Tuesday, 14 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 14 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम दिसून येत आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक आढाव्यानुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीची गती मंदावली असून, आधीच पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात या पिकांवर ओलाव्याअभावी ताण निर्माण झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक भागांत पावसाचा दीर्घ खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी बियाण्यांची उगवण अपुरी राहिल्याने दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचं संवर्धन करावं, अनावश्यक मशागत टाळावी आणि स्थानिक कृषी अधिकारी तसंच हवामान विभागाच्या सूचनांनुसार शेतीची कामं नियोजित करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. तसंच जिल्हा प्रशासनाकडून पिकांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार पंचनामे आणि इतर उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

लातूर जिल्हा अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असून, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबवत १८२ विहिरी आणि बोअर अधिग्रहित करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू ठेवला आहे. पावसाचं प्रमाण कमी असल्याने भूजल पातळी अद्यापही पुरेशी वाढलेली नसल्याचा परिणाम पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होत आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि उपलब्ध जलस्रोतांचं संवर्धन करण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

****

भारताचं सर्वात मोठं जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स २०२६’ ला आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सुरुवात झाली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी या चार दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. या प्रदर्शनाची ही तिसरी आवृत्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन, या फाईव्ह एफ संकल्पनेतून प्रेरणा घेतलेल्या या प्रदर्शनात सुमारे वीस हजारहून जास्त वस्त्र उत्पादक आणि सात हजारहून जास्त खरेदीदार सहभागी होत आहेत. या प्रदर्शनात वीसहून जास्त देशांचे तज्ज्ञ, भारतीय उद्योग क्षेत्रातले प्रमुख यांच्यासह साडेतीनशेहून जास्त प्रतिनिधीही सामील होत आहेत.

****

थोर तत्वचिंतक, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगरकर यांना वंदन करत आदरांजली वाहिली आहे.

****

लातूरमधील ‘आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन’ या स्वयंप्रेरित पर्यावरण संस्थेला महाराष्ट्र शासनाचा संभाजीनगर विभागातला दुसरा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार-२०२४’ जाहीर झाला आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि शहर स्वच्छता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लातूर शहरात गेल्या २ हजार ५९९ दिवसांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत फाउंडेशनने आतापर्यंत सुमारे तीन लाख पंच्याहत्तर हजार वृक्षांचे रोपण आणि संगोपन केलं आहे. वृक्षलागवडीबरोबरच शहर स्वच्छता, प्लास्टिकमुक्त लातूर अभियान, पोस्टर फ्री लातूर उपक्रम, कापडी पिशव्यांचं वितरण, इको ब्रिक्स तयार करून त्यापासून सार्वजनिक बेंच उभारणं, तसंच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती करण्याचे विविध उपक्रमही संस्थेने राबवले आहेत.

****

लातूर इथं आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘चरण सेवा' या उपक्रमात दोनशे पन्नासहून अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, वसंतराव काळे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि लातूर महापालिकेचा आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला. यामध्ये, नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरहून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या सद्गुरु श्री गुंडा महाराज संस्थानच्या दिंडीतल्या वारक-यांची आरोग्य तपासणी करून त्यांना निशुल्क औषधोपचार देण्यात आले.

****

महाकवी कालिदास दिन उद्या साजरा होत आहे, यानिमित्त साहित्‍य भारती आणि संस्‍कृत प्रतिष्ठानम्‌ यांच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. निवेदिता सराफ यांच्या विशेष व्‍याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. टिळक नगर परिसरातल्या जीवन विकास ग्रंथालयात सायंकाळी साडे पाच वाजता हे व्याख्यान होणार आहे.

****

भारत आणि इंग्लंडदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज बर्मिंघम इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल.

**** 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...