Monday, 6 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      व्हीबीजी राम जी मोहिमेअंतर्गत राज्यांना २५ हजार कोटी रुपयांच्या सहाय्याला मंजुरी

·      नांदेडसाठी दोन नवीन एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना आजपासून सुरुवात

·      यंदा आषाढी वारीमध्ये पहिल्यांदाच 'एअर ॲम्ब्युलन्स'ची विशेष सुविधा मिळणार, मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

·      श्री राम मंदिरात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यभरात श्री राम रक्षा घंटानाद आंदोलन

आणि

·      मुंबईसह कोकणात पावसामुळे जनजीवन प्रभावित, मरावाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

****

विकसित भारत रोजगार आणि आजीविका ग्रामीण मिशन, - व्हीबीजी राम जी अधिनियम, २०२५ यशस्वीपणे लागू झाल्याबद्दल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मोहिमेअंतर्गत राज्यांना २५ हजार कोटी रुपयांच्या सहाय्याला मंजुरी देऊन निधी वितरित केला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं यशस्वीपणे VB-G RAM G योजनेत रूपांतर झाल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान

 

केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून, राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा, असं आवाहन चौहान यांनी केलं. व्ही बी जी राम जी कायदा एक जुलैपासून लागू झाला आहे.

****

गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे, इथे केवळ गायीचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’च्या समारोपप्रसंगी ते काल नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गाईपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनाचा विकास आणि ब्रॅण्डिंग झालं पाहिजे असं फडणवीस म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

****

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा काल महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. विक्रोळी मध्ये भारतातल्या सर्वात मोठ्या रेल्वे टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्यानं भूमिगत बोगद्याच्या खोदकामाला प्रारंभ झाला. १३ पूर्णांक सहा मीटर व्यास आणि सुमारे तीन हजार १०० टन वजनाचं हे अत्याधुनिक 'मिक्सशील्ड' टनेल बोरिंग मशीन विक्रोळी ते बीकेसी दरम्यान सुमारे सहा किलोमीटर लांबीचा बोगदा खोदणार आहे. हा बोगदा दाट लोकवस्ती, रस्ते, मिठी नदी आणि अन्य महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या खालून जाणार आहे. मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किलोमीटरच्या भूमिगत बोगद्याच्या उभारणीत हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.

****

नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड दरम्यान दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांना आजपासून सुरुवात होत आहे. या दोन्ही गाड्यांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. नांदेड रेल्वे स्थानकावर पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असतील.

****

यंदा आषाढी वारीमध्ये पहिल्यांदाच 'एअर ॲम्ब्युलन्स'ची विशेष सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. काल पंढरपूर इथं उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना गरज भासल्यास गुणवत्तापूर्ण उपचार वेळेत मिळावे, यादृष्टीने संपूर्ण आरोग्य यंत्रणा २४ तास सतर्क ठेवावी, असे निर्देश आबिटकर यांनी यावेळी दिले.

****

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संत श्रेष्ठ श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचा प्रथमच आयोजित रिंगण सोहळा काल जालना इथं उत्साहात पार पडला. वारकरी परंपरेनुसार रिंगणातील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिस विभागाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात सुमारे ३० ते ३५ हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता.

दरम्यान, निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पालखीचं पूजन करून वारकरी संप्रदायाचं स्वागत केलं.

****

अयोध्येत श्री राम मंदिरात देणगीत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काल राज्यभरात श्री राम रक्षा घंटानाद आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दादर इथल्या हनुमान मंदिरातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. रामलल्ला मंदिरातल्या देणगी चोरीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन निकाल लागत नाही तोपर्यंत गावागावात हे आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.

छत्रपती संभाजीनगर इथं सुपारी हनुमान मंदिरासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

****

मराठवाडा वगळता राज्यातल्या इतर भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात काल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला.

राज्यात काल मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला.

नवी मुंबई परिसरातही काल पावसाचा जोर कायम होता. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली.

रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या चौघांपैकी एकजण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या शंभराहून अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यानं हा महामार्ग बंद आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे.

सिंधुदुर्ग, नाशिक, गडचिरोली, पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही काल पाऊस झाला.

वाढता पाऊस आणि सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातल्या सर्व शाळा –महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.

**

दरम्यान, हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक घाट, पुणे, सातारा या भागांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा काल निकाल लागला. १३ संचालकांसाठी काल मतदान झालं होतं. बँकेच्या २१ संचालकांपैकी आठ सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण २१ सदस्यांपैकी दोन मंत्री, एक खासदार, पाच आमदार या संचालक मंडळावर निवडून आले आहेत. 

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इन्टॅक या संस्थेच्या वतीने काल शहरात गांधी पुतळा ते अप्पा हलवाई असा हेरिटेज वॉक घेण्यात आला. शहागंज इथल्या ऐतिहासिक गांधी पुतळ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात आणि शीख पंथाचे आदरणीय भाई दयासिंहजी यांच्या ३६५व्या जयंती वर्षाच्या औचित्याने हा उपक्रम राबवण्यात आला. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी आणि आदित्य वाघमारे यांनी यावेळी शहागंज, सराफा, धावणी मोहल्ला आणि पानदरीबा परिसराचा रंजक इतिहास कथन केला. महापौर समीर राजूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

****

राज्य परिवहन विभागाच्या धाराशिव विभागातर्फे काल ३० राजमाता जिजाऊ बसचं लोकार्पण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रत्येक गावापर्यंत आणि खेड्यापर्यंत दळणवळण सुविधा सुनिश्चित करण्यासाठी आणखी बसेस देण्याबाबत पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

****

बीड जिल्ह्यात येत्या ३१ जुलै पर्यंत 'स्टॉप डायरिया अभियान' राबवण्यात येत आहे. याअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांनी केलं आहे.         

****

छत्रपती संभाजीनगर शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांच्या रुंदीकरणाला गती देण्यासाठी महानगरपालिका यंदाच्या पावसाळ्यात टीडीआर प्रक्रिया राबवणार आहे. याअंतर्गत, नगर भूमापन कार्यालयाकडे रीतसर शुल्क भरणा केलेल्या चंपा चौक ते जालना रोड या रस्त्यासाठी पावसाळ्यातच जॉइंट टोटल स्टेशन सर्व्हे केला जाईल. हा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर तातडीने पुढील भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया हाती घेतली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 July 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...