Saturday, 18 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 18 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

जगाच्या तेल निर्यातीकरिता अतिशय महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीमधील जहाजांच्या मार्गाला संरक्षित करण्यासाठी ब्रिटन आणि फ्रान्स यांनी घेतलेल्या पुढाकारामध्ये सहभागी होण्यासाठी भारतालाही निमंत्रित करण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तत्पूर्वी, इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझ सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय तेल व्यापार करणाऱ्या जहाजांसाठी खुली करण्याचं इराणनं जाहीर केलं होतं.

****

संसदेची दोन्ही सभागृहे आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली. तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनासह गेल्या २८ जानेवारीला सुरू झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचाही समारोप झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहाने ९३ टक्के कार्यक्षमता नोंदवल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी समारोपीय भाषणात सांगितलं. सभागृहाची एकूण ४१ सत्रे झाली. अधिवेशनादरम्यान बारा सरकारी विधेयके सादर करण्यात आली आणि नऊ विधेयके मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यसभेचं कामकाज १५७ तासांहून अधिक काळ चालले आणि या सत्राची उत्पादकता सुमारे ११० टक्के होती, अशी माहिती अध्यक्ष सी. पी राधाकृष्णन यांनी दिली.

****

संसद आणि राज्य विधीमंडळांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाची तरतूद असलेलं घटनेतील १३१ वी दुरुस्ती विधेयक म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम लोकसभेत दोन तृतीअंश बहुमताअभावी मंजूर होऊ शकलं नाही. दरम्यान, विरोधकांसाठी महिला सक्षमीकरण केवळ भाषणं आणि घोषणांपुरतंच मर्यादित असल्याची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका आज केली.

****

या वर्षीच्या हज यात्रेसाठी ३७१ यात्रेकरूंची पहिली तुकडी आज नवी दिल्लीहून सौदी अरेबियातील मक्का येथे रवाना झाली. यात्रेकरू इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मक्काकडे रवाना झाल्याची माहिती दिल्ली हज समितीच्या अध्यक्षा कौसर जहाँ यांनी पत्रकारांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व सुविधांचा सातत्याने विस्तार केला जात आहे आणि हज यात्रा सुरळीत, सुखद आणि सोपी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-महाटीइटीसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी २४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या २१ जूनला ही परीक्षा होणार आहे.

****

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील तरुणींचे लैंगिक शोषण व अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील “द कॅफे रॉयल 10” येथे काही तरुणींना आणून त्यांच्यासोबत अश्लील कृत्ये करत शोषण केल्याचा आरोप आहे. हे कॅफे पूर्वीपासून वादग्रस्त असल्याचीही माहिती तपासात स्पष्ट झाली आहे. यापूर्वी पोलिसांनी येथे धाड टाकून मुला-मुलींना ताब्यात घेतल्याची नोंद आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीविरोधात कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

****

आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये लैंगिक छळ आणि धर्मांतरणाच्या गंभीर आरोपांप्रकरणी पोलिस तपास सुरू असताना, कंपनीने प्रमुख आरोपी निदा खानचा बचाव केला आहे. निदा खानच्या विरोधात आम्हाला आंतरिक स्तरावर कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झाली नसल्याचे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले. तसेच निदा खान एचआर मॅनेजर पदावर नसल्याचे देखील टीसीएसकडून सांगण्यात आले. टीसीएसने या प्रकरणाच्या पारदर्शक तपासासाठी एक देखरेख समिती स्थापन केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर निदा खान फरार असून तिने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला आहे.

****

राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये या तरतुदींचे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि निरीक्षक यांच्या पथकांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचे शासनानं स्पष्ट केलं आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना प्रथम नोटीस देण्यात येईल आणि १५ दिवसांत खुलासा सादर करणे बंधनकारक असेल. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनावर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील महिला टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या पाच सामन्यांच्या शृंखलेतील दुसरा सामना उद्या डर्बन इथं खेळला जाणार आहे. तिसरा सामना २२ तर चौथा २५ एप्रिलला जोहान्सबर्ग इथं खेळला जाईल. काल झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानं दक्षिण आफ्रिका मालिकेत १-० नं आघाडीवर आहे.

****

काश्मीर खोऱ्यामध्ये आज सकाळी ८ वाजून २४ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.३ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचे केंद्र अफगानिस्तानमधील बदाखशान प्रांत येथे असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. या भूकंपाने कोणतीही जिवित वा वित्त हानी झाली नसल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

****

आज जागतिक वारसा दिन सर्वत्र साजरा होत आहे. १९८३ साली युनेस्कोनं या दिवसाला मान्यता दिल्यानंतर जागतिक वारसा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...