Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जुलै २०२६ सायंकाळी
६.१०
****
·
नीट पेपरफुटीसंदर्भातलं आंदोलन संपल्याचं कॉक्रोच जनता पार्टीकडून
जाहीर
·
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
·
टीईटी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी मुख्य सूत्रधारांना बिहारमधून
अटक
·
आषाढी एकादशीचा सोहळा सर्वत्र भक्तीभावाने साजरा
आणि
·
जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक-पाणीपातळी सुमारे ४३ टक्क्यांवर
कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीसंदर्भातलं आपलं आंदोलन संपल्याचं
जाहीर केलं आहे. आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्रसिंह यांच्यासोबत
सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची सफल चर्चा झाली. या चर्चेनंतर झालेल्या
संयुक्त पत्रकार परिषदेत नड्डा यांनी, सीजेपीच्या सगळ्या मागण्यांवर सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार
करून, मागण्या
मान्य केल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
बाईट – केंद्रीय मंत्री जे पी नड्डा
सदरच्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यावर तसंच सीजेपीच्या संयोजकांवर
कारवाई न करणं, आत्महत्या
केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला नियमानुसार अधिकाधिक आर्थिक मदत देणं,
आणि शिक्षण पद्धतीत सुधारणेसंदर्भात
दिलेल्या मुद्यांवर विचार करण्याच्या मागण्या सरकारने मान्य केल्याचं,
सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
त्यामुळे सदरचं आंदोलन तत्काळ मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आंदोलनात सहभागी सर्व
विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवण्याचं आवाहन प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी
केलं. रांका म्हणाले -
बाईट – आशुतोष रांका
****
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा
राजीनामा दिला आहे. भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी
संभ्रमित करू नये हाच आपला उद्देश असल्याचं, प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन आणि एकंदर परिस्थितीचा
देशविरोधी घटकांनी फायदा घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ऊर्जा स्वत:ची कारकीर्द घडवण्यासाठी वापरावी,
या उद्देशाने आपण पंतप्रधानांकडे राजीनामा
सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे.
****
नियमित संवाद आणि सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून कर्मचारी संघटनांशी
संपर्क राखण्यासाठी सरकार सातत्याने कटिबद्ध असल्याचं,
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री
डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारतीय मजदूर संघाशी संलग्न भारतीय
टपाल कर्मचारी महासंघाच्या १२ सदस्यीय प्रतिनिधी मंडळाशी ते आज संवाद साधत होते. प्रतिसादक्षम
शासन, वेळेवर
निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि सातत्यपूर्ण प्रशासकीय सुधारणांमुळे तक्रार निवारण यंत्रणेला
सार्वजनिक प्रशासनाचा एक मुख्य स्तंभ करण्यात आल्याचं डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं
आहे.
****
टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका
फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा
यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी,
या प्रकरणात १२ आरोपींना अटक झाली होती.
या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका
फुटल्यामुळे २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
****
कारगिल विजय दिनाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या
द्रास इथं आजपासून दोन दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. १९९९ मधे कारगिल युद्धात
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी लामोचेन व्ह्यू
पॉईंट इथं 'युद्ध
संस्मरण' कार्यक्रम
आयोजित करण्यात आला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देश-विदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ
कार्यक्रमाचा हा १३६ वा भाग असेल. या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन, एआयआर
न्यूजच्या संकेतस्थळावर तसच न्यूजऑनॲप मोबाईल ॲपवर केलं जाईल. आकाशवाणी,
दूरदर्शन,
पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि
प्रसारण मंत्रालयांच्या यूट्यूब चॅनेलवरही याचं थेट प्रसारण होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आषाढी एकादशीनिमित्त
शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या
जीवनात आनंद, सौहार्द
आणि समृद्धी घेऊन येवो, अशी
त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी
अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो,
अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली.
****
आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरात
भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात
साजरी होत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूजच्या पंढरपूर मंदिरात आज
पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत
विठ्ठल - रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मंदिरात भाविकांची वर्दळ सायंकाळनंतरही कायम आहे.
पैठण इथं आषाढी एकादशीनिमीत्त शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज
यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी झाली. संत
एकनाथ संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक नाथ समाधीचं दर्शन घेऊन
आरती केली. पहाटे चार वाजेपासूनच वारकरी भाविकांनी गोदावरी नदीत स्नान करून नाथ समाधीचं
दर्शन घेतलं. समाधी दर्शनासाठी सुमारे २ किलोमीटर पर्यंत भविकांच्या रांगा होत्या.
****
बीड शहरासह जिल्ह्यात अकराही तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल-रुक्मिणी
मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल-रुक्मिणी,
संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी
काढली.
परभणी इथं गुजरी बाजार परिसरातल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात
उपमहापौर गणेश देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत महापूजा आणि आरती करण्यात आली.
महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने महापौर सय्यद इकबाल,
उपमहापौर गणेश देशमुख आणि कोमल देशमुख
यांचा शाल, श्रीफळ
आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शहरात विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य गोपाळ दिंडीचे
महापौर आणि उपमहापौरांनी स्वागत केलं.
जालना शहराचे आराध्य दैवत आणि प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या
श्री आनंदी स्वामी महाराजांच्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त जिल्हाभरातील भाविकांनी
शहरात मोठी गर्दी केली आहे. आज सकाळी श्री आनंदी स्वामी महाराजांची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी
मंदिरातून उत्साहात निघाली. पालखी सोहळ्यात सहभागी तरुणांनी मल्लखांबावरच्या थरारक
कसरती केल्या. भाविकांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी फराळाची व्यवस्था करण्यात आली.
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री
संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासूनच गण गण गणात बोते या जयघोषानं
दुमदुमून गेला आहे. शेजारच्या राज्यांतूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले
आहेत. मंदिर परिसरात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती
योजना, २०२६”
अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक हजार २७६ गावांमधील ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची
यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी ही माहिती दिली. पात्र लाभार्थी
शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची तसंच अग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी,
असे आवाहनही जाधव केलं आहे.
****
कॅनडात ओंटारियो इथे सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद
स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंहने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा
३-१ असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता
तिचा सामना इजिप्तच्या रुकय्या सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री साडेदहा वाजता
सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली
आहे.
****
भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान हरारे इथं सुरु असलेल्या दुसऱ्या
टी- ट्वेंटी क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या १९व्या षटकांत
चार बाद २१० धावा झाल्या होत्या. यजमान संघानं नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.
भारताकडून ईशान किशननं ८१ धावा काढून बाद झाला तर तिलक वर्मा ५७ धावा काढून खेळत होता.
****
हवामान
राज्यात कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी,
तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये
काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील
जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची
शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सोलापुरात नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे
वीर धरण शंभर टक्के भरलं असून नीरा नदीत २५ हजार क्युसेक विसर्ग सुरु केला आहे.
नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे नांदूर मधमेश्वर प्रकल्पामधून
सुमारे ६४ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
तर नागमठाण प्रकल्पातून ७५ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाण्याचा विसर्ग
करण्यात येत आहे. अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातून होणाऱ्या विसर्गामुळे जायकवाडी धरणात
सध्या ८८ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणीपातळी
सुमारे ४३ टक्क्यांवर पोहोचली आहे.
****
No comments:
Post a Comment