Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १८ जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी गेल्या २० दिवसांपासून
दिल्लीत उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी
आज सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, वांगचुक यांना रुग्णालयात नेण्यात
आलं असल्याचं दिल्लीचे पोलिस उपआयुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचुक यांची प्रकृती
गंभीर असल्याची बाब लक्षात घेऊन तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर न्यायालयानं हा आदेश
जारी केला होता.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून २५ तारखेपर्यंत
मोल्दोवा, उत्तर मैसेडोनिया आणि
रोमानिया च्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत. हा मोल्दोवा आणि उत्तर मैसेडोनिया इथ कोणत्याही
भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला राजकीय दौरा असेल तर १९९४ नंतर तत्कालीन भारतीय राष्ट्रपतींनी
रोमानियाचा दौरा केला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
भारताचं पहिलं खाजगी स्वरुपात विकसित कक्षीय रॉकेट विक्रम-वन
आपल्या पहिल्या उड्डाण चाचणीसाठी सज्ज आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता आंध्रप्रदेशच्या
श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे चाचणी उड्डाण होणार आहे. हैदराबादच्या
स्कायरूट एयरोस्पेस या कंपनीनं हे यान विकसित केलं आहे. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे
जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ कक्षीय रॉकेट विक्रम-वन हे नाव या यानाला
देण्यात आलं आहे. दरम्यान, विक्रम-वन मोहीम हा भारताच्या अंतराळ प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. चार टप्प्यात काम करणारं हे रॉकेट गतिमान
असून आणि आवश्यकतेनुसार उपग्रहांना अंतराळात पाठवण्यासाठी निर्माण करण्यात आलं आहे.
****
संसदेच्या परवा सोमवारी सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनापूर्वी
सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत, सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची
कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल. दरम्यान, या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर काल
नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रीगटाची बैठक पार पडली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या १३
ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि
अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे.
****
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या
विकासकामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होत आहे. या योजनांसाठी १६ हजार ७०० कोटी रुपयांचा
खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान ५३ किलोमीटर लांबीच्या
सहापदरी महामार्गाचा समावेश असून, २४६ किलोमीटर लांबीच्या पुणे-संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा
आहे. हडपसर आणि यवत दरम्यान३२ किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव–चाकण-शिक्रापूर दरम्यानच्या
५४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे. या कामांना चार वर्षात
पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकासकामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक
कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे, शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही
मिळणार आहे.
केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील.
****
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून भीमा नदीपात्रात
आज सकाळी सहा वाजता दर सेकंद १ हजार ६०० दशलक्ष
घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. उजनी धरणाच्या पॉवर हाऊस आउटलेटमधून हा विसर्ग
करण्यात येत असून, परिस्थितीनुसार पुढील टप्प्यांत विसर्गाचं प्रमाण नियंत्रित केलं जाणार असल्याची
माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी दिली.
पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्याने भीमा नदीकाठच्या
नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसेच जनावरं
नदीच्या मुख्य प्रवाहापासून सुरक्षित अंतरावर ठेवावीत, विसर्गाच्या कालावधीत नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर
टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय महसूल, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा विभाग आणि संबंधित सर्व यंत्रणांना
सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
****
टोकियो इथं सुरू असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या
महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पी. व्ही. सिंधूने धडक मारली आहे. उपांत्य फेरीत, सिंधूने चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत
चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम २१-१९ अशा फरकाने जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सिंधू १५-१० अशी आघाडीवर असतानाच, दुखापतीमुळे चेन युफेईने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय
घेतला; त्यानंतर सिंधूला विजयी
घोषित करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment