Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 July
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर यंदा लवकर वाढणाऱ्या
पिकांना प्राधान्य द्यावं-केंद्रीय कृषीमंत्र्यांचं आवाहन
·
अतिवृष्टीसंदर्भात सर्वतोपरी मदतीचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं
मुख्यमंत्र्यांना आश्वासन
·
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुधारणा विधेयक विधान परिषदेत
संमत
·
मराठवाड्यात परभणी हिंगोली आणि लातूरसह काही भागात भूकंपाचे
धक्के
आणि
·
आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून
प्रस्थान
****
यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात
घेऊन, कमी
पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, असं आवाहन
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. काल नवी दिल्ली इथं एका उच्चस्तरीय
बैठकीनंतर ते बोलत होते. गेले काही दिवस देशभरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीटंचाईग्रस्त
जिल्ह्यांची संख्या २६२ वरुन १७८ झाल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यंदा ४४२ लाख हेक्टर
पेरणी क्षेत्रापैकी ३५१ लाख हेक्टर जमिनींवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांनी
मका, बाजरी, आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर
वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, असं आवाहन कृषीमंत्र्यांनी
केलं. ते म्हणाले,
बाईट- केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह
चौहान
****
महाराष्ट्रातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडून
सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी दिलं.
दरम्यान, राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत मुख्यमंत्र्यांनी
काल विधानसभेत निवेदन सादर केलं. मुंबई–पुणे मार्गावर कनेक्टिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी,
काही जणांनी जनतेची दिशाभुल करणारी विधानं केल्याबद्दल त्यांनी यावेळी
नाराजी व्यक्त केली. या भागातली सुरक्षाव्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल,
याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
दरम्यान, मुंबईत काल पावसानं उसंत घेतली असली तरी नाशिक
जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ,
सुरगाणा या चार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. निफाड तालुक्यातल्या नांदूर-मधमेश्वर
बंधाऱ्यातून सध्या सुमारे २८ हजार ९३४, तर नागमठाण धरणातून सुमारे
५० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी इथल्या
कचरा डेपो परिसरात काल दुपारी इमारत ढासळली. या इमारतीत सुमारे २३ नागरिक अडकले होते.
त्यापैकी एकूण १४ नागरिकांची सुटका करण्यात आली असून उर्वरित नागरिकांचा शोध सुरू आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कोकण आणि खानदेशासह अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा
यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर आणि आंबेगावसह घाटमाथा परिसरात ऑरेंज
अलर्ट देण्यात आला असून, माळशेज
घाट, नाणेघाट, शिवनेरी किल्ला आणि भीमाशंकरसह
इतर पर्यटन स्थळांवर प्रवेशासाठी सध्या निर्बंध घालण्यात आले आहेत.
****
येत्या १० वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसगाड्यांचं
विद्युतीकरण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक
व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
**
दरम्यान, हिंदी भाषिक रिक्षा, टॅक्सी
चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत त्यांना मराठी
भाषा शिकण्यासाठी सर्व मदत करण्यात येत आहे. १६ ऑगस्टपासून या वाहन चालकांना मराठी
भाषा येत नसल्यास, वाहन परवाना रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिला. ते म्हणाले:
बाईट- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
****
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान
परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही
देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम
यांनी स्पष्ट केलं. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन
करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे.
****
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य
हक्कांचं संरक्षण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दिली. काल विधानभवनात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सर्वोच्च
न्यायालयातील सीमाप्रश्नाची सुनावणी लवकर सुरू व्हावी, यासाठी
राज्य शासनाच्या वतीने आवश्यक अर्ज दाखल करण्यात येतील, असंही
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
**
मुंबईत JJ आणि KEM रुग्णालयात चिरफाड
न करता यंत्राद्वारे शव विच्छेदन प्रक्रिया येत्या दोन ते तीन महिन्यात सुरू होईल.
ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र यंत्राद्वारे शवविच्छेदन सुरू करू अशी
माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधानपरिषदेत दिली. शव विच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची
प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं.
**
छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह मुंबई, नागपूर,
पुणे इथल्या बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५० वरून
१०० करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधानसभेत ही
माहिती दिली. अंबाजोगाईसह अन्य जी.एन.एम महाविद्यालयांचं श्रेणीवर्धन करुन तिथं प्रत्येकी
१०० प्रवेश क्षमतेची बी.एस्सी नर्सिग महाविद्यालयं, तसंच धाराशिवसह
१० शहरात नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्यात येणार असल्याचं
मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यात परभणी, हिंगोली लातूरसह काही भागात मध्यरात्रीनंतर
भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात रात्री दीड वाजेच्या सुमारास सलग दोन आणि
तीव्र धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक सहा इतकी मोजली
गेली असून, हा या भागातील आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला
जात आहे. त्यानंतर पहाटेपर्यंत भूकंपाचे आठ धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू
वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे हे गाव होतं. दरम्यान, हिंगोलीचे
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं...
बाईट- हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल
गुप्ता
****
आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या
पालखीने काल आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या सोहळ्यासाठी मानाच्या ५६ दिंड्यांमधील
प्रत्येकी केवळ १० वारकऱ्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात आला होता. आज पालखी पुण्याकडे
मार्गक्रमण करत आहे.
****
मुक्ताईनगरहून निघालेली संत
मुक्ताबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यात पोहोचली. शहागड इथं गोदावरी पात्रात पादुकांना
मंत्रोच्चाराच्या गजरात स्नान घालण्यात आलं. या सोहळ्यानंतर पालखी गेवराईला रवाना झाली, आज गेवराईच्या
चिंतेश्वर मंदिरातून पालखी पुढच्या मुक्कामाकडे निघणार आहे.
शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी काल बीड
जिल्ह्यात परळीच्या औष्णिक विद्युत केंद्र वसाहतीत दाखल झाली. आज पालखी परळी वैद्यनाथ
इथं पोहोचेल. त्यानंतर अंबाजोगाई आणि बोरीसावरगाव इथे पालखीचा मुक्काम असेल.
****
धाराशिव शहरात राहणाऱ्या प्रतिभा प्रमोद हावळे या शिवणकाम
व्यवसाय करतात. पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज केल्यावर अवघ्या काही दिवसात त्यांना
आवश्यक साहित्य घरपोच प्राप्त झालं. याबाबत प्रतिभा हावळे यांनी आकाशवाणीशी बोलतांना
अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या...
बाईट- प्रतिभा प्रमोद हावळे
****
मतदार यादी विशेष पुनरिक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या
बुथ प्रतिनिधींनी सहयोग देण्याचं आवाहन, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा
जी.सी.यांनी केलं आहे. ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या बैठकीत बोलत होते.
राजकीय पक्षांकडून नियुक्त प्रतिनिधींनी आपल्या परिसरात मतदारांकडून अर्ज भरुन जमा
करावेत अशी सूचना त्यांनी केली.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात
एका कंत्राटी अभियंता गणेश गुजर याच्यावर लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाने कारवाई केली. तर अन्य एका प्रकरणात सातबारावर नाव नसलेल्या ग्रामस्थांनाही
पीक खरडणीचा मदत
निधी दिल्याप्रकरणी एका कृषी सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment