Monday, 20 April 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 20 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता

****

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग भारत दौऱ्यावर असून, आज त्यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपती ली जे म्युंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आज बैठक होणार आहे. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांसह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर ते चर्चा करतील. जहाजबांधणी, व्यापार, गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स, उदयोन्मुख तंत्रज्ञान, नागरी संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. राष्ट्राध्यक्ष म्यूंग आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यातही चर्चा होणार आहे.

****

पश्चिम बंगाल आणि तामीळनाडूत विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते ठिकठिकाणी प्रचार सभा आणि रोड शो घेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन आज पश्चिम बंगालमधल्या पूर्बा मोगिनीपूर मध्ये सभेला संबोधित करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज कूचबिहार आणि सिलिगुडी इथं, तर तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी खारदाहा इथं सभा घेणार आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झारग्राम, पुरुलिया आणि बिष्णुपूर जिल्ह्यात प्रचार सभांना संबोधित केलं. तृणमूल काँग्रेसनं जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ भ्रष्टाचार आणि खंडणीखोरीला खतपाणी घातल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

तमिळनाडूत भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इरोडमध्ये शिवगिरी आणि मोडाकुरुची इथं प्रचार केला. द्रमुक सरकार निष्क्रिय असून त्यांनी लोककल्याणाकडे दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या उत्तरेकडेच्या जिल्ह्यांमध्ये आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही कोईम्बतूर, तिरुपूर आणि निलगिरी भागात धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीत सहभाग घेतला.

****

ओडिशामध्ये देशातल्या पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटचा शुभारंभ काल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या हस्ते झालं. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना देत ओडिशा आयटी आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातलं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे. देशाला सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्याचं सरकारचं उद्दीष्ट असून, ते साकार करण्यासाठी ओडिशा सज्ज असल्याचं मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी स्पष्ट केलं.

****

तामिळनाडूमध्ये मुथुलिंगापुरम इथल्या एका फटाक्यांच्या कारखान्यात काल झालेल्या स्फोटात २३ कामगारांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. कारखान्यातला ज्वलनशील रासायनिक पदार्थ हलवला जात असताना हा स्फोट झाला. दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत झालेल्या जीवित हानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

****

पालघरच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्या वतीने दुर्गम भागांसाठी फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांचं लोकार्पण काल करण्यात आलं; त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य सुविधा दुर्गम भागात पोहोचवणं गरजेचं असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. रोजगार, पाणी आणि आरोग्य समस्यांवर उपाययोजना करून आदर्श गाव संकल्पना राबवण्याची घोषणा देखील वर्मा यांनी यावेळी केली. त्याचबरोबर आदिवासी विकासासाठी प्रशासनासह, सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

वाशीम जिल्ह्यात ५५५ मेट्रिक टन डीएपी खत विक्री केल्याप्रकरणी आठ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर चार कृषि केंद्राना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या तयारी पूर्वीच विक्री झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

****

कोल्हापूर जिल्ह्याने पोषण अभियानात उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. राज्यात तिसरा क्रमांक पटकावत, जिल्ह्यातल्या १८ ग्रामपंचायतींनी कुपोषण निर्मूलनासाठी केलेल्या प्रभावी कामाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला एक लाख रुपयांचं प्रोत्साहन जाहीर करण्यात आलं आहे. अंगणवाडी केंद्रांमधल्या बालकांच्या पोषणावर सातत्याने लक्ष, तसंच सेविका, अधिकारी आणि पालकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली आहे.

****

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या वडीलासुरा इथल्या सिद्धार्थ बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना आणि अनावरण सोहळा काल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. राज्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध विकासकामं सुरू असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 20 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...