Friday, 31 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 31 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. फुलंब्री, कन्नड, सोयगाव, पैठण याठिकाणीही जोरदार पाऊस झाला. पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या ५७ हजार ४६३ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असून, धरणाची पाणीपातळी सुमारे ७२ टक्क्यांवर पोहोचली आहे.

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागातही रात्रभरापासून पावसाची संततधार सुरूच आहे.

हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्यांदाच या पावसाळ्यात कयाधू नदीला पूर आला आहे. कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव इथल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे कळमनुरी-बोल्डा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांत काल रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. ज्या ठिकाणी अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत, त्या भागातही पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवामान विभागाने आजही लातूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

नांदेड जिल्ह्यात किनवट आणि माहूर इथं मुसळधार पाऊस झाला. पैनगंगा नदीवर किनवट तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा यावर्षी पहिल्यांदाच प्रवाहित झाला आहे.

****

ठाणे जिल्ह्यात भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातल्या गंगाराम वाडी परिसरात चार मजली इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तीन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं असून, अजूनही काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

****

कोल्हापुरात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडला असून, एक हजार ४२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातले अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

वाशिम जिल्ह्यातही मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. या मोसमात पहिल्यांदाच पावसाने सातत्य राखल्याने पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळालं आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात सर्वत्र काल सायंकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. तापी नदीवरील हतनूर आणि गिरणा नदीवरील धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाल्यांना आलेला महापूर, वीज पुरवठा खंडित होणं, आणि घरांमध्ये साचलेलं पाणी यामुळे या परिसरात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

****

उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बीड इथं जिल्हा रुग्णालयात भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध विभागांच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि संबंधित विभागांशी चर्चा करून प्रलंबित कामांबाबत सूचना दिल्या. नागरिकांच्या अडचणीही त्यांनी ऐकून घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना केल्या.

****

राज्यातल्या मालमत्तेच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच ‘लॅण्ड टायटलिंग ॲक्ट’ लागू करण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं त्यांनी काल ठाणे इथं सांगितलं. या नव्या व्यवस्थेमुळे प्रत्येक मालमत्ताधारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळून सर्व तपशील उपलब्ध होईल, तसंच शहरांतल्या प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ दिलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

जागतिक मानव तस्करीविरोधी दिनानिमित्त जालना जिल्ह्यात मानव तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे. ‘सजग नागरिक, सुरक्षित समाज’ हा संदेश देत या जनजागृती व्हॅनला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही व्हॅन जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरून मानव तस्करीविरोधात जनजागृती करणार आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातल्या रेणापूर प्रकल्पाची उंची वाढवणं आणि भूसंपादनाच्या कामासाठी राज्य सरकारने १० कोटी ८५ लाख रुपये निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कामासाठी हा निधी देण्यात येणार आहे.

****

ग्लासगो इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारोत्तोलनात पुरुषांच्या ११० किलो वजनी गटात लवप्रीत सिंगने रौप्य पदक जिंकलं. तर महिलांच्या थाळीफेक मध्ये सीमा कलीरामना हिने कांस्य पदक पटकावलं.

पुरुषांच्या भालाफेकमध्ये निरज चोप्रासह रोहित यादव आणि यशवीर सिंह अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. तिहेरी उडी प्रकारात प्रवीण चित्रवेल आणि सेल्वा प्रभू, पुरुषांच्या डेकॅथलॉन मध्ये तेजस्विन शंकर अंतिम फेरीत खेळणार आहेत.

या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, दहा रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण १७ पदकं जिंकली आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...