Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०३ जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती
परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व
जिल्ह्यांमधल्या आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती
व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे.
मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे.
सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने सखल भागात काही ठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात
झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईतल्या
काही भागांत १५० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. ठाणे आणि पुण्यासह विविध
भागातही दमदार पावसाला सुरुवात झाली आहे.
पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत
कोसळून ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर गडचिरोलीमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या
व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या
पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक दाखल
झालं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे
नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण २१ टक्के भरलं आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळीही २४ तासांत दहा फुटावरून १२ पूर्णांक सात फूट इतकी झाली
असून,
नदीपात्रातून तीन हजार ९६८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग
सुरू झाला आहे.
करवीर तालुक्यातल्या वळिवडे इथं पंचगंगा नदीच्या काठावर गवत
आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बैल नदीच्या पाण्यातून वाहून गेला.
****
वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू काश्मीरमधल्या
पहलगाम आणि बालताल या मार्गांवरुन सुरु झाली. कडक सुरक्षा व्यवस्थेखाली
यात्रेकरुंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या
पहिल्या तुकडीत चार हजार ८२२ भाविक आहेत. त्यापैकी दोन हजार ५१० भाविक पहलगाम
मार्गानं तर दोन हजार ३१२ भाविक बालताल मार्गाने प्रवास करत आहेत. यात्रा सुरक्षित
आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात
करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या
भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रा ही देशाची अध्यात्मिक
परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचा अध्याय असल्याचं, त्यांनी
याबाबत जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. यात्ररदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल
फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड माँ के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टीकोनात योगदान
देणं,
हे पाच संकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यात्रेकरुंना
केलं आहे.
****
राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती
देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि
राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी
केली होती. या मागणीसाठी पाच जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला
होता,
त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या
संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं.
****
अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी, ब्लॉकचेन
तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जात वैधता प्रमाणपत्रांचं सुरक्षित डिजिटल पडताळणी
व्यवस्थेत रूपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते
काल विधानभवन इथं महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या ५२ व्या बैठकीत
बोलत होते.
****
अवैध सावकारीच्या तीन तक्रारींवरून सहकार, महसूल आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने काल वाशिम शहर आणि तालुक्यात सहा
ठिकाणी झडतीची कारवाई केली. यात काही दस्तऐवज जप्त करण्यात आले.
****
कोल्हापुरात गांजाची विक्री करण्यासाठी थांबलेला सराईत
विक्रेता अवधूत पिराजी गजगेश्वर याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी सापळा रचून पकडलं.
त्याच्याकडून ४६ हजार रुपये किमतीचा एक किलो ८५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत, औंढा
नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातल्या २५ गावांमध्ये काल भूकंपाचे दोन सौम्य धक्के
जाणवले. या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. भूकंपाच्या
पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना
दिल्या असून,
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती
खबरदारी घ्यावी,
असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झाली
नसल्याचं जिल्हा प्रशासनानं काल स्पष्ट केलं. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू
नये,
फक्त प्रशासनाकडून अधिकृतपणे जारी करण्यात येणाऱ्या सूचना
आणि माहितीलाच प्राधान्य द्यावं, असं आवाहन जिल्हा
प्रशासनाने केलं आहे.
****
No comments:
Post a Comment