Wednesday, 22 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

केदारनाथ आणि चारधाम यात्रा म्हणजे देशाच्या विश्वास, एकता आणि वैभवशाली परंपरेचा आध्यात्मिक महोत्सव असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. चारधाम यात्रेच्या अनुषंगानं पंतप्रधानांनी देश वासियांसाठी एक पत्र लिहिलं, त्या पत्रातून संबोधित करतांना पंतप्रधानांनी उत्तराखंड मधील ही यात्रा म्हणजे देशाचं नैसर्गिक वैभव आहे, त्यामुळे यात्रेदरम्यान या परिसराची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं नमुद केलं. यासाठी पंतप्रधानांनी पाच संकल्प करण्याचं आवाहन पत्रातून केलं आहे. दरम्यान, केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी मंदिराबाहेरील परिसरात भाविकांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

****

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांच्या स्मृती देशाच्या सामूहिक स्मरणात कायम राहतील, असं सांगत त्यांच्या कुटुंबांसोबत देश एकजुटीने उभा असल्याचं म्हटलं. तर, पंतप्रधान मोदी यांनीही देश दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, असा निर्धार व्यक्त करत पीडितांना कधीही विसरणार नसल्याचं सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही घटनेचं स्मरण करत दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. हा दुःखद प्रसंग आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे. दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू असून त्याविरुद्ध एकजुटीनं लढणे आवश्यक असल्याचं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारत दहशतवाद आणि त्याला आश्रय देणाऱ्यांविरुद्धची कठोर कारवाईचं धोरण कायम ठेवेल, असं शहा म्हणाले.

गेल्या वर्षी दिवशी पहलगाम इथं दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली होती. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी गेल्या वर्षी 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नियंत्रण रेषेच्या पलीकडं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधल्या दहशतवाद्यांच्या नऊ छावण्यांवर अचूक मारा केला. या कारवाईत शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले.

****

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत २६ लाख नागरिकांनी स्व-गणना सेवेचा लाभ घेतला आहे. जनगणनेचा पहिला टप्पा गेल्या १ एप्रिल पासून सुरू झाला. सध्या उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, हरियाणा आणि बिहारमध्ये स्वयं-गणना सुविधा सुरू आहे. जनगणनेचा दुसरा टप्पा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरु होईल.

****

मुंबई उच्च न्यायालयाने २००६ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींची आज निर्दोष मुक्तता केली. सरन्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने राजेंद्र चौधरी, धन सिंग, मनोहर राम सिंग नरवारिया आणि लोकेश शर्मा - यांनी विशेष न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध केलेले अपील स्वीकारले. या चौघांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली, ज्यात खून आणि गुन्हेगारी कट यांचा समावेश आहे, तसेच कठोर बेकायदेशीर कृत्ये कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले होते.

****

राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी जर्मनी, जपान आणि रशिया यांच्या भाषा आणि संस्कृतीचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि सीआयआय यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारानुसार, सीआयआय “महाराष्ट्र–जर्मनी–जपान कुशल कामगार गतिशीलता” उपक्रमात अंमलबजावणी भागीदार म्हणून काम करणार असून तंत्रशिक्षण मंडळ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांच्या कौशल्य, संवाद क्षमता व आत्मविश्वासात वाढ होऊन जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.

****

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मध्यवर्ती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं कालपासून संप पुकारला आहे. या संपात अकोला जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील महसूल विभागासह विविध विभागांच्या कार्यालयांतील कामकाज ठप्प झालं आहे. या संपात महसूल, कोषागार आदी विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.

****

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो' या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३ पूर्णांक ९८ टक्के तर सुक्या चाऱ्याची २५ पूर्णांक १२ टक्के तूट असते. 'एल-निनो'मुळे पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने 'जिल्हा नियोजन आणि विकास समिती' अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीसाठी निधीला प्राधान्य द्यावे. बियाणांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या चारा बियाणांचे कार्यारंभ आदेश महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांना तातडीने देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 22 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...