Friday, 24 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 24 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जुलै २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात, या संदर्भातल्या मसुद्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रुप देण्यात येईल, आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल, असं सांगितलं.

पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्वरित प्रभावानं एक जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे.

**

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपलं २६ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण काल मागे घेतलं. काल रात्री गुरुग्राममधील एका खाजगी रुग्णालयात, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, वांगचुक यांना शुभेच्छा देत, प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

****

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल भारत टॅक्सी सेवा या पहिल्या चालक मालकीच्या टॅक्सी सेवेची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टॅक्सी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. सार्वजनिक क्षेत्रात टिकून रहायचं असेल तर अशा अॅप आधरित टॅक्सीमध्येही उत्तम दर्जाची वाहतुकीची व्यवस्था देणे गरजेचं आहे, आणि अशी व्यवस्था देण्यासाठी भारत टॅक्सीची सुरुवात झाली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या टॅक्सी सेवेत, चालक केवळ सेवा देणारे नसून सहकारी संस्थेचे मालक आणि भागधारक असतील आणि संस्थेला होणारा नफा लाभांशाच्या स्वरूपात चालकांमध्ये वाटला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि अन्य मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.

****

आषाढी एकादशीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. आषाढी वारीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल वाखरी मुक्कामी होत्या. बाजीराव विहिरीजवळ, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं चौथं गोल रिंगण, तर, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं उभं रिंगण काल पार पडलं.

दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं २३ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत विशेष रेल्वेगाड्या  चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान,शेगाव इथलं संत गजानन महाराज मंदीर आषाढी एकादशीनिमित्त मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

****

भंडारा जिल्ह्यात नियमभंग करणाऱ्या सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले असून ५३ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागानं भरारी पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली. जिल्ह्यात सध्या ८६२ बियाणे आणि खत विक्री कृषी केंद्र आणि ७५४ कीटकनाशक विक्रेते नोंदीकृत आहे. यापैकी ८०२ कृषी केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे.

****

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO नं आज 'कुशा' या लांब पल्ल्याच्या जमीनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची' पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. ओडिशाच्या किनाऱ्यावरील 'ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटा'वरून ही चाचणी करण्यात आली. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्रं, मानवरहित हवाई वाहनं आणि मोठी विमानं यांसारख्या विविध प्रकारच्या हवाई धोक्यांना, मोठ्या पल्ल्याच्या आणि उंचीच्या कक्षेत नष्ट करण्यास ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी डिआरडिओच्या चमुचं अभिनंदन केलं आहे.

****

हवामान

पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेने दिला आहे. विशेषतः पुणे तसंच नाशिक जिल्ह्यात घाटमाथा परिसर, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण भागात पावसाचा जोर अधिक राहणार असून, नागरिकांना आणि प्रवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

****

जम्मू आणि काश्मीर इथं सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि दगड कोसळल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. याठिकाणी अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी काल श्रीनगर आणि श्री माता वैष्णो देवी कटरा दरम्यान एक विशेष रेल्वे चालवण्यात आली. यावेळी अडकलेल्या ६०० हून अधिक प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कॅनडातल्या ऑनतारिओ इथं विश्व कनिष्ठ गट वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिनं मलेशियाची प्रतिस्पर्धी डॉईस ये सान ली हिचा उपउपांत्य पूर्व सामन्यात ११-४, ११-१८,११-३ असा तीन सरळ गेम्समध्ये पराभव केला. तिचा उपांत्यपूर्व फेरीतली सामना इजिप्तच्या हाबिबा रिझ्क हिच्याशी होईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...