Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 11
July 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी न्युझीलंडच्या दौऱ्यावर असून उभय देशातील संबंध दृढ करुन
व्यापारविषयक धोरणांना बळकटी देणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. आज पंतप्रधान मोदी आणि
न्युझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात ऑकलंड इथं द्विपक्षीय बैठक झाली.
या बैठकीत दोन्ही देशात काही व्यावसायिक करार झाले आहेत, व्यापार, औषधी, तंत्रज्ञान, नाविन्यिकरण, रोजगार क्षेत्रात दोन्ही
देश एकमेकांशी सहकार्य करणार असल्याचं पूर्वेकडील देशांचे प्रभारी सचिव, रुद्रेंद टंडन यांनी ऑकलंडमध्ये सकाळी आयोजित
वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. २०३० पर्यंत भारत न्युझीलंडसोबतचा व्यापार दुपटीने
वाढवणार असून पशुपालन आणि डेअरी व्यवसाय वृद्धीसाठी दोन्ही देश सहकार्य करणार असल्याचं
परिषदेत सांगण्यात आलं आहे.
****
पुणे इथं मोशी कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेचा आजचा तिसरा दिवस असून ७० तासांहून
जास्त कालावधी उलटल्यानंतरही, आठ कामगार अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. त्यांना
सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि अन्य यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
आहे. मात्र, ढिगारा हटविल्यानंतर अतिदाबामुळे कचरा पुन्हा इमारतीच्या दिशेने
सरकत असल्याने बचावकार्याला मोठे अडथळे येत आहेत. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाला इमारतीत
प्रवेश करणे कठीण होत आहे. मोशीच्या खाणी परिसरातील डेपोमध्ये कचरा टाकला जातो. मात्र, बुधवारी कचऱ्याचा प्रचंड
ढिगारा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या आवारातील इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत एकूण
२३ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी काहींना बाहेर काढण्यात यश आलं.
****
नागपूर इथं आज ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक केंद्रीय परिवहन
मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भारताच्या यंदाच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत
या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात,इजिप्त, इंडोनेशिया, इथोपिया या सदस्य देशांच्या
परिवहन मंत्र्यांनी आपापल्या देशाच्या परिवहन संदर्भातील घोषणापत्रांचे सादरीकरण केलं.
परिवहन संदर्भातील हे घोषणापत्रं संमत करण्यात आल्याचं या बैठकीनंतर मंत्री गडकरी यांनी
सांगितलं.
****
राज्यात खरीप हंगामातील पेरणीसंबंधी कृषी आयुक्तालयाचा नुकत्याच अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार, ऊसासह एकूण ६५ लाख ८२ हजार
६२३ हेक्टर, म्हणजे ४२ टक्के क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. विभागनिहाय
स्थितीवर नजर टाकली असता, छत्रपती संभाजीनगर विभागात, ५० टक्के, लातूर विभागात ४४ टक्के, पेरणी पुर्ण झाली आहे.
पिकनिहाय चित्र पाहिले असता, तेलबियांची ६० टक्के, कापसाची ४९ टक्के, कडधान्यांची ३७ टक्के आणि
तृणधान्यांची ३० टक्के पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रात
असून, भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी
झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून, काही भागांत भाताची पुनर्लागवड
सुरू आहे.
****
राज्यात पडणाऱ्या पावसानंतरही छत्रपती संभाजीनगर विभागातील जलप्रकल्पात केवळ २४
पूर्णांक ९८ शतांश टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.
****
अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २७ टक्के जलसाठा शिल्लक असून, अनियमित पावसामुळे भविष्यातील
पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण असमान आहे. आतापर्यंत दमदार
पाऊस न झाल्याने प्रकल्पांतील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. आगामी काळातही पावसाने
पाठ फिरवली, तर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते, असं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. दरवर्षी ११ जुलै रोजी साजरा होणारा हा दिवस, लोकसंख्या वाढीशी संबंधित
आव्हाने आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो. लोकसंख्येसंबंधित
समस्यांकडे लक्ष वेधणं आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं प्रयत्नांना प्रोत्साहन देणं हा
या दिनाचा उद्देश आहे. जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात १९८९ मध्ये संयुक्त राष्ट्र
विकास कार्यक्रमाच्या तत्कालीन नियामक परिषदेने केली होती. त्यानंतर, १९९० मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने
एक ठराव मंजूर करून हा दिवस नियमितपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला. "आज आणि भविष्यासाठी
युवकांच्या आशा-आकांक्षा साकार करणं" ही
या वर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची संकल्पना आहे.
****
राज्यातील
महसूल विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सरकारने मोठी कारवाई
करण्याचा इशारा दिला आहे. महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या
जमिनी बळकावल्याच्या आणि विकासकांना लाभ मिळवून दिल्याच्या आरोपांप्रकरणी दोषी
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाईच नव्हे,
तर थेट फौजदारी गुन्हेही दाखल केले
जातील, असा
इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
****
सप्तश्रृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं
आहे.
****
वृक्षारोपणाची कामं केवळ कंत्राटदारांमार्फत न करता, निसर्ग संवर्धनासाठी सातत्यानं
कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना यासाठी प्राधान्य द्यावं, अशी मागणी बीड जिल्ह्यातील
आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान
प्रश्नोत्तराच्या सत्रात धस यांनी सभागृहात वृक्षारोपण - वृक्षसंवर्धनाबाबत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला.
****
No comments:
Post a Comment