Monday, 27 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.07.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित

·      सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक संसदेत सादर

·      यंदाचा श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार परभणीचे डॉ.पवन चांडक यांना जाहीर

·      जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंहला सुवर्णपदक तर मनु भाकर ला कांस्यपदक

आणि

·      राज्यात पुढचे पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा

****

विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. आज सकाळी कामकाज सुरू होताच, पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक २०२६, राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत मांडलं. 

बाईट – राज्यमंत्री जितेंद्र सिंह

हे विधेयक महत्त्वाचं असून सदस्यांना हवा तेवढा वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल, असं आश्वासन अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी, असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांनी गदारोळ न थांबवल्यानं, अध्यक्षांनी सदनाचं कामकाज सायंकाळी पाच वाजेपर्यंत थांबवून सदस्यांना या विधेयकावर चर्चेसाठी वेळ दिला. पण त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वारंवार चर्चेचं आवाहन करूनही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्याने, तालिका अध्यक्षांनी कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब केलं.

बाईट – तालिका अध्यक्ष कृष्णप्रसाद टेन्नेटी

 

राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्रं सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक २०२६ लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी ७ तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली.

 

त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नियम २६७ अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटिस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते, असं सभापतींनी सांगितलं. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं कामकाज १२ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यावर राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावं, असा प्रस्ताव मंत्री नित्यानंद राय यांनी मांडला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यानं कामकाज ३ वाजेपर्यंत, त्यानंतर सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. 

दरम्यान, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याच्या विरोधात राहुल गांधी, प्रियांका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात निदर्शनं केली.

****

ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं आज संसदेनं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात विक्रमी १९० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावणारी मीराबाई चानू, ६० किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणारा चनंबम ऋषिकांत आणि ६५ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करणारा राजा मुथुपंडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गौरवोद्गार काढले.

****

 यंदाचा श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार परभणी इथले डॉ.पवन चांडक यांना जाहीर झाला आहे. वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजीनगर इथल्या 'संडे क्लब' आणि देशपांडे परिवाराच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. ११ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरच्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सभागृहात या पुरस्काराचं समारंभर्पूक वितरण करण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ९ गावांमध्ये 'वसुंधरा' हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सचा सामाजिक उत्तरदायित्व निधी, राज्य शासन आणि समुह सहभाग अशा योगदानातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. या संदर्भात नुकताच २२ जुलै रोजी सामंजस्य करार करण्यात आला. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे विभागीय व्यवस्थापक श्याम पडुळकर यांनी आज ही माहिती दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील पाणीटंचाई दूर करून कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

****

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज बीड जिल्ह्यात वडवणी इथं बंजारा समाज मेळावा घेण्यात आला. यावेळी राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उपस्थित राहून समाजबांधवांशी संवाद साधला. वसंतराव नाईक यांचं लोकहित, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासासाठीचं कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं राठोड यांनी नमूद केलं.

****

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत नांदेड जिल्हा रुग्णालयात झालेल्या विशेष हृदयरोग तपासणी शिबिरात १०९ बालकांची 2-D इको तपासणी करण्यात आली. यापैकी जन्मजात हृदयविकारानं ग्रस्त १७ बालकांची हृदय शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. या बालकांना आज तपोवन एक्सप्रेसनं ठाण्याच्या कीम्स हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं.

****

मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानांतर्गत धाराशिव इथं ‘व्हिजन धाराशिव 2030 - आपला जीव धाराशिव’ या अभियानाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याचं आवाहन गोरे यांनी यावेळी केलं.

****

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागानं कारवाई करत सहा बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले. या बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. तपासणीत काही नमुने अप्रमाणित आढळल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

तुळजापूर इथं उद्या, २८ जुलै रोजी, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत समाधान आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. नळदुर्ग रस्त्यावरील वंश मंगल कार्यालयात आयोजित या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात, येत्या १ ऑगस्ट रोजी, ‘नशामुक्त युवा - विकसित भारत’ हे राष्ट्रीय अभियान राबवलं जाणार आहे. शहरातील यशवंत महाविद्यालयात या अंतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी MY Bharat पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य आहे.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंह हिने २५ मीटर पिस्तुल स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं, तर याच स्पर्धेत मनु भाकर हिने कांस्यपदक पटकावलं. या यशाबद्दल दोघी नेमबाजांचं अभिनंदन करण्यात येत आहे.

****

नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून चार हजार ९४७, दारणा धरणातून १३ हजार २५०, घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. परिणामी तर नांदूर मधमेश्वरमार्गे ४६ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पैठण इथल्या जायकवाडी धरणाकडे पाणी झेपावत आहे.

 

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून धरण जवळजवळ ९४ टक्के भरलं आहे. आज सकाळपासून भीमा नदी पात्रात सुमारे साडे सहा हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भीमा नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क रहावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

हवामान

मराठवाड्यासह राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट तर कोकणातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...