Monday, 13 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 13 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

पुणे जिल्ह्यात सासवड–जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे तीन वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चार वारकरी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा ट्रक हा नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबेडिग्रज गावच्या रहिवाशी होत्या.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून, पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरात दौऱ्यावर असून, गांधीनगरमध्ये विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सर्वप्रथम ते राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात आयोजित इंटरपोलच्या ११व्या डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञ समूह बैठकीचं आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय तपास अधिकारी परिषदेचं उद्घाटन करतील. यानंतर अमित शाह गांधीनगर जिल्ह्यातल्या दहेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार असून, नव्या भाजीपाला बाजाराचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय, 'एक पेड़ माँ के नाम' या पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी होत ते वृक्षारोपण करतील.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इसरोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रु मॉड्युल प्रणालीच्या तीन महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. पहिल्या चाचणीत क्रु मॉड्युल अपरायटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतर ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसर्या चाचणीत क्रु मॉड्युल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं, तर तिसर्या चाचणीत क्रु मॉड्युलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप संदर्भात सामाजिक माध्यमांवर फिरत असलेल्या माहितीचं सरकारने खंडन केलं आहे. 'सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय' तसंच 'कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे अशा इंटर्नशिप कार्यक्रमासाठी कोणतीही अधिकृत अधिसूचना किंवा अर्ज जारी करण्यात आला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. नागरिकांना संशयास्पद लिंक्स किंवा वेब पेजेसवर क्लिक न करण्याचं आणि पडताळणी न केलेल्या प्लॅटफॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचं आवाहन पीआयबी फॅक्ट चेक ने केलं आहे. अधिकृत माहितीसाठी केवळ सरकारी संकेतस्थळं आणि खात्रीशीर स्रोतांवरच अवलंबून राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

****

बीड शहर पोलीस ठाण्यात तपास प्रक्रियेसाठी विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल प्रणालीची राज्यस्तरीय तांत्रिक पाहणी पूर्ण झाली आहे. तक्रार नोंदणी, तपास, पुरावा व्यवस्थापन, आरोपपत्र तयार करणं तसंच न्यायालयीन प्रक्रियेच्या नोंदी आणि देखरेख यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. जिल्ह्यातली तपास प्रक्रिया अधिक सुसंगत, वेळेची बचत करणारी आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम करण्याच्या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली विकसित करण्यात आली आहे. उपलब्ध तपास नोंदी आणि अनुभवाच्या आधारे विकसित करण्यात आलेली ही प्रणाली तपास अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यास मदत करणार असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितलं.

****

ब्रिक्स परिषदेसाठी नागपूरमध्ये आलेल्या सदस्य देशांचे मंत्री आणि इतर प्रतिनिधींनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. जवळपास ७० प्रतिनिधींनी या जंगल सफारी केली. ताडोबातील समृद्ध जैवविविधता आणि व्याघ्र संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे प्रतिनिधींनी विशेष कौतुक केलं.

****

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं साडे सात लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ जुलै रोजी आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा १३६वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना, सूचना आणि अनुभव २४ जुलै पर्यंत माय जीओव्ही ओपन फोरम, नामो ॲप वर किंवा १८००११७८०० या नि:शुल्क क्रमांकावर कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...