Saturday, 25 July 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जुलै २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो, अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो, अशी प्रार्थनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

****

महाराष्ट्रात आज सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह असून पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्या समवेत यंदाचे मानाचे वारकरी धारशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने, आणि प्रभावती माने यांनीही विठूरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दरम्यान, आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आषाढी एकादशीनिमित्त मोठा उत्साह असून वाळूज पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच रांग लागली आहे. शहरातून तसंच लगतच्या परिसरातून या ठिकाणी पायी दींड्यांचं आगमन होत असून वारकरी भक्तीमय वातावरणात वाळूज इथल्या पंढरपूरकडे निघाले आहेत. शहरातील रस्त्यावर वारकऱ्यांच्या सोईसाठी फराळ आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे तसंच या अनुशंगानं शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचही आयोजन करण्यात आलं आहे.

****

आषाढी एकादशीनिमित्त जालन्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामी मंदिरातून पारंपरिक पालखी मिरवणूक उत्साहात निघाली. सुमारे तिनशे वर्षांची परंपरा असलेल्या या सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पंढरपूरला जाऊ न शकणारे हजारो भाविक जालन्यात आनंदी स्वामींच्या दर्शनासाठी येतात. "भज गोविंद भज गोपाल" आणि "स्वामी आनंदी दीनदयाळ"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे.

****

आषाढी एकादशीनिमित्त 'विदर्भाची पंढरी' समजल्या जाणाऱ्या शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज मंदिरात "गण गण गणात बोते" च्या जयघोषात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. काल रात्रीपासून मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आल्याने महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांतून लाखो वारकरी शेगावात दाखल झाले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी श्री गजानन महाराज संस्थान आणि प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त, पिण्याचे पाणी, प्रसाद, निवारा आणि वैद्यकीय मदतीचे विशेष नियोजन करण्यात आलं आहे.

****

पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही, तोपर्यंत 'सिंधू जल करार' स्थगितच राहील, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता; याबाबत पाकिस्तानी प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. २० ते २३ जुलै दरम्यान जम्मू आणि लगतच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाकिस्तानच्याच लाहोर येथील 'पूर अंदाज विभागानेही' मुसळधार पावसामुळे चिनाब नदीला पूर आला असल्याचं म्हटलं आहे. नदीच्या पाणी पातळीतील ही वाढ म्हणजे मुसळधार पावसाचा एक नैसर्गिक परिणाम असून, भारतानं कोणतीही जाणीवपूर्वक कृती केल्याने हा पूर आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

****

जम्मू आणि काश्मीरमधील खराब हवामानामुळं सहा दिवस स्थगित करण्यात आलेली वार्षिक श्री अमरनाथ यात्रा आज पुन्हा सुरू झाली आहे. बाल्टाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाल्याचं काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी आकाशवाणीला सांगितलं. सुरक्षित यात्रेसाठी प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला यात्रेकरूंना देण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर यात्री निवास इथून सहा हजार २६९ यात्रेकरूंची नवीन तुकडी रवाना झाली.

****

मराठवाड्यात आज काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

****

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये, हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे चार वाजता हा सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं सात गडी राखून विजय मिळवत मालिकेत एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे. टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे; दोन्ही संघांमधील १५ सामन्यांपैकी भारतानं १२ सामने जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेनं तीन सामन्यात विजय मिळवला आहे.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...