Friday, 17 July 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.07.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      देशातल्या ७५ पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; महाराष्ट्रातल्या दोन स्थानकांचा समावेश

·      शून्य कार्बन उत्सर्जन असलेल्या हायड्रोजन रेल्वेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात नव्या पर्वाला प्रारंभ

·      ओला तसंच उबेर सारख्या कंपन्यांना प्रवाशांकडून अतिरीक्त भाडे घेण्यावर निर्बंध;कार पूलिंगमधून नफेखोरीवर बंदी 

·      ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला एमपीएससी कडून स्थगिती

आणि

·      जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू उपांत्य फेरीत दाखल

****

अमृत भारत योजनेत देशातल्या ७५ पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. पंजाबात जालंधर इथे झालेल्या या समारंभात बोलतांना पंतप्रधानांनी, ही रेल्वे स्थानकं, आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचं दर्शन घडवत असल्याचं सांगितलं. आज लोकार्पण झालेल्या या ७५ रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातल्या नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यापूर्वी हरियाणात जिंद इथं पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -

हरियाणात जिंद आणि सोनीपत स्थानकादरम्यान शून्य कार्बन उत्सर्जन असलेली देशातली पहिली हायड्रोजन रेल्वे धावली, आणि भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात एका नव्या पर्वाला प्रारंभ झाला. जिंद रेल्वेस्थानकावर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतांना पंतप्रधान म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

ताशी ७५ ते कमाल ११० किलोमीटर वेगाने धावू शकणारी ही रेल्वेगाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेची माहिती देतानाच पंतप्रधानांसह देशवासियांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले -

बाईट – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

 

ही हायड्रोजन रेल्वेगाडी १० डब्यांची असून त्यातून एकावेळी अडीच हजार प्रवासी प्रवास करू शकतात. हिमाचल प्रदेशात कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हंटलं आहे.

****

केंद्र सरकारने राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी कायदा २०२२ आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी सुधारणा कायदा २०२५ लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. हा कायदा खेळांमधील उत्तेजक द्रव्यांच्या वापराला प्रतिबंध करण्यासाठी, खेळाडूंच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारल्या गेलेल्या उत्तेजक द्रव्य विरोधी मानकांनुसार क्रीडा स्पर्धांची निष्पक्षता राखण्यासाठी एक व्यापक आधार ठरणार आहे. या कायद्यामुळे संस्थात्मक स्वायत्तता बळकट होईल, सुरक्षा उपाय वाढतील, वाद निवारण यंत्रणा सुलभ होईल आणि भारताच्या उत्तेजक द्रव्य विरोधी कार्यक्रमाची विश्वासार्हता आणि परिणामकारकता अधिक बळकट होईल.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आगामी संसदीय अधिवेशनाच्या धोरणावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने परवा रविवारी संसदेतील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं, यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी २० तारखेपासून सुरू होऊन पुढील महिन्याच्या १३ तारखेपर्यंत चालणार आहे.

****

ओला, उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरापेक्षा अवास्तव दरकपात किंवा अतिरीक्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं लागू केलं आहे. त्यात ही तरतूद आहे. प्रवाशांकडून घेण्यात येणाऱ्या सुविधा शुल्कावरही या धोरणात मर्यादा घालण्यात आली आहे. चालक आणि सहप्रवाशांसाठी वीमा संरक्षण, कॉल सेंटर आदी तरतुदी यात आहेत. या वाहनांचे चालक राज्यातले रहिवाशी असणं तसंच त्यांना मराठी भाषा बोलता येणं बंधनकारक आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांप्रमाणे त्यांनाही RTO कडून बिल्ला घ्यावा लागेल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दिवसातून त्यांना कमाल १२ तास वाहन चालवता येईल. या अंतर्गत सर्व कंपन्यांना राज्यात नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रवाशांकडून आकारण्यात आलेल्या भाड्यापैकी किमान ८० टक्के वाटा चालकांना द्यावे लागेल. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये ५० पेक्षा अधिक आणि इतर शहरांमध्ये २५ पेक्षा अधिक वाहनांची नोंद एका व्यक्तीला करता येणार नाही. या धोरणात खासगी वाहनांद्वारे कारपूलिंगला परवानगी देताना त्यातून नफा कमावण्यावर सरकारनं मनाई केली आहे. वाहन मालकाला फक्त प्रवासाचा खर्च सहप्रवाशांमध्ये वाटून घेता येईल. राईड पूलिंग सेवेमध्ये महिला प्रवाशांना फक्त महिला चालक अथवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा - संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी आता ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि ३ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन शुल्क भरता येईल. नव्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. यापूर्वी अर्ज भरलेल्यांना १९ जुलै ते ३१ जुलै दरम्यान आयोगाच्या वेबसाइटवर माय अकाउंटमध्ये जाऊन जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर, उमेदवाराचे जिल्हा केंद्र त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावरुन निर्धारित केलं जाईल, असं आयोगानं कळवलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २५ ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २७ डिसेंबर रोजी होणार आहे.

****

नांदेड इथं जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशनचं जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत.

दरम्यान, नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरच्या विष्णुपुरी इथल्या उड्डाण पुलाच्या ढासळलेल्या भागाची पालकमंत्री सावे यांनी पाहणी केली. या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, केंद्रीय उच्चस्तरीय तज्ज्ञ पथकानं उड्डाणपुलाच्या संरचनेची सखोल तांत्रिक तपासणी केली आहे. चौकशीत कोणत्याही प्रकारची हयगय झाल्याचं आढळल्यास दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असंही सावे यांनी स्पष्ट केलं.

****

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत परभणी जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती नोंदवली असून, राज्यातल्या अव्वल आठ जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे. आज सकाळच्या अहवालानुसार, परभणी जिल्ह्यातील १५ लाख ४१ हजार ७ मतदारांपैकी ८ लाख ६३ हजार ६०८ मतदारांच्या फॉर्मचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे. तर ८ लाख ६२ हजार ८८० फॉर्म बीएलओमार्फत पडताळणीसह प्राप्त झाले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाने आज सकाळी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. गट शिक्षणाधिकाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा संदेश त्यांनी समाज माध्यमावर ठेवला होता. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

****

जपानमध्ये टोकियो इथे सुरु असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेली नोझोमी ओकुहारा हिने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधू ला वॉक ओव्हर मिळाला आहे. 

जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या सिंधूने याआधीच्या फेरीत पाचव्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युई ला हरवून उप उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला आता चौथ्या स्थानावरच्या चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...