Monday, 20 April 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      द्रुतगती मार्गांवरील अपघात रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शक तत्वं जारी

·      निवडणूक काळात राजकीय पक्षांनी कायदेशीर तरतुदींचं पालन करावं, निवडणूक आयोगाचं आवाहन

·      यंदाच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त पेरणीची कृषी विभागाची तयारी, मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

·      अक्षय तृतीयेचा सण राज्यात उत्साहात साजरा

आणि

·      कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २५ तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भात उन्हाचा पारा ४५ अंशांवर

****

देशातले द्रुतगती मार्ग धोकादायक ठरू नयेत यासाठी सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत रस्ते सुरक्षेवर भर दिला आहे. देशात एकूण रस्त्यांच्या केवळ दोन टक्के भाग राष्ट्रीय महामार्गांचा असला, तरी एकूण अपघातांमधले जवळपास ३० टक्के मृत्यू याच मार्गांवर होतात, अशी गंभीर बाब न्यायालयाने अधोरेखित केली. प्रशासकीय दिरंगाई आणि पायाभूत सुविधांतील कमतरता यामुळे अपघात वाढण्याची शक्यता असल्याचंही नमूद करण्यात आलं. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर यांच्या खंडपीठाने रस्ते सुरक्षेसाठी देशव्यापी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये महामार्गांवर अवजड वाहनं उभी करण्यास बंदी, अपघातप्रवण ठिकाणांवर तातडीने उपाययोजना, तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सुरक्षित वाहतूक वातावरण निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे मानवी जीवनाचं संरक्षण आणि मूल्य जपण्यावर भर देण्यात आला आहे.

****

सर्वसाधारण निवडणूक आणि पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सर्व पक्षांना,विद्यमान कायदेशीर तरतुदींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, माहिती तंत्रज्ञान नियम आणि आदर्श आचारसंहिता यांचा समावेश असलेल्या तरतुदींचं पक्षांनी पालन करून सामाजिक संपर्क माध्यम आणि डिजिटल मंचांचा जबाबदारीनं आणि नैतिकतेनं वापर करावा, असं आयोगानं सांगितलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कोणतीही दिशाभूल करणारी किंवा बेकायदेशीर कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित किंवा फेरफार केलेली सामग्री तीन तासांच्या आत कारवाईसाठी घेतली जावी, असंही आयोगानं म्हटलं आहे.

****

नागपूर जिल्ह्यातल्या कामठी इथं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था – आयटीआय आणि शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते काल झालं. या संस्थेला शहीद हेमंत करकरे यांचं नाव देण्यात येणार आहे. काळाशी सुसंगत नवनवीन आवश्यक असणारे कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी येत्या जूनपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करू, असं मंत्री लोढा यांनी यावेळी जाहीर केलं.

****

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त पेरणीचं नियोजन केलं असून, त्यादृष्टीने कृषी विभागाने पूर्वतयारी सुरू केल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ‘एल निनोचा’ शेतीवर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक पद्धती यावर चर्चा करण्यासाठी पुण्यात आज राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली असतानाच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी येत्या २७ एप्रिलपासून बेमूदत बंदचा इशारा दिला आहे. शासनाने या विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या अद्यापही पूर्ण न केल्याने राज्यस्तरीय बंदचं आवाहन माफदा अर्थात महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टीसाइड, सीडस् डीलर्स असोसिएशनने केलं आहे. रासायनिक खतांचा पुरवठा होताना होणारं कंपनीस्तरावरील लिंकिंग बंद करणं, एचटीबीटी बियाण्यांची तस्करी रोखणं, साथी पोर्टल अॅप वापराची सक्ती विक्रेत्यावर न करता बियाणे उत्पादक आणि  पुरवठादार कंपनी स्तरावर राबवणं, बियाण्यांचे नमूने फेल गेल्यास विक्रेत्यांना आरोपी न करता साक्षीदार करणं, अशा एकूण १४ प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाने या तक्रारींची तातडीने दखल घेऊन आठ दिवसांत त्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

****

राज्यासह देशभरात अक्षय्य तृतीयेचा सण काल उत्साहात साजरा झाला. साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजला जाणारा हा सण, कधीही नाश न पावणारं सुख आणि समृद्धीचं प्रतीक समजला जातो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह, मराठवाड्यातल्या सर्व प्रमुख शहरांच्या बाजारपेठांमध्ये काल नागरिकांचा खरेदीचा उत्साह दिसून आला. या मुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे देखील होतात, हे लक्षात घेऊन, राज्य शासनानं बाल विवाह रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या होत्या. यंदा, सोन्याचे दर विक्रमी पातळीवर असले, तरी सोनं खरेदीचा उत्साह मात्र कायम होता.

परशुराम जयंती आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती देखील काल साजरी झाली. त्या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.

****

छत्रपती संभाजीनगर इथं भगवान श्री परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. औरंगपुरा इथं परशुराम स्तंभ इथं पूजन करून वाहन फेरी काढण्यात आली. तसंच महात्मा बसवेश्वर जयंती जिल्हा महोत्सव समितीच्या वतीनं शहरातल्या विविध भागांमधून दुचाकी वाहन फेऱ्या काढण्यात आल्या.

परभणीत  महात्मा  बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ध्वजवंदन तसंच प्रतिमा पुजन करण्यात आलं. शहरातल्या कारेगांव मार्ग, बसवेश्वर चौक या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांना मानवंदना देण्यात आली.

बीडमध्ये वीरशैव समाजातर्फे महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात जातीभेद मोडून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. त्यांचे विचार समाजाला दिशा देणारे असून, आजच्या काळात त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे, असं माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यावेळी म्हणाले.

****

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या वडीलासुरा इथल्या सिद्धार्थ बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना आणि अनावरण सोहळा काल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. राज्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध विकासकामं सुरू असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात टुनकी इथं शेतीतला अभिनव प्रयोग प्रशंसा मिळवत आहे. इथले प्रयोगशील शेतकरी सुभाष चांदुरकर यांनी विदर्भातल्या कडक उन्हात सफरचंदाची बाग यशस्वीपणे फुलवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. एरवी थंड हवेच्या ठिकाणी येणारं हे फळ त्यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या शेतात पिकवून वाहवा मिळवली आहे. या प्रयोगाची लागवड करताना त्यांनी कश्मीरचा आणि येथील उष्ण हवामानाचा असा दोन्हींचा अभ्यास करून बाग लागवड आणि व्यवस्थापन साधल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर काल एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एका दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले. बस उलटल्यावर मागून येणाऱ्या एका चारचाकी वाहनानं या बसला धडक दिली. बसचा चालक आणि क्लिनर सुरू बसमध्ये रील बनवत होते, अशी माहिती प्रवाशांनी दिली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी तालुक्यात कामठा फाटा इथं पुलावर दोन ट्रक समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. काल सकाळी हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथं काल सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती, थोड्या वेळाने एका सात वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. दहा वर्षीय साईचरण स्वामी आणि सात वर्षीय देवंश स्वामी हे अचानक बेपत्ता झाले होते. साईचरण हा अद्यापही बेपत्ता असून, त्याचा शोध सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला आहे. २०२७ च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याचं नियामक मंडळानं म्हटलं आहे.

****

हवामान

विदर्भात उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून, काल अकोला आणि वर्धा इथं सर्वाधिक ४५ अंश सलेसिअस तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं सरासरी ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.

दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काल तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २५ तारखेपर्यंत, तर विदर्भात २२ तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...