Wednesday, 1 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात विनापरवाना आय व्ही एफ आणि सोनोग्राफी केंद्र यातून होणाऱ्या सामान्य रुग्णांच्या फसवणुकीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणाच्या प्रश्नावर ते बोलत होते. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू असून, पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल. अशी केंद्रे अनावश्यक पद्धतीने आणि मोठ्या संख्येने उघडली जात आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तपास पथक काम करेल, असं आबिटकर यांनी सांगितलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

****

विकसित भारत रोजगार आणि उपजिविका हमी ग्रामीण कायदा २०२५ म्हणजेच व्ही बी जी राम जी कायदा आजपासून लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात १२५ दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

****

डिजिटल इंडिया मोहिमेला आज ११ वर्ष पूर्ण झाली. या मोहिमेच्या यशाने देशाला जगभरात एक नवी ओळख मिळवून दिली, नाविन्य आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करून देशाला नव्या उंचीवर नेण्याचा देशवासियांचा संकल्प यातून दिसून येतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस आज साजरा होत आहे. प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त पंतप्रधानांनी देशभरातल्या डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टरांची अथक मेहनत, सेवाभाव, करुणा आणि रुग्णांप्रती असलेली निष्ठा ही भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ असल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

****

चार्टर्ड अकाउंटंट्स अर्थात सनदी लेखापाल दिनानिमित्तही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. भारतातील आर्थिक प्रगतीच्या प्रवासात चार्टर्ड अकाउंटंट्स हे विश्वासार्ह भागीदार म्हणून सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी डॉक्टर्स दिवस तसंच सनदी लेखापाल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

****

राज्यातले हरितक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषिदिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांना अभिवादन करत शेतकरी बांधवांना कृषिदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगरू डॉ. मनोहर चासकर यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

पासपोर्ट म्हणजे पारपत्रासाठी दाखल करण्यात येणार्या अर्जाच्या शुल्कात आजपासून वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातल्या नवीन आराखड्यानुसार ३६ पानी पासपोर्ट साठी अडीच हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल, ६० पानांच्या सामान्य पासपोर्ट साठी साडे तीन हजार रुपये, तर तात्काळ पासपोर्ट मिळवण्यासाठी नागरिकांना सहा हजार रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. ३६ पानी पासपोर्ट फाटला, हरवला किंवा खराब झाला तर पर्यायी पासपोर्ट साठी पाच हजार आणि ६० पानांच्या पर्यायी पासपोर्टसाठी ६ हजार रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.

****

आषाढी एकादशीसाठी बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातल्या श्रीक्षेत्र सखारामपूर इथून सखाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरकडे प्रस्थान केलं. शेकडो वारकरी सहभागी असलेल्या या पालखी सोहळ्यात ‘झाडे लावाण्याचा तसंच व्यसनमुक्ती’ चा संदेशही दिला जात आहे.

****

यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातल्या खैरगाव देशमुख इथं आज कृषी विभागाने केलेल्या कारवाईत १७ लाख ८२ हजार रुपयांचा अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशकं तसंच रासायनिक खताचा साठा जप्त करण्यात आला. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांना ही मुदतबाह्य खतं आणि औषधी, बनावट लेबल लावून विकली जात होती. यश शिवनवार या व्यक्तीच्या गोदामावर अधिकृत परवान्याशिवाय थेट आदिलाबाद आणि सारखणी इथून मोठ्या प्रमाणात कमी दरातली ही अवैध खतं आणि कीटकनाशकं मागवून चढ्या दरात शेतकर्यांना विकण्यात येत होती.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी–ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत असून, पहिला सामना इंग्लंडमधल्या चेस्टर ली स्ट्रीट इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...