Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 19
July 2026
Time 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १९ जुलै
२०२६ दुपारी
१.०० वा.
****
संसदेच्या
उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर,
आज केंद्र सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठक
घेण्यात येत आहे. संसद भवन परिसरात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू या बैठकीत सहभागी झाले. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर
लगेचच विरोधी पक्षातील घटक पक्षांच्या नेत्यांनी सभात्याग केला होता. तृणमूल कांग्रेसच्या
खासदार महुआ मोईत्रा यांनी यासंदर्भात बोलतांना; बैठकीत सहभागी नेशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया–एन.सी.पी.आय संसद
मान्य पक्ष नसल्याचा आरोप करत असल्याचं सांगून याच्या विरोधासाठी कांग्रेस,
समाजवादी पक्ष,
द्रमुक,
झारखंड मुक्ती मोर्चा,
तृणमूल कांग्रेस आणि आम आदमी पक्षांसहीत
सर्वच विरोधी पक्षांनी सुरुवातीला सभेवर बहिष्कार टाकल्याचं नमूद केलं. काही वेळानंतर
विरोधी पक्षातील नेते बैठकीत पुन्हा सहभागी झाले.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू आज तीन देशांच्या ऐतिहासिक दौऱ्यासाठी रवाना झाल्या आहेत. या अंतर्गत
मोल्दोव्हा आणि उत्तर मॅसेडोनियाला भेट देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत.
रोमानिया देशालाही त्या भेट देणार आहेत. या दौऱ्यातून द्विपक्षीय संबंधांना एक नवी
दिशा मिळणार आहे.
****
महान
क्रांतिकारक मंगल पांडे यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयंतीनिमित्त
त्यांना आदरांजली वाहिली आहे. मोदी यांनी या संदर्भात सामाजिक संपर्क माध्यमातल्या
आपल्या संदेशात म्हटलं आहे की, त्यांचं धैर्यपूर्ण जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान
जागवतं. त्यांच्या शौर्यगाथेतून देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा मिळत राहील. केंद्रीय
मंत्री अमित शाह, राजनाथ
सिंह यांनीही मंगल पांडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे.
****
राज्यातील
विविध शासकीय परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारशी करण्यासाठी
राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या
संदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं आपला अहवाल दोन महिन्यांत शासनाला
सादर करायचा आहे.
****
गेल्या
दीड महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला,
तरी आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी
अनुकूल वातावरण तयार होत आहे. विशेषतः घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह
पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. सोयाबीन,
कापूस आणि इतर खरीप पिकांना पाण्याअभावी
फटका बसत होता. काही भागांत दुबार पेरणीची वेळही आली होती. आज अहिल्यानगर,
बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात
आला आहे. उद्या मराठवाड्यातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात तब्बल तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर काल दमदार पावसानं हजेरी लावली.
जालना जिल्ह्यातल्या शेवगळ तांडा परिसरात काल झालेल्या ढगफुटीसदृश पावसानं शेतातली
पिकं पाण्याखाली गेली. जिल्ह्यात खरीपाचं एकूण प्रस्तावित क्षेत्र सहा लाख,
५१ हजार १७३ हेक्टर असून,
आजपर्यंत चार लाख ९७ हजार ९३७ हेक्टर
क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण सुमारे ७६ टक्के आहे. जालना जिल्ह्यात
पेरणीनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून पावसानं पुन्हा ओढ दिल्यामुळं नव्यानं उगवलेली
पिकं करपण्यास सुरुवात झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्य
परिवहन महामंडळ-एसटी बसगाड्यांच्या प्रवास दरात जवळपास साडेतेरा टक्के वाढ झाली असून
ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू झाली. आधीच आरक्षीत तिकीटांना ही दरवाढ लागू असणार नाही.
****
दोन
वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिनं आज प्रथमच जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं
विजेतेपद पटकावलं. हा प्रतिष्ठेचा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली.
अंतिम सामन्यात तिनं यजमान देशाच्या आणि तीन वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुची हिचा
२१-१७, २१-१७ अशा
सरळ डावांमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीत चेन यूफेईचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम
फेरीत पोहोचणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरली होती. सिंधूनं यापूर्वी २०२४ मध्ये सैयद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं
होतं. २०१९ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतरचं हे तिचं सर्वात
मोठं यश ठरलं आहे.
****
महिलांच्या
कुस्तीमध्ये, काल
हंगेरीतील बुडापेस्ट इथं झालेल्या रँकिंग स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजलने महिलांच्या
७६ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. ५३ किलो वजनी गटात अंतिम फेरीत,
दुखापतीमुळे सुवर्णपदकाची लढत गमावल्यानं
भारताच्या अंतिम पंघाल हीला - रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. तर,
५७ किलो वजनी गटात नेहा शर्मा हिनं
रौप्य पदकाची कमाई केली.
****
स्कॉटलंडच्या
ग्लासगो इथं २३ जुलै रोजी सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची ऑलिम्पिक
पदक विजेती भारोत्तोलनपटू मीराबाई चानू आणि मुष्टीयुद्धपटू लव्हलिना बोरगोहेन यांची
उद्घाटन सोहळ्यासाठी ध्वजवाहक आणि मशालवाहक म्हणून निवड झाली आहे. भारतीय ऑलिम्पिक
संघटनेनं ही घोषणा केली.
****
No comments:
Post a Comment