Saturday, 4 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 04 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतीय ध्वज असलेलं एलपीजी टँकरवाहू 'ग्रीन सानवी' हे जहाज होर्मुजची सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडून भारताच्या दिशेने रवाना झालं आहे. पश्चिम आशियात संघर्ष सुरु झाल्यापासून या संवेदनशील मार्गावरून प्रवास करणारं हे सातवं भारतीय एलपीजी टँकरवाहू जहाज आहे. सध्या पर्शियन आखात क्षेत्रात १७ भारतीय जहाजे असून, त्यावर ४०० हून अधिक भारतीय खलाशी तैनात आहेत. या सर्व खलाशांच्या सुरक्षेसाठी नौवहन महासंचालनालय, जहाज मालक आणि भारतीय दूतावास यांच्याशी सातत्याने संपर्कात असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

****

देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा सुखद आणि सुरक्षित अनुभव देणे, हे रेल्वे विभागाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते, प्रवाशांच्या गरजांनुसार सोयीसुविधांचा विस्तार आणि रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

****

पश्चिम बंगालमध्ये मतदारांच्या सोयीसाठी, निवडणूक आयोगानं ४ हजार ६६० हून अधिक 'सहाय्यक मतदान केंद्रे' स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे तर ३२१ मतदान केंद्रे स्थलांतरित करण्यासही मान्यता दिली आहे. पश्चिम बंगालमधील एकूण मतदान केंद्रांची संख्या आता ८५,३७९ झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे; तर मतमोजणी ४ मे रोजी होईल.

****

नांदेड शहरातील भाग्यनगर पोलिस ठाणे हद्दीत कॅनॉल रोड परिसरात तिहेरी हत्याकांड झाल्याचं आज पहाटे उघड झालं. वर्चस्व वादातून हा प्रकार घडल्याचं पोलिस तपासातून स्पष्ट झालं आहे. नांदेड शहरातील अर्जितसिंह चव्हाण हा दुचाकीवरून जात असताना त्याच्यावर अरबाज आणि इतरांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात अर्जितसिंह आणि अरबाजचाही घटनास्थळी मृत्यू झाला. दरम्यान, या हल्ल्याची अर्जितसिंहच्या भावाला माहिती मिळाल्यानंतर त्याने आवेजवर चाकूहल्ला केला, या घटनेत आवेजचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

****

नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वर इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल पाहणी करत माहिती घेतली. अग्रवाल तीन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर असून कुंभमेळ्याच्या कामांचा ते आढावा घेतील. कुंभमेळ्याची कामं निश्चीत कालावधीतच पूर्ण करावीत तसंच दर्जाशी तडजोड करू नये, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

****

अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावा २०२५-२६ च्या औचित्यानं २९ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत नागपूर इथं पार पडलेल्या विविध स्पर्धांचा समारोप काल केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांच्या उपस्थितीत झाला. पोलिस दलातील तांत्रिक ज्ञान आणि तपासाचं कौशल्य या मेळाव्यामुळे अधोरेखित झालं असून तपासातील गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढीसाठी हे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचं ते यावेळी म्हणाले. या मेळाव्यात २९ राज्यांतील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह केंद्रीय दलांचाही सहभाग होता.

****

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी तातडीने पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाही धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने तुळजापूर, लोहारा यासह अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकरी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांकडे तसंच प्रशासनासमोर मांडल्या, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

****

नंदुरबार जिल्ह्यात दोन तारखेला झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ८३३ हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमीक पंचनाम्यात ६२ गावातील  ९५४ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालं. यात रब्बीच्या ज्वारी, मका, बाजरी, कांदा, गहु, केळी, पपई आणि आंबा या पिकांचा समावेश आहे. याबाबत आता नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावर पंचनाम्याचा अहवाल पाठवला जाणार आहे.

****

क्रिकेट – आयपीएल स्पर्धेत आज, दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी दिल्ली इथं दुपारी साडे तीन वाजता तर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान दुसरा सामना सायंकाळी साडेसात वाजता अहमदाबाद इथं होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...