Wednesday, 1 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जुलै २०२ सकाळी.०० वाजता

****

व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात तेल विपणन कंपन्यांनी १८३ रुपये ५० पैशांची कपात केली आहे. आजपासून हे नवीन दर लागू झाले. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे तसंच खाद्यपदार्थ आणि पेय व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असून, इंधन खर्च देखील कमी होण्यास मदत मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

विकसित भारत रोजगार आणि उपजिविका हमी ग्रामीण कायदा २०२५ म्हणजेच व्ही बी जी राम जी कायदा आजपासून लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात १२५ दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयाने व्यक्त केला आहे. हा कायदा लाखो ग्रामीण मजुरांसाठी प्रतिष्ठा, आत्मसन्मान आणि उपजीविका सुनिश्चित करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. यामुळे गावांमध्ये उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण होतील, मालमत्ता निर्मितीला गती मिळेल, महिला सक्षम होतील आणि आत्मनिर्भर ग्रामीण भारताचे ध्येय साध्य करण्यास मदत होईल, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

डिजिटल इंडिया मोहिमेला आज ११ वर्ष पूर्ण झाली. या मोहिमेच्या यशाने देशाला जगभरात एक नवी ओळख मिळवून दिली, नाविन्य आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करून देशाला नव्या उंचीवर नेण्याचा देशवासियांचा संकल्प यातून दिसून येतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस आज साजरा होत आहे. प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त पंतप्रधानांनी देशभरातल्या डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टरांची अथक मेहनत, सेवाभाव, करुणा आणि रुग्णांप्रती असलेली निष्ठा ही भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ असल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या दशकात भारतानं आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली, वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुपटीहून अधिक वाढली, तर एमबीबीएस आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातल्या जागांमध्येही मोठी वाढ झाली आहे. यामुळे नव्या डॉक्टरांना अधिक संधी उपलब्ध होत असून देशाची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

चार्टर्ड अकाउंटंट्स अर्थात सनदी लेखापाल दिनानिमित्तही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहे. भारतातील आर्थिक प्रगतीच्या प्रवासात चार्टर्ड अकाउंटंट्स हे विश्वासार्ह भागीदार म्हणून सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

****

राज्यातले हरितक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषिदिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांना अभिवादन केलं आहे. अपार कष्टातून धरणी मातेला समृद्ध करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या समस्त शेतकरी बांधवांना कृषिदिनाच्या शुभेच्छा देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी आणि दिंडी मार्गावरील सोयी-सुविधांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पालखी मार्गावरील समन्वयासाठी जिल्ह्यात एका नोडल अधिकार्याची नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्हा पोलीस दलातल्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिले आहेत. उमरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुनील कोलबुद्धे आणि चालक महंमद आवेज मोहम्मद मोईज हे दोघे उमरी ते धर्माबाद रस्त्यावर कर्तव्य बजावत असताना त्यांचं वर्तन गंभीर, गैरशिस्तीचं आणि आक्षेपार्ह असल्याचं दिसून आल्यानं ही कारवाई करण्यात आली.

****

नाशिकच्या टीसीएस कंपनीतल्या धर्मांतर तसंच लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान, तौसिफ अत्तार तसंच दानिश शेख यांच्या जामीन अर्जावर काल नाशिकरोड न्यायालयात अंतिम सुनावणी होऊ शकली नाही. यावर आता सहा जुलैला अंतिम निकाल देण्यात येणार आहे.

****

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीविरोधात कृषी विभागाने पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर इथं काल विशेष मोहिम राबवली. यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या १०७ खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले असून, सहा परवाने रद्द तसंच सात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनुदानित युरियाचा औद्योगिक वापर रोखण्यासाठी पुणे विभागातल्या ४२ औद्योगिक युनिट्सचीही तपासणी करण्यात आली.

****

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात काल मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून हजारो नागरिक सहभागी झाले होते. आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 July 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...