आंदोलकांनी प्रशासनाकडे हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीचं निवेदन सादर केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथं क्यूआर कोड युक्त पासने प्रवेश मिळणार असल्याचं अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितलं. या रुग्णालयात दररोज दोन ते अडीच हजार रुग्णांचा राबता असतो. वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये सातत्याने वादाचे प्रसंग निर्माण होतात. हे टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असून, सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन सुक्रे यांनी केलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 July 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...