Tuesday, 21 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राममंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी वरुन दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ

·      संसदेतल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी उत्साहानं सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

·      शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांना निवेदन सादर

·      यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना जाहीर

आणि

·      गंगाखेड इथल्या श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८ कोटी ५५ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी, तर, धाराशिव जिल्ह्यातल्या शाळांसाठी २२ कोटींच्या निधीला मान्यता

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काल पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राममंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरुन दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचं कामकाज अडीच वाजेपर्यंत आणि नंतर तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरु झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या, वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

**

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या ३४ वरुन ३८ पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काल सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे.

****

संसदेतल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी उत्साहाने सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल अधिवेशनाच्या प्रारंभी प्रसार माध्यमांशी बोलत होते. देशाने विकासाचा वेग पकडला असून, संसदेतील सकारात्मक, तर्कसंगत आणि तथ्याधारित चर्चा या विकासाला नवी ऊर्जा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातल्या युवा शक्तीच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक करत त्यांनी, गेल्या महिनाभरात भारताने अनेक ऐतिहासिक यश मिळवल्याचं सांगितलं. मोसमी पाऊस आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन यांची तुलना करत, दोन्ही सक्रिय राहिल्यास देशाच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं.

****

नीट पेपरफुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काल जंतरमंतरहून संसदेवर मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, सीजेपीच्या दोन सदस्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. त्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन नड्डा यांच्याकडे सादर केलं.

दरम्यान, संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळाने केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतरमंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं काल जाहीर केलं.

**

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथं काल क्रांती चौक परिसरात विविध पक्ष संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, तसंच कार्यकर्ते उपस्थित होते.

**

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली. लातूरमध्ये विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांनी गांधी चौकात धरणे आंदोलन केलं.

****

प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त एक ऑगस्ट रोजी पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता यावी यासाठी वर्षभरातल्या सर्व वैधानिक बैठकींचं वेळापत्रक आगाऊ निश्चित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथल्या श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८ कोटी ५५ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत, विविध तीर्थक्षेत्रांच्या ११५ कोटी रुपयांच्या विकासाकामांना मंजुरी देण्यात आली. या आराखड्यामुळे वारकरी, भाविक आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून, गंगाखेड हे संत जनाबाईंच्या आध्यात्मिक वारशाचं महत्त्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

समग्र शिक्षा अभियान आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या समन्वयाने धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शासकीय आणि जिल्हा परिषद शाळेच्या २०३ वर्गखोल्यांना २२ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत याबाबत अतारांकित प्रश्न दाखल केला होता.

****

नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्याचे निर्देश, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं महसूल अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानांचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. या इमारतीसाठी १५ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यातून २० निवासस्थानांचं बांधकाम केलं जाणार आहे. शहरात सहकार भवन उभारण्यासाठी मान्यता मिळाली असून त्याचं कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

****

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात पुरंदवडे इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पादुका पूजन आणि अश्वपूजन करून पालखीचं स्वागत केलं. अकलूज इथं पालखीचा गोल रिंगण सोहळा झाला. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं कवेदंड इथं चौथा रिंगण सोहळा पार पडला. ही पालखी आज कुर्डू मुक्कामावरून अरण कडे प्रस्थान करेल.

****

आषाढी एकादशीचा सोहळा येत्या शनिवारी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जवळच्या पंढरपूर इथं होणाऱ्या यात्रेत भाविकांसाठी स्वच्छता, शुद्धपेयजल, मोफत आरोग्य सुविधा, हिरकणी कक्ष, फिरती शौचालये इत्यादी सुविधा पुरवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम यांनी दिले आहेत. काल यासंदर्भातल्या बैठकीत त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या.

****

छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांची अध्यक्षपदी तर भारतीय जनता पक्षाचे राम शेळके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काल ही निवड प्रक्रिया पार पडली.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्यापासून 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' राबवण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या २२ जुलै रोजी धाराशिव इथं भाजपच्या वतीने जिल्हाभर "वृक्षारोपण आणि संगोपन अभियान" सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक बूथवर किमान एक झाड लागेपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.

****

परभणी इथं येत्या २४ जुलैला 'नैसर्गिक शेती समृद्ध शेतकरी राष्ट्रव्यापी अभियान' होणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि दिंडोरीचे श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित या अभियानात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

****

महाराष्ट्रातून बोधगया इथं दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना कायमस्वरूपी आणि दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, बोधगया इथं १० एकर जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुंबईत दादर रेल्वे स्थानकावरुन काल बोधगयेला जाणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते.

****

हवामान 

राज्यात मुंबई, ठाणे, रायगड पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कोकणात इतर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात बहुतांश भागात आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...