Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० जुलै २०२६ सायंकाळी
६.१०
****
· विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप
· माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू-अंतिम
आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
· शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी पन्नास हजार रुपयांची रक्कम
आता दोन लाखांपर्यंत देण्याची घोषणा-२०२५ पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द
· हिंगोलीचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दीपक मोरे यांना
‘विकसित भारत २०२६’ पुरस्कार देऊन गौरव
आणि
· लातूर देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर जाधव याला अटक
****
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा
आज समारोप झाला. २२ जूनपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात ९७ हजार ७०६ कोटी रुपयांच्या
पुरवणी मागण्या मंजूर झाल्या, तर महिला सक्षमीकरण विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक, भारतीय
नागरिक सुरक्षा संहिता सुधारणा विधेयक यासह विविध २१ विधेयकांना या अधिवेशनात विधीमंडळाने
मंजुरी दिली. विधान परिषदेच्या उपसभापतींची निवडणूकही या अधिवेशन काळात पार पडली.
विधीमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन
सात डिसेंबर २०२६ रोजी नागपुरात घेण्याबाबत राज्यपालांकडे शिफारस करत असल्याचं विधानसभा
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यानंतर विधानसभा तसंच विधान परिषदेचं अधिवेशन
संस्थगित झाल्याचं दोन्ही सदनांच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं.
****
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार
अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिलं आहे. आज विधानसभेत विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या
उत्तरात मुख्यमंत्री बोलत होते. या तपासाबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिक माहिती दिली. ते
म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी
योजनेत मिळणारी पन्नास हजार रुपयांची रक्कम आता दोन लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी
केली. याशिवाय २०२५ पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी
जाहीर केलं. यामुळे आता अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता
एआयचा वापर,
स्मार्ट मीटर, खत पुरवठा, बोगस बियाणं, पोलिसांची घरं, यासह
विविध विषयांवर विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात उपस्थित केलेल्या मुद्यांना मुख्यमंत्र्यांनी
उत्तर दिलं.
****
नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव
फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी नाशिकचे विभागीय
आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. या योजनेसंदर्भात झालेल्या आढावा
बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या २०२४ ते २०२६ या कालावधीतील
तपासणीत सुमारे १६ हजार संशयित दावे तसंच शस्त्रक्रियांची नोंद आढळली. त्यापैकी साडे
नऊ हजार प्रकरणं नाशिक जिल्ह्यातली असून, या प्रकरणी नाशिकमधील
पाच रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी
एसआयटी स्थापन करण्यात येत असून, एसआयटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर
दोषींवर कठोर कारवाईचा तसंच अपहार झालेल्या निधीच्या वसुलीचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी
दिला.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांना
सरकारने दिलेल्या निधीचे सामाजिक आणि तांत्रिक लेखा परीक्षण करण्याचा निर्णय राज्य
सरकारने घेतला आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान
परिषदेत ही घोषणा केली. या लेखा परीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची
माहिती मिळणार असल्याचं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर
देत होते.
****
गेल्यावर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर
दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील चौदशेहून अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी
बंधाऱ्याचं नुकसान झालं. त्यातल्या ४५२ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. ४५२ पैकी २५८ कामे पूर्ण
झाली असून १०९ कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील
कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगरविकास विभागामार्फत
समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत
दिली. या समितीचा महिनाभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर १५ दिवसांनी
ऑनलाइन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगरविकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल, असंही सामंत यांनी सांगितलं. सदस्य अंबादास दानवे यांनी यासंदर्भात अल्पकालीन चर्चा
उपस्थित केली,
त्या संदर्भात ते बोलत होते. सध्या योजनेची ८३ पूर्णांक पाच
टक्के कामे पूर्ण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारने उच्च अल्कोहोल
प्रमाण असलेल्या औषधांचे नियमन अधिक कडक करण्यासाठी औषध नियम, १९४५ मध्ये सुधारणा केली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने इथाइल अल्कोहोल
असलेल्या औषधांसाठी परवान्याच्या आवश्यकतेतून असलेली विद्यमान सूट काढून टाकली आहे.
या अधिसूचनेनुसार, ३० मिली पेक्षा जास्त प्रमाणात १२% पेक्षा
जास्त इथाइल अल्कोहोल असलेल्या सर्व औषधांना यापुढे सूट मिळणार नाही.
****
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या
शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी, या दृष्टीने शासन नियमावली तयार करेल, असं
आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील
करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भातील उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये
दिली जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
****
जातपडताळणी प्रक्रियेत सुधारणा
करणारं महाराष्ट्र SC, ST, VJ, NT, OBC, SBC सुधारणा
विधेयक आज विधान परिषदेत मंजूर झालं. विधानसभेने यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली
आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांना सेवामुक्त करण्याची तरतूद
या विधेयकात आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे प्राप्त केलेली पदवी, पदविका किंवा इतर कोणतीही शैक्षणिक अर्हता पडताळणी समितीने जातीचे प्रमाणपत्र रद्द
केल्यावर रद्द होईल. तसेच या व्यक्तीला मिळालेले लाभ वसूल केले जातील. जातीचे खोटे
प्रमाणपत्र सादर करून लाभ घेणाऱ्यांना सहा महिने ते २ वर्ष कालावधीसाठी सश्रम कारावास
दोन हजार ते वीस हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद विधेयकात आहे.
पडताळणी समितीसमोर सादर केलेल्या
जात पडताळणी दाव्यात तथ्य आढळले नाही तर त्याच्या नातेवाईकांची जात वैधता प्रमाणपत्र
पुनर्विलोकन करण्याची तरतूद तसंच पडताळणी समितीच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अपील
प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे.
****
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे यांना ‘विकसित भारत २०२६’ पुरस्कार प्रदान
करण्यात आला. दिल्ली इथं दिल्ली विधानसभेचे सभापती विजेंद्र गुप्ता यांच्या हस्ते एका
विशेष सोहळ्यात सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून मोरे यांना गौरवण्यात आले.
डॉ. दीपक मोरे यांनी आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल
घेऊन त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
****
लातूर तालुक्यातील खंडापूर येथील
अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण उत्सवातील कथित ३ कोटी ६५ लाख रुपयांच्या
देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर धोंडीराम जाधव ऊर्फ शिवणीकर याला स्थानिक
गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली. आरोपी मोतीनगर परिसरातील आपल्या घराच्या तिसऱ्या
मजल्यावर बाहेरून कुलूप लावून लपून बसला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा
रचून त्याला ताब्यात घेतले.
****
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
यांनी नुकताच वडवणी तालुक्यातील संपूर्णता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा आढावा घेतला.
या अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या
सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
****
दहशतवाद विरोधी पथकानं आज छत्रपती
संभाजीनगर आणि जालना इथं कारवाई केली. या कारवाईत छत्रपती संभाजीनगर इथून सहा जणांना
ताब्यात घेतले. तसंच जालना इथून सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान महिला
क्रिकेट कसोटी सामन्याला आजपासून लंडनमघ्ये लॉर्ड्स मैदानावर सुरुवात झाली. इंग्लंड
संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अखेरचं वृत्त हाती आलं
तेव्हा उपहारापर्यंत भारताच्या तीन बाद १२२ धावा झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment