Sunday, 26 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.07.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली

·      मन की बात मधून पंतप्रधानांचं पर्यावरण रक्षणाचं आवाहन, कॅच द रेन मोहिमेतील नाशिककरांच्या कामाबद्दल मोदींचे गौरवोद्गार

·      दमदार पावसामुळे जायकवाडीत पाण्याची मोठी आवक, नाथसागरात पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

·      ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला भारोत्तोलनात पहिलं पदक, ऋषीकांता सिंगची 60 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई 

·      झिम्बाब्वे-भारत तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना हरारेमधे सुरू

****

कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना कारगिल विजय दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांतून आदरांजली वाहण्यात आली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम  द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्करप्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आणि उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

****

कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा एकशे छत्तीसावा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठ कणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं.

त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शौर्य विजय यात्रेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. एक यात्रा, एक राष्ट्र, एक सलाम हा संदेश देण्यासाठी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघालेली ही यात्रा कारगिलच्या युद्ध स्मारकापर्यंत जाणार आहे.

एक पेड माँ के नाम या उपक्रमाच्या सफलतेची उदाहरणंही त्यांनी दिली. रिड्यूस, रियूज आणि रीसायकल ही आज घोषणा नाही तर आपल्या जीवनाचा भाग बनली असल्याचं ते म्हणाले.

कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून, त्याअनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

बाईट - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पर्यावरण संवर्धनाच्या मुद्यावर बोलताना पंतप्रधानांनी सांगितलं, गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे, अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्गपूजाच ठरेल.

येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं 'हर घर तिरंगा या मोहीमेला उत्साहानं पुढे न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक कनिष्ठगट स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल अनाहत सिंगचं अभिनंदन केलं आहे. कनिष्ठगट स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी अनाहत ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

****

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरीपुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.

****

युवकांनी कौशल्य विकासाच्या वाढीकडे विशेष लक्ष द्यावं, असं आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नागपूरमध्ये कौशल्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पदवी आणि रोजगारक्षमता यात मोठा फरक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. युवावर्ग योग्य कौशल्याअभावी हा रोजगार मिळवू शकत नाही, हे लक्षात घेऊन सरकारनं कौशल्य विकासाचे कार्यक्रम हाती  घेतल्याचं  त्यांनी सांगितलं. आपण महाराष्ट्रातच राहणार आहोत, असं बातमीदारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर परिसरात वेगानं वाढत असलेल्या विविध उद्योगांना या केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ मिळू शकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

****

कारगिल युद्धातल्या शहीद जवानांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेचा इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कारगिल स्मृतीवनाचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे. त्यासाठी शासनानं सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हे स्मृतीवन केवळ उद्यान नसून राष्ट्रभक्ती, प्रेरणा आणि शौर्याचे जिवंत स्मारक म्हणून विकसित करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले. कारगिल विजय दिनानिमित्तच्या छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरातल्या कारगिल स्मृती उद्यानात आयोजित विरांना मानवंदना या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना अभिवादन करण्यात आलं. तसंच युद्धातल्या वीर सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीर सैनिक कॅप्टन सुरेंद्र सुर्वे, कारगिल स्मृतीवन समितीचे पंकज भारसाखळे, कारगिल युद्धातील वीर सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक, छावणी चौकासह शहरातील विविध ठिकाणी कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी योग अँड स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन, सायकलिस्ट फाउंडेशनकडून क्रांती चौकात सकाळी अभिवादन करण्यात आले. छावणी परिसरात माजी सैनिक तसेच सैन्यातील विविध पदावरील सैनिकांच्या वतीने हुतात्म्य झालेल्या सैनिकांना अभिवादन करण्यात आले.

****

छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आज तिरंगा विजय जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह आदी पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा दिल्याबद्दल हा विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.

****

पैठण इथल्या जायकवाडीच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळं गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुराचं पाणी जायकवाडीत दाखल होत असल्यानं नाथसागर जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होण्यास सुरुवात झाली. आज सायंकाळपर्यंत नाथसागरातील पाणीसाठा ५२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

****

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पांझरा नदीच्या उगम परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळं पांझरा नदीवरील लाटीपाडा आणि जामखेडी हे मध्यम प्रकल्प तसंच शेलबारी आणि विरखेल हे लघुप्रकल्प शंभर टक्के भरून ओसंडून वाहू लागले आहेत. धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पांझरा नदीच्या पुरामुळे दोघांचा मृत्यू झाला. पिंपळनेरजवळील बल्हाणे शिवारात नदीत गेलेल्या भरत माळी यांचा मृतदेह सापडला. तर साक्री तालुक्यातील नांदवण इथल्या पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेले प्रदीप दिलीप पाटील यांचा मृतदेह पांझरा आणि कान नदीच्या संगमाजवळ आढळून आला.

****

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण-अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आजची ‘जेन-झी’, सरकारला आव्हान देऊ शकते, हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

****

बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लोकशाही, संविधान आणि विद्यार्थी आंदोलनाचा विजय असल्याची भावना व्यक्त करत आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर समविचारी पक्षांच्या वतीनं जल्लोष व्यक्त करण्यात आला.

****

झिम्बाब्वे बरोबरच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना आज हरारे इथं सुरू आहे. या सामन्याआधीच भारतानं या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने २० षटकात पाच बाद १९२ धावा केल्या आहेत.

****

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला भारोत्तोलनात पहिलं पदक मिळालं आहे. मणिपूरच्या ऋषीकांता सिंगने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात ऋषीकांताने एकूण २६४ किलो वजन उचललं. यामध्ये स्नॅचमध्ये त्याने १२१ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १४३ किलो वजन उचललं आहे.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...