Wednesday, 8 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं-केंद्रीय कृषीमंत्र्यांचं आवाहन

·      अतिवृष्टीसंदर्भात सर्वतोपरी मदतीचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन

·      नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

·      येत्या १० वर्षात एसटीच्या सर्व बस गाड्यांचं विद्युतीकरण

आणि

·      संत मुक्ताबाईंपाठोपाठ गजानन महाराजांची पालखी बीड जिल्ह्यात दाखल

****

यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन, कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, असं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. आज नवी दिल्ली इथं एका उच्चस्तरीय बैठकीनंतर ते बोलत होते. गेले काही दिवस देशभरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या २६२ वरुन १७८ झाल्याचं चौहान यांनी सांगितलं. देशात यंदा पेरणीक्षेत्र ४४२ लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३५१ लाख हेक्टर जमिनींवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहे. पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांनी मका, बाजरी, आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

****

महाराष्ट्रातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

 

दरम्यान, राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन सादर केलं. मुंबई पुणे मार्गावर कनेक्टिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी, काही जणांनी जनतेची दिशाभूल करणारी विधानं केल्याबद्दल त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. कोसळलेली दरड बाजूला करून, अवघ्या काही तासांत वाहतुक सुरळीत झालेली कनेक्टिंग लिंक हे अभियांत्रिकीचं आश्चर्य असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या भागातली सुरक्षाव्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल, याबाबत आआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत, असंही ते म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी १३ हजार कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणार पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल, यावर या आराखड्यात भर दिला आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, मुंबईत पावसानं उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे.

 

नाशिक जिल्ह्यात जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या चार तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. निफाड तालुक्यातील नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून आज दुपारपासून ५ हजार ७७८ घनफूट प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गिरणा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढल्याने कळवण, बिलनारे, कनाशी मार्गावरील पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात २२५ ते २७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पाऊस आणि संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी देवी मंदिर उद्यापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय कायम आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.

****

येत्या १० वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली.

****

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला.

Digital माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे, याशिवाय संभावित गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून २४ तासाऐवजी १५ दिवस ते एक महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद या विधेयकात आहे.

****

मुंबईत JJ आणि KEM रुग्णालयात २-३ महिन्यात चिरफाड न करता यंत्राद्वारे शव विच्छेदप्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र यंत्राद्वारे शवविच्छेदसुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. शव विच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं.

****

दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम २ कोटी २२ लाख रुपयांवरून ४ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली. सदस्य निलेश राणे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. हे अनुदान कलाकारांच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भारूड, शंकासूर आणि शक्तीतुरा या लोककलांचे महोत्सव राज्या प्रत्येक विभागात आयोजित करण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचं शेलार यांनी सांगितलं.

****

राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृहं आणि पुनर्वसन केंद्राच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी ६० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबविताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ती तात्पुरती ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली असून पोर्टलमधील त्रुटी पुढील एका महिन्यात दूर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचं सावे यांनी सांगितलं.

****

तलाव, धरणे आणि रस्त्यांसाठी जमिनी संपादित केल्या जातात त्याच
धर्तीवर स्मशानभूमीसाठीही जमिनी संपादित कराव्यात आणि राज्यभर एक ठोस धोरण राबवावं, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी आज
विधानसभेत केली. एखाद्या गावात जागा उपलब्ध नसेल, तर आसपासच्या ज्या गावात गायरान जागा उपलब्ध आहे, तिथे परिसरातील गावांसाठी 'सामूहिक स्मशानभूमी' विकसित करण्याचा पर्याय त्यांनी यावेळी सुचवला.

****

मुक्ताईनगरहून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी आज बीड जिल्ह्यात पोहचली. शहागड इथं गोदावरी पात्रात पादुकांना मंत्रोच्चाराच्या गजरात स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरी नदीच्या तीरावर शेकडो वारकरी आणि स्थानिक भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्यानंतर पालखी गेवराईला रवाना झाली, आजचा पालखीचा मुक्काम गेवराईच्या चिंतेश्वर मंदिरामध्ये आहे.

शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी आज बीड जिल्ह्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्र वसाहतीत दाखल झाली. बीड जिल्ह्याच्या वेशीवरच मोठ्या संख्येने भाविकांनी श्रींच्या पालखीचं स्वागत करून मनोभावे दर्शन घेतलं. उद्या पालखी परळी वैद्यनाथ इथं पोहोचेल. त्यानंतर अंबाजोगाई आणि बोरीसावरगाव या गावात पालखीचा मुक्काम असेल.

****

रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातलं मौजे टेरव बुद्रुक हे मतदारयादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम १०० टक्के पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. गेल्या ३० जूनपासून सुरू झालेल्या या उपक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत अचूकतेने आणि तेही विहित कालावधीच्या आधीच पूर्ण केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कक्षेत येणाऱ्या चारही जिल्ह्यात स्वतंत्रपणे युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी संलग्नित महाविद्यालयाकडून यजमानपदासाठी प्रस्ताव मागवले असल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.

केंद्रीय युवक महोत्सव ५ ते ७ ऑक्टोबर या दरम्यान आयोजित करण्यात येईल. १ ते १० ऑगस्ट दरम्यान युवा महोत्सवाची नोंदणी प्रक्रिया सुरु ठेवणार आहे. बीड, धाराशिव, जालना तसंच छत्रपती संभाजीनगर या चारही जिल्ह्यात १ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या दरम्यान जिल्हा युवा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील सांडोळमहांडोळ मार्गावर राचन्नावाडी इथं शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात २२ विद्यार्थी जखमी झाले. सर्व जखमी विद्यार्थ्यांवर चाकूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू सल्याचं माच्या वर्ताहरानं कळवलं आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या वैजनाथ मंदिराची केंद्रीय गृहंत्रालयाच्या अधिपत्याखालील पथकानं पाहणी केली. या पाहणीदरम्यान मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणेसंदर्भात केंद्रीय पथकाने देवस्थान समितीला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...