Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ जुलै २०२६ सायंकाळी
६.१०
****
· राज्यात समान नागरी कायदा
तयार करण्यासाठी निवृत्त
न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ७ जणांची समिती स्थापन
· चालू आर्थिक वर्षासाठी
भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनवाढीचा दर ७ टक्के राहण्याचा आंतरराष्ट्रीय
नाणेनिधीचा अंदाज
· संत
ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल
· जालन्याचे
सायकलपटू पंढरपूरकडे रवाना- छत्रपती संभाजीनगरच्या सायकलवारीचं उद्या प्रस्थान
आणि
· भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचं विम्बल्डन
स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात
****
राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या
अध्यक्षतेखाली ७ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. या समितीने ६ महिन्यांत अहवाल द्यावा आणि
नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले
-
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध केला, त्यावेळी खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी
महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभुराज
देसाई यांनी केली.
****
परभणी जिल्ह्यातील धानोरा काळे तसंच वझूर
इथं गोदावरी नदीवरील पुलांच्या कामासंदर्भातील उर्वरित
कामं तसंच निधीबाबत आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असं मंत्री
शिवेंदसिंह भोसले यांनी सांगितलं. भाजप आमदार अतुल भोसले यांच्या लक्षवेधीला ते विधानसभेत उत्तर देत होते. दोन्ही पुलांची कामे
लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्र्यांनी दिली.
****
राज्यातल्या ४८ साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्तभावाचे २९८ कोटी
रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि
आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल, असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात
सांगितले. ऊसाला अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या
कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा
विचार नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
****
कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादने तयार करण्यावर सरकारने
अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी
खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. नाफेडच्या दरापेक्षा बाजार भाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना
कांदा विकत असल्याचं रावल यांनी सांगितलं.
****
अयोध्या
इथे श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणगी अपहार प्रकरणाच्या निषेधार्थ
नागपूर शहर काँग्रेसच्या वतीने आज ‘रघुपती राघव राजा राम’ सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. नागपूरच्या ऐतिहासिक
पोद्दारेश्वर राम मंदिराबाहेर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्या
नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी भजन-कीर्तन करत निषेध
व्यक्त केला.
****
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय
उत्पादनवाढीचा दर ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची
अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. सेवा
क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर
गाठता आला. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या
दुपटीहून अधिक आहे. या अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या
वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर ३ टक्के दिला आहे.
****
सोलापूर
जिल्ह्यात पंढरपूर इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत ६८ आस्थापनांची
तपासणी केली. तपासणीदरम्यान शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, खानावळी, प्रसाद
विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थांचे १०५ नमुने तपासणीसाठी घेण्यात
आले.
आषाढी
एकादशीच्या काळात भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी
प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आली.
****
संत
ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात भक्तिमय
वातावरणात आगमन झालं. पालखी मार्गावर भाविकांनी दुतर्फा रांगा लावून पादुकांचं
दर्शन घेतलं. महिलांसह ज्येष्ठ नागरिक, युवक आणि लहान मुलं
मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. शेकडो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या या पालख्या
उद्यापर्यंत पुण्यात मुक्कामी आहेत.
****
शेगाव इथून निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आज बीड जिल्ह्यात
परळी इथं आगमन झालं. ‘गण गण गणात बोते’चा जयघोष करत पालखीच्या स्वागतासाठी शेकडो भाविकांनी
गर्दी केली होती. शेगावहून २१ मे रोजी निघालेली ही पालखी नऊ जिल्ह्यांचा प्रवास
करत परळीत पोहोचली. परळीनंतर अंबाजोगाई आणि बोरीसावरगाव इथे पालखीचा मुक्काम
असेल.
****
जालन्याचे २५ वारकरी सायकलवरून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. भोकरदन
आणि जाफराबाद इथल्या सायकलप्रेमींचा हा संघ दररोज १२० किलोमीटरचा प्रवास करत ११ जुलै
रोजी पंढरपुरात दाखल होईल.
छत्रपती संभाजीनगरहून उद्या शुक्रवारी १० जुलै
रोजी जवळपास ६० सायकलस्वार वारीसाठी रवाना होणार आहेत. १०
ते ७९ वर्षे वयोगटातले सायकलपटू, साडे तीनशे किलोमीटर
अंतर अवघ्या दोन दिवसात पूर्ण करणार असल्याची माहिती सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष
डॉ.विजय व्यवहारे यांनी दिली.
****
हिंगोलीचे जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी आज सकाळी पांगरा शिंदे आणि खापरखेडा या गावांना भेट देऊन
भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च
प्राधान्य देत,
भूकंपबाधित
गावांचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करून प्रशासनामार्फत आवश्यक त्या
सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश गुप्ता यांनी दिले.
दरम्यान, या भूकंपाचे धक्के
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर पर्यंत जाणवले आहेत. या पार्श्वभूमीवर
लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज संबंधित शासकीय
यंत्रणांचा आढावा घेतला. या अनुषंगाने कोणत्याही अफवा पसरणार नाहीत, याची दक्षता
सर्व यंत्रणांनी घ्यावी. तसंच सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून
समन्वयाने काम करावे, असे निर्देश बास्टेवाड यांनी दिले.
****
नांदेड
जिल्ह्यात विष्णुपुरी इथं नांदेड तुळजापूर बुटीबोरी या राष्ट्रीय महामार्गावरील
पुलाचा भाग ढासळल्याची घटना घडली. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले. सकाळी साडे अकराच्या
सुमारास वाहतूक सुरू असताना हा प्रकार घडला.
****
हिंगोली
इथं आज राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वर्षे
वयोगटातील संशयित हृदयविकारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी टुडी-इको तपासणी शिबिर घेण्यात
आलं.
या
शिबिरात ९२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १८
विद्यार्थ्यांची मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या
शस्त्रक्रिया शासकीय योजनेअंतर्गत ठाणे इथंल्या केआयएमएस रुग्णालय इथं करण्यात
येणार आहेत.
****
नंदीग्राम
एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणीतील वातानूकुलित कुपमध्ये अनधिकृतपणे सजावट केल्याप्रकरणी जालना इथले सजावटकार
अजहर
शेख यांच्याविरुद्ध
जालना रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कर्तव्यात
हलगर्जीपणा केल्याप्रकरणी संबंधित बोगीचे तिकीट कलेक्टर गिरीश
कुमार यांना निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेची विभागीय स्तरावर चौकशी सुरू असून, त्यानुसार
पुढील कारवाई होणार
असल्याचं,
रेल्वे पोलीस निरीक्षक पी. बी. इंगळे यांनी सांगितलं.
****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि धाराशिव उपपरिसर इथल्या पदवी आणि पदव्यूत्तर
विभागातील क्षमतेपेक्षा कमी नोंदणी झालेल्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना थेट
प्रवेश देण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला कुलगुरु
डॉ.विजय फुलारी यांनी मान्यता दिली. रिक्त जागांच्या प्रवेशासाठी ११ ते ३१ जुलै दरम्यान
विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
****
भारताचा
१८ वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर याचं विम्बल्डन कनिष्ठ गटातलं आव्हान संपुष्टात
आलं आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व अमेरिकेच्या
जॉर्डन ली याने
अर्णवचा दोन-पाच, पाच-सात
असा पराभव केला. दरम्यान, विम्बल्डन टेनिस स्पर्धेत कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा गेल्या
३६ वर्षातला अर्णव हा भारताचा
पहिलाच खेळाडू ठरला आहे.
****
भारत
आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० क्रिकेट मालिकेतला
चौथा सामना आज ब्रिस्टल इथं खेळवला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री दहा वाजता
सामना सुरू होईल. मालिकेत इंग्लंड संघ २-० ने आघाडीवर आहे.
****
नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक झाल्याने पैठणच्या
जायकवाडी धरणातला जिवंत पाणीसाठा ३० टक्क्यांच्यावर पोहोचला आहे. गोदावरी नदीपात्रात
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून होणारा विसर्ग सध्या थांबवण्यात आला आहे, नागमठाण धरणातून
मात्र ३० हजार दोनशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, राज्यात पुढचे दोन दिवस कोकण तसंच विदर्भातल्या
काही जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथा भागाला पावसाचा यलो अलर्ट
देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment