Thursday, 9 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता

****

विधानमंडळांमध्ये महिलांसाठी आरक्षण हे अधिक बळकट आणि सर्वसमावेशक लोकशाहीसाठी अत्यावश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 'महिला आरक्षण विधेयकावर त्यांनी एक लेख लिहिला असून, महिलांसाठी आरक्षणामुळे लोकशाही अधिक चैतन्यशील आणि सहभागी होईल, असं नमूद केलं. जेव्हा महिलांची प्रगती होते, तेव्हाच समाजाची प्रगती होते, या तत्त्वाची पुष्टी करत त्यांनी, या आरक्षणाच्या अंमलबजावणीस होणारा कोणताही विलंब अत्यंत दुर्दैवी ठरेल, असं म्हटलं आहे. जेव्हा महिला प्रशासकीय आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या आपल्या अनुभवांतून आणि दृष्टिकोनातून प्रशासनाची गुणवत्ता वाढवतात, असंही पंतप्रधान म्हणाले.

****

पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीमुळे जागतिक हवाई वाहतुक क्षेत्रासमोर मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतुक मंत्रालयानं आणखी एक महत्वाचा निर्णय घेत देशांतर्गत वाहतुक कंपन्यांसाठी तीन महिन्यांकरता लँडिंग आणि पार्किंग शुल्कात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी हवाई वाहतुक मंत्री राममोहन नायडू यांनी यासंदर्भात माहिती दिली.

****

डेटा सेंटरमधली प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि बँडविड्थ वाढवण्याची क्षमता शासनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत इक्विनिक्स कंपनीच्या एमबी-थ्री डेटा सेंटरचं उद्घाटन करताना ते बोलत होते. ऊर्जा शाश्वततेच्या दृष्टीनं यवतमाळ इथं उभारण्यात आलेल्या २६ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून या डेटा सेंटरसाठी आवश्यक ऊर्जेचा मोठा भाग उपलब्ध करून देण्यात येत आहे.

****

नाशिकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर इथं येणाऱ्या भाविकांना उत्तम, दर्जेदार सुविधा देण्यासाठी नियोजन करावं, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळा आणि विविध विभागांच्या कामांचा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आरोग्य विभागाकडून कुंभमेळ्यासाठी १ हजार ३०० खाटांचं नियोजन करण्यात आलं आहे, यासाठी दर्शन पथ मार्गावरील शासकीय रुग्णालय देवस्थान ट्रस्टच्या कायमस्वरूपी जागेत उभारण्यात यावं, तसंच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी अशा सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या.

****

लातूर जिल्ह्यात रेणापूर जवळ झालेल्या भीषण अपघातात बीड जिल्ह्यातल्या केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू झाला. लातूर–अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूरजवळील पिंपळ फाटा इथं आज सकाळी हा अपघात झाला.

****

नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात झालेल्या खून प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोन पोलिस अंमलदारांना निलंबित करण्यात आलं आहे. भाग्यनगर ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक आनंद राठोड आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक नागेश वाडीयार या दोघांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जारी केले. त्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

****

बीड जिल्ह्यात धारूर घाट इथं वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचं सरळीकरण आणि रुंदीकरण करण्याचा निर्णय काल जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर माजलगाव ते केज या मार्गाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी २७ लाख रुपये निधीलाही यावेळी मंजुरी देण्यात आली.

****

समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अपघाती मृत्यू झालेल्या आठ महिलांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये प्रमाणे एकूण रुपये ४० लाख इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम जालना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नागरिकांच्या जमिनीसंबंधित विविध तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे, नागरिकांनी १० एप्रिलपर्यंत तक्रार अर्ज सादर करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं.

****

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधुने मलेशियाच्या वोंग लिंग चिंग हिला हरवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधुने तिला १५-२१, २१-११, २१-१९ असं पराभूत केलं. भारताचा आयुष शेट्टी यानेही स्पर्धेच्या उप–उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता त्याचा सामना चीनी तैपेईच्या के ची यू जेन याच्याशी होईल. भारताच्या लक्ष्य सेनला, हाँगकाँगच्या ली चेक यू विरुद्ध पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत मालविका बनसोड आणि तन्वी शर्मा याही पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडल्या आहेत.

****

सांगलीत काल अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनोईंग आणि कयाकिंग अजिंक्यपद स्पर्धेची सांगता झाली. या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात १९ पदकांची कमाई करून अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठानं विजेतेपद पटकावलं. मोहालीच्या चंदीगड विद्यापीठानं उपविजेतेपद राखलं तर स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला २ पदकांवर समाधान मानावं लागलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...