Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ जुलै २०२६ सायंकाळी
६.१०
****
· केंद्र
शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय;शेतकरी
कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथील करण्यास मान्यता
· रेल्वेसाठीच्या
भूसंपादन प्रक्रियेचं संपूर्ण व्यवस्थापन करण्यासाठी रेल भूमी पोर्टल सुरू करण्यात
येणार
· सीबीएसई
कडून त्रिभाषासूत्राबाबतची भूमिका जाहीर
· राज्य
शिक्षण मंडळाच्या पुरवणी परीक्षेत दहावीचे २९ टक्के तर बारावीचे ३९ टक्के परीक्षार्थी
उत्तीर्ण
आणि
· फिफा
स्पर्धेत आज फ्रान्स आणि स्पेनदरम्यान पहिला उपान्त्य सामना
****
राज्यात
केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे. यामुळे शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा
मिळवता येणं शक्य होईल.
राज्यातल्या
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंत्रिमंडळानं
मंजुरी दिली. यामुळे महापालिका, नगरपालिका, नगरपररिषदा आणि नगरपंचायतींना मालमत्तांच्या
वापरातून पारदर्शक आणि चांगले उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करता येतील.
पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथील करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता
दिली. २०१९ च्या कर्जमाफी योजनेतल्या सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची पन्नास हजार रुपयांपर्यंतची
मर्यादा रद्द करून त्यांना नियमित कर्जमाफी देण्याचा तसंच वर्ष २०२६-२७ मधली नियमित
परतफेडीची अट रद्द करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलं.
कारागृहांमधल्या
मुक्तबंदी आणि परिविक्षाधीन कैद्यांना देण्यात येणाऱ्या सहायक अनुदान योजनेच्या रक्कमेत
दुप्पटीनं वाढ करत ते पन्नास हजार रुपये करण्याचा तसंच निर्दोष सुटलेल्या बंद्यांचा
या योजनेत समावेश करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला.
बीड
जिल्हा क्रीडा संकुलाच्या २४ कोटी ९५ लाख रुपयांच्या कामांना आज मंत्रिमंडळानं मंजुरी
दिली. या निधीतून क्रीडा संकुलात सिंथेटीक अॅथलेटीक ट्रॅक, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल,
कबड्डी, खोखो यासाठीची मैदानं, रेनवॉटर हार्वेस्टींग अशी कामं करता येणार आहेत.
याशिवाय,
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातल्या अतिरिक्त जागांचा विकास करण्याचा,
पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या दापचरी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार
उभारण्याचा आणि महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन
नियम, २०१३ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ
बैठकीत घेण्यात आला.
****
रेल्वेच्या
विस्तारीकरणासाठीच्या भूसंपादनाच्या संपूर्ण प्रक्रियेचं व्यवस्थापन करण्यासाठी रेल
भूमी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती
दिली. भारतीय रेल्वे आधुनिक करण्याच्या उद्देशानं सरकारनं हाती घेतलेल्या सुधारणांबाबत
ते आज नवी दिल्लीत पत्रकारांना माहिती देत होते. नव्या सुधारित रेल्वे कंटेनर्समधून
खतांची तसंच विद्युत निर्मिती केंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या राखेची वाहतूक करणं शक्य
असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट- रेल्वे मंत्री अश्विनी
वैष्णव
मालगाड्यांच्या
डब्यांचा आराखडा उद्योग क्षेत्राकडून करून घेणंही आता शक्य असून, कोणताही उद्योजक डब्याचा
नवा आराखडा देऊ शकेल आणि त्या आराखड्याच्या मूल्यांकनानंतर तसे डबे निर्माण करण्यास
परवानगी देण्यात येईल, यामुळे विशिष्ट उद्योगांच्या आवश्यकतेप्रमाणे विशेष बांधणीचे
डबे निर्माण करता येतील, असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. तांत्रिक कर्मचारी उत्तमरीत्या
प्रशिक्षित असावेत, यासाठी एक प्रमाणीकरण प्रणाली लागू केली जाईल, अशी माहितीही वैष्णव
यांनी दिली.
****
आषाढी
एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर यात्रेसाठी संबंधित सर्व धार्मिक प्रथा, परंपरा, विधींचं
तसंच भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांचं नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची
माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. आषाढी एकादशीला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी
मातेची शासकीय महापूजा होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी येत्या सोळा तारखेपासून पददर्शन
सुविधा चोवीस तास उपलब्ध राहणार आहे. यात्रेदरम्यान सुमारे दोन हजार पाचशे मनुष्यबळ
भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
देशाचे
माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त
नांदेडमध्ये आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, यांच्यासह अन्य मान्यवरांनी अभिवादन केलं.
नांदेड तालुक्यातल्या धनेगाव इथल्या त्यांच्या समाधीस्थळावर चव्हाण कुटुंबियांनी आदरांजली
अर्पण केली.
****
राष्ट्रीय
परीक्षा संस्था- एनटीए ने 'नीट' युजी फेरपरीक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या
प्रतिक्रिया आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या ॲप्लिकेशन
नंबरचा वापर करून लॉगइन करू शकतील, आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील, अशी
माहिती एनटीए नं दिली आहे.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईने R3, म्हणजेच त्रिभाषासूत्राबाबतची भूमिका आज जारी
केली. त्यानुसार, सीबीएसईअंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन फक्त शाळेतल्या
अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या
भाषेची परीक्षा घेणार नाही. ९ वी मध्ये जे विद्यार्थी R3 मध्ये उत्तीर्ण होणार नाहीत,
त्यांना १०वी मध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी १०वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण
होणं आवश्यक राहील. इयत्ता ८वी मधली तीन भाषांची निवड इयत्ता ९वी मध्येही कायम राहील
आणि त्यापैकी एका भाषेची निवड 'R3' म्हणून करावी लागेल, असं सीबीएसईनं स्पष्ट केलं
****
राज्य
शिक्षण मंडळाच्या दहावी तसंच १२ वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यभरातून
दहावीचे फक्त २९ पूर्णांक ५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर बारावी परीक्षेत हे
प्रमाण ३८ पूर्णांक ७२ टक्के इतकं आहे.
छत्रपती
संभाजीनगर विभागाचा दहावीचा निकाल ३४ पूर्णांक २७ टक्के, तर बारावीचा निकाल सुमारे
५३ टक्के लागला आहे. लातूर विभागाचा दहावीचा निकाल ३४ पूर्णांक ५५ टक्के तर बारावीचा
निकाल ४६ पूर्णांक ५३ टक्के इतका लागला आहे.
****
लातूर
जिल्ह्यातल्या शाळाबाह्य बालकांचं सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात
आणण्यासाठी १५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत प्रशासनानं नियोजित केलेल्या विशेष
मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड
यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. या सर्वेक्षणाचे अहवाल येत्या
तीस तारखेला सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
विशेष
सखोल पुनरीक्षण मोहिमेत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या
काही बूथ लेव्हल अधिका-यांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीनं काम १०० टक्के पूर्ण केल्याबद्दल
जिल्हा प्रशासनानं त्यांचं विशेष कौतुक केलं आहे. दिनकर घुगे, श्रीकांत नांदगावकर,
संतोष चाफळे, अमोल जगताप, बी. जी. वाघ आणि बापूराव लांडगे या बी एल ओंचा यामध्ये समावेश
आहे.
****
विशेष
मतदार यादी पुनरीक्षण, एसआयआर मोहिमेत कन्नड तालुक्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
अव्वल स्थान पटकावलं आहे. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड आणि
तहसीलदार सारिका भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
****
जपान
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आज टोकियो इथे सुरुवात झाली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत
भारताच्या पी.व्ही.सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगचा २१-१४;२१-११ असा पराभव केला.
मिश्र दुहेरीमध्ये तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला या भारतीय जोडीनं स्कॉटलंडच्या जोडीचा
पराभव केला.
****
फिफा
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतला पहिला उपान्त्य सामना आज फ्रान्स आणि स्पेनदरम्यान होत
आहे. टेक्सासच्या डलास स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री साडेबाराला हा सामना
सुरू होईल. सलग तिसऱ्या वेळेस अंतिम फेरीत पोहचण्याचा फ्रान्सचा, तर २०१० चा विश्वचषक
जिंकल्यानंतर यावेळी अंतिम फेरीत पोहचण्याचा स्पेनचा प्रयत्न असेल.
****
भारत
आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ झाला. इंग्लंड संघाने
नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी स्वीकारली. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा यजमान संघाच्या
सहा बाद १५९ धावा झाल्या होत्या.
****
वाशिम
इथली संत सूरदास महाराज दिव्यांग पायी वारी आज धाराशिव जिल्ह्यात कळंब शहरात दाखल झाली
आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या या दिंडीत १५ दृष्टिहीन
वारकरी आणि त्यांच्या सेवेसाठी ५ स्वयंसेवक सहभागी आहेत.
****
No comments:
Post a Comment