Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 06 April 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
विविध राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा
आढावा घेण्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे निर्देश, राज्यात शेतकऱ्यांना
नुकसानभरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
·
राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण – एसआयआर अंतर्गत मतदार
यादी तपासणीचा कार्यक्रम सुरु
·
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी
अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
·
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेशन दुकानांमधून गहू आणि
तांदळासोबत मका वितरित केला जाणार
आणि
·
पुढील २४ तासांत मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता
****
देशातल्या
अनेक राज्यांमधे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश केंद्रीय
कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहेत. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या
नुकसानीविषयी त्यांनी काल संबंधित राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी चर्चा करुन आढावा घेतला.
**
दरम्यान, राज्यात गेल्या
आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानापोटी नियमानुसार भरपाई देण्यात
येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक
इथं अखिल भारतीय संत संमेलनाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अवकाळी पावसामुळे
झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात असून, त्याचा अहवाल आल्यानंतर
भरपाई दिली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिकमधल्या
भोंदू अशोक खरात प्रकरणाची चौकशी वेगानं सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
विशेष चौकशी पथकाला यासंदर्भात अनेक प्रकारची माहिती मिळाली आहे. त्या आधारे बनावट
खात्यांतल्या उलाढालीची तपासणी सक्तवसुली संचलनालयातर्फे चौकशी केली जाईल, तसंच खरात
प्रकरणाचे सीडीआर राजकीय व्यक्तींकडे कसे पोहोचले याची चौकशीही होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
त्र्यंबकेश्वरमध्ये
पुढल्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामं केली जात आहेत.
गोदावरी नदीचं शुद्धीकरण, तसंच त्र्यंबकेश्वर इथं गोदावरीचा प्रवाह बारमाही व्हावा यासाठी
प्रयत्न केले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नाशिकमध्ये साधुग्रामसाठी कायमस्वरूपी
जमीन अधिग्रहणाचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
प्रदेश
काँग्रेसनं पक्ष बांधणीमध्ये आमुलाग्र बदल करण्यासाठी संघटन सृजन अभियान सुरु केलं
आहे. याद्वारे पहिल्यांदाच तालुका अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात
७२ जिल्हा अध्यक्ष आणि ६७५ तालुकाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. तालुकाध्यक्षांबरोबरच
काँग्रेसच्या इतर दहा संस्थांसाठीच्या तालुकास्तरीय अध्यक्षांचीही निवड केली जाणार
असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
विशेष सखोल
पुनरीक्षण – एसआयआर अंतर्गत राज्यात मतदार यादी तपासणीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला
आहे. याची पूर्वतयारी म्हणून सध्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या
नावाची २००२ च्या मतदार यादीशी जुळवणी करत आहेत. मतदारयादीतले अस्पष्ट फोटो, चुकीचे तपशील
याची सुद्धा दुरुस्ती केली जात आहे. ज्या मतदारांचं नाव २००२ च्या मतदार यादीत नव्हतं,
त्यांचे वडील किंवा आई यांची नावं त्या यादीत सापडणं आवश्यक आहे. सखोल
पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान संपूर्ण मतदारयादी नव्यानं तयार केली जाणार आहे. त्यासाठी
प्रत्येक मतदाराकडून माहिती अर्ज भरून घेतला जाणार आहे.
****
ईस्टरचा
सण काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. व्हेटिकन सिटीमध्ये पोप लिओ चौदावे यांनी ईस्टर
प्रार्थना केल्यानंतर जगभरात ईस्टर सणाला सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती
सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना
ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातल्या विविध चर्चमध्ये काल विशेष प्रार्थना आणि प्रवचनांसह
अनेक कार्यक्रमातून येशूच्या पुनरुत्थानाचा हा सण साजरा झाला.
****
बारामती
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काग्रेसनं आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवादी जाहिर केली
आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, महायुतीकडून
सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करणार आहेत.
अहिल्यानगर
जिल्ह्यातल्या राहुरी इथल्या पोटनिवडणुकीत आतापर्यंत चार अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीसाठी
भाजपने अक्षय कर्डिले यांना उमेदवादी दिली असून, महाविकास आघाडीने
अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. या दोन्ही मतदारसंघात येत्या २३ तारखेला मतदान होणार
आहे.
दरम्यान, बारामतीची
पोटनिवडणूक अत्यंत संवेदनशील परिस्थितीत होत असून, ही निवडणूक
बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत
होते. यासाठी महायुतीतील शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांनी देखील सामंजस्याची भूमिका घ्यावी,
अशी विनंती तटकरे यांनी केली.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब
लाभार्थींना आता रेशन दुकानांमधून गहू आणि तांदळासोबत मकादेखील वितरित केला जाणार आहे.
अंत्योदयच्या कार्डधारकांना पुढील तीन महिने प्रति कार्ड १० किलो याप्रमाणे मका दिला
जाणार आहे. जिल्ह्यात रेशनचे एकूण पाच लाख ३८ हजार लाभार्थी आहेत. तर स्वस्त धान्य
दुकानांची संख्या एक हजार ८०२ इतकी आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात काल ३६ लाख ७५ हजार रुपयांच्या चंदनासह सुमारे ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने लोहा इथं ही
कारवाई केली. हे चंदन लातूरहून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूरकडे नेलं जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. याप्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
****
अहिल्यानगर
जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं विमान इंधन चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.
या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली
असून, मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. पोलीस पथकानं गुप्त माहितीच्या
आधारे गव्हाणवाडी परिसरात छापा टाकत इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरमधून विमान इंधनाची चोरी
करणाऱ्या तिघांना रंगेहाथ पकडलं. हे सर्वजण या विमान इंधनाची विक्री काळ्या बाजारात
करणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या दाभड इथं होणारा बालविवाह काल पोलिसांनी रोखला. किनवट
तालुक्यातल्या एका १६ वर्षीय मुलीच्या विवाहाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक
चंद्रशेखर कदम यांनी हा विवाह रोखला. या बालविवाहास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
छत्रपती
संभाजीनगरमध्ये दामिनी पथकाने काल दोन चिमुकल्यांच्या अपहरणाचा डाव उधळून लावला. सिडको
बसस्थानकात हा प्रकार घडत असल्याची माहिती पथकाला मिळाली, यापैकी एक
मुलगा अंदाजे दोन वर्षांचा तर दुसरा आठ वर्षांचा होता. दामिनी पथकाने मुलांची आस्थेवाईकपणे
विचारपूस केली आणि त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मुलांना त्यांच्या ताब्यात दिलं.
पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेतलं आहे.
****
बीड इथल्या
विवेकानंद रुग्णालयाचे संचालक डॉक्टर रोहित तोष्णीवाल यांनी जगप्रसिद्ध एव्हरेस्ट बेस
कॅम्प मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. तोष्णीवाल यांच्यासह सचिन तांदळे, तसंच डॉक्टर तृप्ती
सारडा यांनीही ही मोहीम पूर्ण केली आहे. सुमारे १८ हजार २०० फूट उंचीवरील एव्हरेस्ट
बेस कॅम्प गाठण्यासाठी उणे १० ते २० अंश सेल्सिअस तापमान, विरळ
ऑक्सिजन आणि कठीण भौगोलिक परिस्थितीचा सामना करत या तिघांनी हे यश साध्य केलं.
****
राज्य खो-खो
संघटनेच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदासाठी
निवडणूक होणार होती. मात्र, या पदासाठी सुनेत्रा पवार यांचा एकच अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध
झाली. खो-खो संघटनेत अनेक वर्षांनी हा सन्मान महिलेला मिळाला आहे.
****
१७ वर्षांखालच्या
मुला-मुलींसाठीची सातवी राष्ट्रीय कनिष्ठ गट मुष्टियुद्ध स्पर्धा कालपासून नागपुरात
सुरू झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं.
येत्या ११ तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातून सुमारे ६०० मुष्टियोद्धे सहभागी
होत आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची १७ वर्षांखालील भारतीय
संघात निवड करण्यात येईल.
****
हवामान
येत्या
२४ तासांत मराठवाड्यासह विदर्भ तसंच राज्यालगतच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान
विभागानं वर्तवली आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी
सुमारे तीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली
आहे.
****
No comments:
Post a Comment