Monday, 13 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 13 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ जुलै २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या १५ जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापारवृद्धीची दारे उघडणारा ठरणार आहे, असं गोयल म्हणाले.

****

भारताच्या अध्यक्षतेखाली नागपुरात आयोजित ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या दोन दिवसीय बैठकीचा काल समारोप झाला. या बैठकीत सदस्य देशांनी एकमताने मंत्रीस्तरीय जाहीरनामा स्वीकारला. या जाहीरनाम्यात पायाभूत सुविधांमधील चक्रीय अर्थव्यवस्था, शाश्वत विमान इंधन, परिवहन क्षेत्रातलं कार्बन उत्सर्जन कमी करणं, शहरी वाहतूक केंद्रांचा विकास, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सहकार्य तसंच रेल्वे संशोधन नेटवर्क यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सहकार्याचा आराखडा मांडण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत सहभागी झालेल्या सर्व सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींचे सहकार्याबद्दल आभार मानले.

****

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या देणगीत कथित गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची आणि व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाशी संबंधित विविध याचिकांवर सुनावणी होत आहे. याचिकांमध्ये या कथित गैरव्यवहाराची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

****

इथेनॉल मिश्रित ई-20 पेट्रोलमुळे वाहनांच्या इंधन टाकीत बिघाड होतो, असा समाज माध्यमांवर केला जात असलेला दावा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक विभागाने हा दावा फेटाळून लावत नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं. तेल विपणन कंपन्यांकडून पुरवलं जाणारं ई-20 पेट्रोल भारतीय मानक ब्युरोने निश्चित केलेल्या सर्व गुणवत्ता निकषांनुसार तयार केलं जात असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितलं. केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच विश्वास ठेवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या दोन दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

****

राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत बीड जिल्ह्यातले काही शेतकरी गुजरात मध्ये आणंद इथं गेले आहेत. या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांना दुधोत्पादन, जनावरांचं आरोग्य, गोठा व्यवस्थापन आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री व्यवस्थापन या विषयांवर तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

****

नाशिक जिल्हा प्रशासनाने ‘एसआयआर’ अर्ज वाटप आणि स्वीकृतीसाठी तीन दिवसीय विशेष शिबिर घेतलं. शहरातल्या सर्वच मतदान केंद्रांवर अर्ज घेण्यासाठी आणि जमा करण्याकरता मतदारांनी गर्दी केली होती. आतापर्यंत एकूण २५ लाख ३३ हजार ६१६ मतदारांपर्यंत एसआयआरचे अर्ज पोहोचले आहेत.

****

भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर पोलिसांनी शहापूर गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारी स्कॉर्पिओ गाडी जप्त केली. या धडक कारवाईत सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

****

बीड शहर पोलीस ठाण्यात तपास प्रक्रियेसाठी विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल प्रणालीची राज्यस्तरीय तांत्रिक पाहणी पूर्ण झाली. तक्रार नोंदणी, तपास, पुरावा व्यवस्थापन, आरोपपत्र तयार करणं तसंच न्यायालयीन प्रक्रियेच्या नोंदी आणि देखरेख यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे.

****

भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडसमोर ४५७ धावांचं लक्ष्य ठेवलं असून, यजमान इंग्लंडचा संघ आज सहा बाद १३० धावांवरुन पुढे खेळेल. भारताला आता ऐतिहासिक विजयासाठी केवळ चार खेळाडू बाद करण्याची गरज आहे. भारताने दुसरा डाव सात बाद ३४१ धावांवर घोषित केला. यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया हिने शानदार शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...