Sunday, 5 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू

·      केंद्र सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात १३ टक्के वाढ

·      सहकारी संस्थाचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी सहकार शिक्षण निधी उभा करणार-मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      येत्या २० जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत संसदेचं पावसाळी अधिवेशन

आणि

·      पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्यांनी मराठवाडा गजबजला

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी ३१ जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकाचं चालू वर्षातलं सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाईचा लाभ मिळणार आहे. खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा या एकूण १४ पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे.

****

केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दरात १३ टक्के वाढ केली आहे. आता हे दर एक हजार ८७५ रुपये प्रति क्विंटलवरून दोन हजार १२५ रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. सुधारित खरेदी दर कालपासून लागू झाल्याचं, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या २०२५-२६ च्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशात कांद्याचं उत्पादन ३०७ लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या कांद्याचा साठा पुरेसा असून, कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्हं नाहीत, असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. कांद्याची निर्यातही सामान्य असून, या वर्षी जून महिन्यात सुमारे एक लाख ५० हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे.

****

कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यात सहकारी संस्थाचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. काल मुंबईत राज्य सरकारच्या सहकारी संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या जीडीपीमध्ये  सहकारक्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेने आखलेली आहेत असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या वतीने सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरु करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन दिलं.

****

टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे. हे तिघं परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्रा इथल्या छापखान्यातले कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं नऊ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १० जणांना अटक झाली आहे.

****

वाहनांसाठी २० टक्के इथेनॉल मिश्रित इंधन हे सखोल चाचण्यांनंतर वापरात आणलं असून, वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. काल पुण्यात ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया – ए आर ए आय चे संचालक डॉ. रेजी माथाई यांनी याबाबत माहिती दिली. ई-20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं, सुमारे ४० ते ६० हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं माथाई यांनी सांगितलं.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन २० जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या मान्यतेनंतर संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली.

****

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती २१ ऑगस्ट हा दिवस, राज्य सरकार ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करणार आहे. मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारानं शासनानं हा बदल केला आहे. यापूर्वी १० मे हा सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जात होता.

****

आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताईनगरहुन पंढरपूरकडे जाणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीचं काल जालना शहरात आगमन झालं. आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत जे. ई. एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात पालखीचा रिंगण सोहळा होणार आहे. वारकरी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

**

शेगाव इथल्या संत श्री गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात झिरोफाटा इथं दाखल झाली. श्री क्षेत्र त्रिधारा इथं पालखीचा मुक्काम होता. वारी विठोबाची–साथ आरोग्याची या उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांची तपासणीही करण्यात आली.

**

हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून संत नामदेव महाराज पायी पालखी सोहळ्याचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. नरसी ते पंढरपूर दरम्यान १९ ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम होणार असून, पाच ठिकाणी अश्व रिंगण सोहळा पार पडणार आहे. यापैकी पहिला पालखी रिंगण सोहळा उद्या ६ जुलै रोजी हिंगोलीच्या रामलीला मैदानावर होणार आहे.

**

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यातला पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं उत्साहात पार पडला. सुमारे ३० ते ३५ हजार वारकरी यावेळी उपस्थित होते.

**

यवतमाळहून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरला निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे तिसरं वर्ष आहे. पूर्णत: दिव्यांगांची पंढरपूरात जाणारी ही राज्यातली पहिलीच वारी असून, ती २२ दिवसात ५२१ किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरला पोहचणार आहे.

****

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पातल्या वडवणी ते परळी वैद्यनाथ या शेवटच्या मार्गाचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. या मार्गावर रेल्वे रुळ टाकण्याचं काम ७५ टक्के पूर्ण झालं असून, सिग्नल यंत्रणा उभारणं आणि विद्युतीकरणाचं काम ८० टक्के पूर्ण झालं आहे. हे काम पूर्ण होताच या मार्गावरून थेट विजेच्या इंजिनची चाचणी घेता येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी काल मतदान झालं. बँकेच्या २१ संचालकांपैकी ८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित १३ संचालकांसाठी काल मतदान घेण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंद भार्इ श्रॉफ अध्यासन केंद्रातर्फे काल मराठी भाषा चिंतन परिषद घेण्यात आली. यावेळी दहावीत मराठी विषयात अनुत्तीर्ण, कारण मीमांसा, चिंतन, आणि उपाययोजना या विषयांवर उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले. भारत सरकारचे प्रतिनिधी तथा साहित्य अकादमीचे डॉ. नरेंद्र पाठक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

****

अयोध्या इथल्या श्रीराम मंदिराच्या देणगीत झालेल्या अपहाराच्या निषेधार्थ शिवसेना  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज राज्यव्यापी ‘श्रीराम रक्षा घंटानाद’ आंदोलन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गुलमंडी इथल्या सुपारी हनुमान मंदिरात जिल्हाव्यापी घंटानाद आणि महाआरती करण्यात येणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात, राज्य शासनाच्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्ह्यातल्या ११ हजार १६६ थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील शासनाच्या ऑनलाइन कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड केला आहे. जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी ही माहिती दिली. या पात्र शेतकऱ्यांवरील थकीत कर्जाची एकूण रक्कम ९५ कोटी ९२ लाख रुपये इतकी आहे.

****

लातूर महानगरपालिकेकडून नागरिकांना थकीत कराचा भरणा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उद्या ६ जुलैपासून २० जुलैपर्यंत या कालावधीत थकीत कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना व्याज शास्ती मध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी जाहीर केला आहे.

****

'पीएम-सूर्यघर मोफत वीज योजनेत जास्तीत जास्त घरांवर सौरऊर्जा पॅनेल बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी उद्या ६ जुलैपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 'सूर्यरथ' या फिरत्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ होणार आहे. 'नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया'द्वारे पीडब्ल्यूसी आणि एनर्जिवा व्हेंचर्स यांच्या सहकार्याने हा 'सूर्यरथ' सुरू केला जात आहे. छतावरील सौरऊर्जा प्रणालीद्वारे एक कोटी घरांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे.

****

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नाशिक, बुलडाणा, गोंदिया, जळगाव, गडचिरोली आणि इतर भागांत जोरदार पावसामुळे पूरस्थिती, रस्ते पाण्याखाली जाणं, दरडी कोसळणं आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासूनच सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे सूर्यदर्शन झालं नाही.

दरम्यान, हवामान विभागाने आज मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, कोकणासह पुणे, सातारा घाटमाथा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 July 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...