Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १७ जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या दौर्यावर आहेत. या दौऱ्यात ते
सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
हरियाणातल्या जिंद इथं १४ हजार
७०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या
हस्ते होत आहे. जिंद ते सोनीपत दरम्यान देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर धावणाऱ्या रेल्वे
गाडीला पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. संपूर्णपणे स्वदेशी निर्मित
असलेल्या या रेल्वे गाडीच्या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी
चालवली जाते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य
होतं. 'ग्रीन हायड्रोजन'च्या वापरामुळे
जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व
कमी व्हायला मदत होणार आहे.
त्यानंतर कुरुक्षेत्र इथं शीख
गुरूंचा वारसा आणि शीख संस्कृतीला समर्पित शीख संग्रहालयाची पायाभरणी, चंदीगड इथं चार हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामांचं
उद्घाटन आणि पायाभरणी, दिल्ली–अमृतसर–कटरा द्रुतगती
मार्गाच्या पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित पॅकेजचं लोकार्पण आणि जालंधर इथं रेल्वे आणि
रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट
पुनर्परिक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था – एनटीएनं जाहीर केला. ११ लाख विद्यार्थी
या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले
गुण पाहता येणार आहेत. एकंदर वीस लाख विद्यार्थी या पुनर्परिक्षेला बसले होते.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोग –
एमपीएससीनं संगणक आधारित परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबत विद्यार्थी
संघटनांकडून होत असलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत एक बैठक घेतली.
परिक्षा पद्धतीत सुधारणा करताना त्यात प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी मिळणं
आवश्यक आहे, त्यामुळे संगणक आधारित परीक्षा पद्धती लगेच लागू न करता
ऑगस्ट २०२७ पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही
वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी
सूचित केलं. त्यानंतर आयोगानं संगणक आधारित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.
****
राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यांमधल्या
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यातला डेटा किती कालावधीसाठी जतन केला
जातो, याचा अहवाल सादर करण्यासाठी, तथ्यशोध मोहीम राबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना
दिले आहेत. एका फौजदारी रिट याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले. याचिकाकर्त्यानं
घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही चित्रणाची मागणी केली होती. मात्र, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ चित्रण ठेवत नसल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं
होतं. त्यावर न्यायालाने हे निर्देश दिले.
****
राज्यातल्या लोकायुक्तांकडे
गेल्या वर्षाअखेर चार हजार ८० प्रकरणं प्रलंबित आहेत. २०२५ मध्ये एकूण आठ हजार ९६५
पैकी चार हजार ८८५ प्रकरणं निकाली काढल्याचा अहवाल लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर
कानडे यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना नुकताच सादर केला. वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे
आठ हजार ५४७ नवीन तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी तीन हजार ८६९ तक्रारी विविध कारणांमुळे
नोंदवल्या नाहीत, असंही अहवालात नमूद आहे.
****
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर
पंढरपूर आणि पालखी मार्गावर यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरक्षा व्यवस्था
उभारण्यात आली आहे. प्रथमच फाइव्ह-जी वॉकी-टॉकी, क्यूआर कोड, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन कॅमेरे आणि ३५० सीसीटीव्ही
कॅमेऱ्यांच्या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षेसह गर्दीचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात
येणार असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल आढावा बैठकीत
दिली.
दरम्यान, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढयाचं गोल रिंगण काल काटेवाडीत
उत्साहात पार पडलं. पालखीचा मुक्काम आज सणसर इथ आहे. तर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं गोल रिंगण चांदोबचा लिंब
इथं लाखों वारकऱ्यांच्या भक्तीभावात पार पडलं. आज पालखी तरडगावला मुक्कामी आहे.
****
जळगाव शहरानजीक छत्रपती संभाजीनगर-
जळगाव महामार्गावरील उमाळा घाटात काल रात्री झालेल्या भीषण मोटार अपघातात दोन जणांचा
जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी
झाले. महामार्गावर उभं असलेलं वाहन अचानक समोर दिसताच संभाव्य धडक टाळण्यासाठी चालकाने
तातडीने ब्रेक लावले. मात्र वाहनाचा वेग अधिक असल्याने मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने
हा अपघात झाला.
****
No comments:
Post a Comment