Monday, 20 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 20 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जुलै २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन आज सुरु झालं. १३ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात १९ सत्र होणार असून, महत्त्वाच्या विधेयकांवर आणि राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे.

या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी देशाने विकासाचा वेग पकडला असून, संसदेतील सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकते. राष्ट्राची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं.

**

दरम्यान, या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत हाय अलर्ट जारी केला आहे. कोणत्याही बेकायदेशीर मोर्चा किंवा विरोध प्रदर्शनाला परवानगी नसल्याचं स्पष्ट करत, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नवी दिल्लीत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत मोर्चे, निदर्शनं आणि पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध लागू आहेत. केवळ जंतरमंतर इथल्या निर्धारित स्थळी पूर्वपरवानगी घेतल्यानंतरच आंदोलनास परवानगी दिली जाणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

****

सिसीपीए, अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या तक्रारींवरून सरसकट सेवा शुल्क आकारणाऱ्या ३९ उपाहारगृहांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. सिसीपीएनं ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या उपाहारगृहांना दंड ठोठावला असून, सेवा शुल्काची सरसकट आकारणी ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमवरच्या संदेशात म्हटलं आहे.

उपाहारगृहांमध्ये सेवा शुल्क ऐच्छिक असून, ते पूर्णपणे ग्राहकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. ग्राहकांनी या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन १९१५ वर तक्रार नोंदवावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

जम्मू-काश्मीरमधल्या राजौरी आणि पूँछ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या नैसर्गिक आपत्तीत ११ जणांचा मृत्यू झाला असून, सात जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पूँछ जिल्ह्यातल्या सुरणकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर बनली असून, एनडीआरएफसह विविध बचाव पथकं मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी परिस्थितीचा आढावा घेत बाधित कुटुंबांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रतिकूल हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरील श्री अमरनाथ यात्रा आजपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तसंच श्री माता वैष्णो देवी यात्राही पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

****

मराठी शाळा टिकाव्यात यासाठी नाशिक महापालिकेने शहरातल्या सर्व शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी ही माहिती दिली. मराठी माध्यमांच्या शाळांना इंग्रजी शाळांशी मोठी स्पर्धा करावी लागत आहे, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. शहरातल्या अनुदानीत आणि विनाअनुदानीत अशा एकूण साडे तीनशे शाळांना याचा लाभ मिळणार आहे.

****

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्यासाठी गोदावरी आणि उपनद्यांवर घाटांची कामं सुरू असून, ही कामं तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. कुंभमेळा प्राधीकरणासह विविध शासकीय खात्यांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. गोदावरी, नंदीनी, गोदा नंदिनी संगम तसंच त्र्यंबकेश्वर इथं गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूने घाट बांधण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

अन्न आणि औषध प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या १० रक्तपेढ्या आणि सहा रक्तसाठवणूक केंद्रांवर कारवाई करत, त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. रक्तसंकलन आणि साठवणुकीच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश अन्न आणि औषध प्रशासनानं या कारवाईतून दिला आहे.

****

यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे न उगवल्याप्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. दारव्हा, बाभूळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळमध्ये बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात या कंपन्यांचं बियाणं अप्रमाणित असल्याचं निष्पन्न झालं आहे.

****

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सुमारे ५४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सात तलावांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे सध्या तलावांमध्ये सात पूर्णांक आठ लाख दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...