Wednesday, 8 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधीमंडळात एकमताने मंजूर; सावकारी सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत

·      सरकारने सदनात दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका चालू अधिवेशन संपेपर्यंत काढण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश

·      आरटीओतल्या कथित गैरप्रकरणांची उच्चस्तरीय चौकशीअंती कारवाई-सरकारचं आश्वासन

·      श्री संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान

आणि

·      नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी, जायकवाडी धरणातला पाणीसाठा २८ टक्क्यांवर

****

महिलांना अधिकृत आणि कायदेशीररित्या शेतकरी म्हणून दर्जा आणि मान्यता देणारं 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६' विधीमंडळात मंजूर झालं. काल विधानपरिषदेत एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं, विधासभेत याआधीच त्याला मंजुरी मिळाली होती. महिलांच्या नावावर जमीन नसल्यामुळे त्यांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित रहावं लागत होतं, आता या कायद्याअंतर्गत त्यांना विशेष महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल.

**

राज्यात खाजगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खाजगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी पन्नास हजार रुपये दंडाची रक्कम आता एक लाखांवर नेण्यात आली असून, पाच वर्ष कारावासाची शिक्षा आता सात वर्ष इतकी करण्यात आली आहे.

**

राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कृतीला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर झालं. आता नवीन कायद्यानुसार ऑर्केस्ट्रा आणि करमणुकीसाठी मिळणारा परवाना हा डान्सबार कायद्याच्या अंतर्गतच मिळू शकेल, पूर्वी करमणूक आणि ऑर्केस्ट्रा साठी मिळणारा स्वतंत्र परवाना आता मिळणार नाही. यामुळे ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली होणारी डान्सबार मधील अश्लील नृत्य आणि कृती याला आळा बसू शकेल असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

**

रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांसंदर्भात सुधारणा करणारं विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय काल विधानसभेत घेण्यात आला. पुढील अधिवेशनात दोन्ही बाजूच्या सदस्यांचा समावेश असणाऱ्या समितीच्या सूचनांसह हे विधेयक सभागृहात पुन्हा सादर करण्यात येईल.

**

राज्य सरकारने आत्तापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी, असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. विधानसभेत १७ डिसेंबर २०१५ रोजी उत्तर दिलेल्या प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी काल सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा, असंही त्यांनी सरकारला सांगितलं.

**

राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय-आरटीओ विभागातल्या कथित गैरव्यवहार, कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून, या पथकाला एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते म्हणाले..

बाईट- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

**

छत्रपती संभाजीनगर इथल्या कचरा व्यवस्थापनासंदर्भात पुढच्या आठवड्यात महापालिकेत बैठक घेणार असून, हा मुद्दा मार्गी लावण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. त्या काल विधान परिषदेत आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलत होत्या. पडेगाव इथल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असून, शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड झाल्याचा आरोप दानवे यांनी केला. या प्रकल्पाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच साठलेला कचरा कालबद्ध पद्धतीने हटवण्याची मागणी दानवे यांनी केली. यासंदर्भात बोलतांना मुंडे यांनी, या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावर पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत शास्त्रोक्त प्रक्रिया पूर्ण होईल, तसंच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं.

****

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. उद्या पालखी पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथून जगद्गुरू संत एकनाथ महाराजांच्या ४३७ व्या पालखी सोहळ्याला काल अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात प्रारंभ झाला. हजारो वारकरी आणि दिंडीप्रमुखांच्या उपस्थितीत नाथांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.

****

नाशिक जिल्ह्यात काल काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. इगतपुरी आणि परिसरात सुमारे दोनशे मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे ११ हजार ८९ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी मराठवाड्याच्या दिशेनं येत आहे. परिणामी पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा २८ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या एक हजार तीनशे चव्वेचाळीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या चोवीस तासात १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

**

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनाने बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखर, आदी ठिकाणं पुढील आदेशापर्यत पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातले अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.

**

जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली, तरी राज्यातल्या विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सोलापूर, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. आठ जुलैपासून राज्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील दहा दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातल्या ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथल्या शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.

**

दरम्यान, मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

****

विशेष सखोल पुनरिक्षण-एसआयआर अंतर्गत नांदेड जिल्ह्यात बूथस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गणना पत्रकं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विहित मुदतीत पूर्ण होणाऱ्या या प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. ते म्हणाले…

बाईट- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शाही संदल सोहळा हजारो नुरी भक्तांच्या उपस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात काल पार पडला. इस्लामी महिना मोहर्रमच्या २१ तारखेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक संदल सोहळ्याची सुरुवात रजा मैदान येथून झाली. त्यानंतर पवित्र मजार शरीफवर संदल चढविण्यात आला. देशात शांतता, सौहार्द, बंधुभाव आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी विशेष प्रार्थना यानिमित्त करण्यात आली.

****

राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी हिंगोली–पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या मागणीची रेल्वे मंत्रालयानं दखल घेतली आहे. या मागणीची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी मोहिमेला धाराशिव जिल्ह्यात वेग आला आहे. सात जुलै २०२६ पर्यंत जिल्ह्यात १६ पूर्णांक २२ टक्के क्षेत्राची ई-पीक पाहणी पूर्ण झाली असून, उर्वरित क्षेत्राची नोंद लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महसूल आणि कृषी विभाग प्रयत्नशील आहेत.

****

लातूर जिल्ह्यात काल १० लाख २४ हजार ४७० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी औराद शहाजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

नांदेडमध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने निळा रस्त्यावर दोन गावठी पिस्तूल जप्त केले. याप्रकरणी तिन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 July 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...