Tuesday, 14 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

·      स्वतंत्र भारताचा पाया रचण्यात देशाच्या नारीशक्तीचं अभूतपूर्व योगदान-पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      राज्य सरकारच्या पदभरती प्रक्रियेत सुधारणा, लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आणखी १०२ संवर्गातल्या पदांची वाढ करण्याचा निर्णय

·      ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिव देहावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आणि

·      यावर्षी मोसमी पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्के राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३६ वी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी नवी दिल्लीत संसद भवनात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रम होणार आहे. 

**

केंद्र सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ ची निर्मिती असलेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचं प्रसारण दुपारी एक वाजता महासंचालनालयाचं ट्विटर हँडल, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे.

 

छत्रपती संभाजीनगर इथं आज विविध पक्ष संघटनांच्या वतीनं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातले अनेक मार्ग आज पूर्ण बंद राहणार असल्याचं वाहतूक विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग तसंच जिल्हा रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभागही आज बंद राहणार आहे.

**

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाअंतर्गत परभणी शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं, तसंच समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आलं.

हिंगोली जिल्ह्यातल्या कवडा इथल्या मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

नांदेड इथं आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. शिवराज शिंदे यांनी लिहिलेल्या, संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या, ‘भीमाचा दरारा’ या गीताचं औपचारिक प्रकाशन काल करण्यात आलं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं.

****

स्वातंत्र्य लढ्यापासून ते संविधान सभेच्या सर्व निर्णयांपर्यंत स्वतंत्र भारताचा पाया रचण्यात भारताच्या नारीशक्तीने अभूतपूर्व योगदान दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत नारी शक्ती वंदन संमेलनाला ते संबोधित करत होते. नारी शक्ती वंदन अधिनियमावर चर्चा करुन ते पारीत करण्यासाठी परवा १६ एप्रिल ते १८ एप्रिलदरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला. भारताच्या विकास यात्रेतल्या या महत्त्वाच्या क्षणांदरम्यान, देश २१व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

संवाद, सहकार्य आणि सहभागाच्या माध्यमातून हे विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आणि प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ज्या प्रकारे हा कायदा मंजूर झाला आणि संसदेची प्रतिष्ठा वाढली, त्याचप्रमाणे या वेळीही या कायद्यातल्या सुधारणा मंजूर होऊन, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून संसदेची प्रतिष्ठा नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षणापेक्षाही मतदारसंघांची फेररचना हा अधिक गंभीर मुद्दा असल्याचं काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. फेररचनाविषयक प्रस्ताव अत्यंत धोकादायक आणि संविधानातल्या तरतुदींचं नुकसान करणारा असल्याची टीका त्यांनी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातून केली आहे. लोकसभा आणि विधानसभांमधे महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी, नारी शक्ती वंदन अधिनियम, २०२३ मध्येच मंजूर झालं. २०२४ च्या निवडणुकांपासूनच या सुधारणा लागू करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली होती, पण सरकारनं ती फेटाळून लावल्याचं गांधी यांनी सांगितलं.

****

राज्य सरकारमधल्या पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळानं घेतला आहे. अराजपत्रित पदांसाठी कुठलीही मुलाखत यापुढे होणार नाही, तसंच पदभरतीमधल्या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्यानं १८ सेवांचा आणि ९३ संवर्गाचा समावेश होईल. यामुळे विविध सेवाप्रवेश नियमांचं तसंच अनुभवांच्या अटींचं सुसूत्रीकरण होणार आहे. यापुढे सर्वसाधारणपणे सरळसेवा भरतीसाठी अनुभवाची अट लागू राहणार नाही. गट ब आणि गट क मधल्या काही पदांचं प्रशासकीय आणि तांत्रिक अशा दोन संवर्गात वर्गीकरण होणार आहे. या सर्व सुधारणांमुळे पदभर्तीसाठीच्या परीक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असं सरकारनं म्हटलं आहे.

एमपीएससी कडून अंतिम निवडीसाठी शिफारस न झालेल्या उमेदवारांची माहिती विविध कंपन्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी महाजॉब्स पोर्टलअंतर्गत “निपुण सेतू” हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.

जालना, बीड, हिंगोली, परभणी, धुळे आणि पालघर जिल्ह्यांचा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात समावेश करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सध्याच्या २७ आकांक्षित तालुक्यांसह नवीन १५० तालुके अशा एकूण १७७ तालुक्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे.

****

ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसदलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसंच शोक धून वाजवून मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी आशाताईंच्या इच्छेनुसार एकासुरात जयहिंद म्हणून त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. मंत्रिमंडळातले अनेक सदस्य, लोकप्रतिनिधी यांच्यासह संगीत आणि चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलावंतांनी आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीतही आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या संकल्पनेतली संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

****

मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसंच धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन आठ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच उद्घाटन होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

ठाणे जिल्ह्यात काल एका रस्ते अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर सिमेंट मिक्सर आणि खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाची जोरदार धडक होऊन हा अपघात झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्हा पोलिस दलाने सी सी टी एन एस कार्यप्रणालीमध्ये दुसरा क्रमांक, तर नांदेड परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्यात पोलिस दलाच्या ५३ घटनांमधून या प्रणालीचा आढावा घेऊन, हिंगोली पोलीस दलाला २०१ पैकी २०० गुण मिळाले. या प्रणालीत गुन्ह्यांची ऑनलाईन नोंद करणं, गुन्ह्याचा तपास सीसीटीएनएस प्रणालीमध्ये भरणं, गुन्हेगारांची माहिती पडताळून कारवाई करण्याचं काम केलं जातं.

****

परभणी जिल्ह्यात काल हळद पिकासाठी सुक्ष्म मुलद्रव्याचा वापर प्रात्यक्षिकाच्या अनुषंगानं, प्रक्षेत्र दिन साजरा झाला. यासाठी केरळ इथल्या भारतीय मसालावर्गीय पिके संशोधन संस्थेनं विकसित केलेल्या, सुक्ष्म मुलद्रव्याच्या वापराच्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली.

****

यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. देशभरात हंगामी पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या ९२ टक्के राहण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं. मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट प्रणालीनं मान्सून हंगामादरम्यान एल निनो परिस्थिती विकसित होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...