Thursday, 16 July 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.07.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      हायड्रोजनवर धावणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला उद्यापासून हरयाणात सुरुवात

·      रेल्वे तिकिट आरक्षण अधिक सुलभ करण्यासाठी IRCTCचं नवीन पोर्टल

·      वयोवृद्ध तसंच दुर्धर रुग्ण कैद्यांच्या मुदतपूर्व सुटकेसंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

·      मोसमी पावसाच्या ओढीमुळे राज्यात आतापर्यंत फक्त ५६ टक्के क्षेत्रावर पेरणी

·      ओडिशात जगन्नाथ पुरी इथल्या रथयात्रेला प्रारंभ

आणि

·      धाराशिव तसंच बीड इथं भूगर्भातून मोठा गूढ आवाज

****

देशभरात हायड्रोजनवर धावणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला उद्यापासून सुरुवात होत आहे. हरयाणात जिंद रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वे गाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वे गाडी संपूर्णपणे स्वदेशी निर्मित आहे. ‘ग्रीन हायड्रोजन’च्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. 

****

रेल्वे तिकिट आरक्षण अधिक सोपं व्हावं यासाठी IRCTC नं नवीन बिटा वेबसाईट सुरु केली आहे. या संकेतस्थळावर अनावश्यक कॅपचा, पॉपअप्स, फ्लॅशिंग ग्राफिक्स किंवा इतर अडथळा आणणारे घटक नसतील. सर्व श्रेणीतल्या जागांची उपलब्धता यावर दिसेल. तिकिट आरक्षणासाठीच्या आवश्यक टप्प्यांची संख्या कमी होऊन, चेकआऊटची प्रक्रिया जलद होईल. तसंच या संकेतस्थळावर प्रवाशांची माहिती जतन केली जाईल, त्यामुळे पुढच्या वेळी आरक्षण करताना प्रक्रिया सुलभ होईल. सध्याच्या संकेतस्थळाच्या होम पेज वर देखील बिटा व्हर्जनची लिंक उपलब्ध आहे.

****

केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून, आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रति लिटर साडे १५ रुपये, तर विमान इंधनावर प्रति लिटर साडे १४ रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलच्या निर्यात शुल्कात मात्र प्रतिलिटर अडीच रुपये कपात करण्यात आली आहे. 

इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत.

****

देशभरातल्या १२० नवीन ठिकाणांशी संपर्क व्यवस्था सुधारणं आणि  पुढच्या १० वर्षांत चार कोटी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं हे उडान योजनेच्या पुढच्या टप्प्याचं उद्दिष्ट असल्याचं नागरी उड्डयन मंत्री के राममोहन नायडू यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथे उडान योजनेच्या पुढच्या टप्प्याबाबत एका कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारने या टप्प्यासाठी २९ हजार कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच केली असून, पुढील दशकात आणखी १०० विमानतळ आणि २०० हेलिपोर्ट्स विकसित करण्याचं उद्दिष्ट असल्याचं नायडू यांनी सांगितलं.

****

वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करुन येत्या तीन महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप महेता यांच्या पीठानं एका जनहित याचिकेवर हा आदेश देताना नवीन कार्यपद्धती ई प्रिझन्स पोर्टलवर उपलब्ध करुन द्यावी, असंही सांगितलं आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसच्या अभ्यासक्रमात इयत्ता पाचवी किंवा सहावीपासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचना, सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तमिळनाडूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध तमिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने, सीबीएसच्या अभ्यासक्रमात नवव्या इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी चिंता व्यक्त केली. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता पाचवी किंवा सहावीपासून त्रिभाषा सूत्र लागू करावं, असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत म्हटलं आहे. 

****

मोसमी पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी विभागाच्या १३ जुलैच्या अहवालानुसार, राज्यातील सरासरी १ कोटी ५७ लाख ४७ हजार ८६२ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी ८७ लाख ८२ हजार ७७२ हेक्टर, म्हणजेच केवळ ५६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊसासह विचार केल्यास ६० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी झालेल्या पिकांनाही ओलाव्याची गरज आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.

****

महिला या कृषी क्षेत्राचा कणा असल्याचे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय शेती आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचा ४५ वा स्थापना दिन आज पुण्यात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भरणे बोलत होते. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष-२०२६ निमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिला शेतकरी, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयं-सहाय्यता बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांचा गौरव करण्यात आला. शेतकरी कल्याणासाठी राज्य शासन राबवत असलेल्या विविध योजनांची कृषिमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.

****

ओडिशात जगन्नाथ पुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपले ज्येष्ठ बंधु बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडिचा मंदिराकडे प्रस्थान करतात. या मंदिरात त्यांचा पुढचे नऊ दिवस मुक्काम असतो.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथंही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत-इस्कॉन संस्थेच्या वतीने रथयात्रेचं आयोजन केलं जातं. सिडको एन सात परिसरात होणाऱ्या रथयात्रेत ही नागरिकांची जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी होते.

**** 

आषाढी वारीत पंढरपूरकडे निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज दांडेगाव इथं मुक्कामी असेल, उद्या पहाटे पालखी अनाळे मुक्कामाकडे प्रस्थान करेल. संत तुकाराम महाराजांची पालखी आज काटेवाडी इथं तर संत ज्ञानेश्वरांची पालखी आज तरडगाव इथं मुक्कामी असेल.

****

धाराशिव शहरात आज सकाळी भूगर्भातून मोठा आवाज झाला. यामुळे खिडक्यांची तावदानं हादरली तसंच जमीनही कंप पावल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे नागरिक भयभीत झाल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

बीड जिल्ह्यातही अनेक तालुक्यांमध्ये आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून गूढ स्वरूपाचा मोठा आवाज ऐकू आला. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकजण घराबाहेर आले. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये तसंच सामाजिक माध्यमांवर चुकीची माहिती प्रसारित करणे टाळावे, असं आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध लागवड आणि तस्करी विरुद्ध पोलिस प्रशासनानं कठोर भूमिका घेतली असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत किल्लारी पोलिसांनी सुमारे ८ लाख रुपये किमतीच्या गांजा शेती प्रकरणातील फरार आरोपीस सापळा रचून अटक केली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ८० किलो वजनाचा अंदाजे ८ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोपी फरार झाला होता.

****

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या ३० जुलै रोजी होणार असून, यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पद्मभूषण डॉ. जे. बी. जोशी यांना विद्यापीठाची मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. यावेळी विविध शाखांतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

****

क्रिकेट

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं सुरु आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेंव्हा भारताच्या आठव्या षटकात एक बाद ४४ धावा झाल्या होत्या. या मालिकेत भारतानं पहिला सामना जिंकत एक –शून्यनं आघाडी घेतली आहे.

****

हवामान

मराठवाड्यात बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नांदेडसह धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला तसंच वाशिम आणि यवतमाळसह विदर्भात बहुतांश भागाला उद्याही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर परिसरात आज सायंकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ३१ पूर्णांक ४२ शतांश, येलदरी सुमारे ६२, माजलगांव १६ पूर्णांक ७९ शतांश, मांजरा १६ पूर्णांक ६३ शतांश तर विष्णुपुरी प्रकल्पात सुमारे ३५ टक्के पाणीसाठा झाला आहे.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...