Saturday, 25 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      बँकांनी विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचं अर्थमंत्र्यांचं आवाहन

·      देशात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा स्थिर असल्याची पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती

·      प्रवाशांशी मराठीतून संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमध्ये बदल करण्याचा सरकारचा प्रस्ताव

·      छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार मॅपिंगचं ७३ टक्के काम पूर्ण

आणि

·      छत्रपती संभाजीनगर इथल्या ग्रामविकास संस्थेला वर्ष २०२२ चा जलभूषण पुरस्कार जाहीर

****

बँकांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. पुण्यात काल भारतीय स्टेट बँकेच्या महाराष्ट्र परिक्षेत्राच्या स्थानिक मुख्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. देशाच्या विकासात बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, तळागाळातल्या नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी सरकार एसबीआयच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याचं त्यांनी सांगितलं.

सार्वजनिक क्षेत्रातल्या इतर बँकांच्या विलिनीकरणाचा कुठलाही मुद्दा सरकारच्या विचाराधीन नाही. यासंदर्भात उच्च स्तरीय बँकिंग समिती अभ्यास करेल, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. डिजिटायझेशन महत्वाचं असून, त्यामुळेच सर्वसमावेशकतेला चालना मिळते, पण त्याचसोबत आपण आपल्या ग्राहकांपासून दूर न जाता व्यवहारातील मानवी भाव जपायला हवा, असं त्या म्हणाल्या. ग्राहक आणि बँक कर्मचारी यांच्यात प्रत्यक्ष संवादाचं, संबंधाचं महत्त्व अधोरेखित करताना भारतीय स्टेट बँकेच्या प्रयत्नांचं अर्थमंत्र्यांनी कौतुक केलं.

****

पश्चिम आशियातल्या संकटामुळे आयातीवर परिणाम झाला असला तरी, एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा देशांतर्गत पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं आहे. त्या काल नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेत बोलत होत्या. गॅस पुरवठा खंडित झाल्याचं कोणतेही वृत्त नाही आणि इंधनाच्या दरातही वाढ झालेली नाही, ग्राहकांनी घाबरून खरेदी करणं टाळावं आणि घरपोच एलपीजी वितरणासाठी ऑनलाइन बुकिंगचा वापर करावा, असं त्या म्हणाल्या.

बाईट – सुजाता शर्मा

 

व्यावसायिक एलपीजी पुरवठा मोठ्या प्रमाणात पूर्ववत झाला असून, पीएनजी जोडण्यांचा विस्तार सुरू आहे, तर कच्च्या तेलाचा पुरेसा साठा आणि तेल शुद्धीकरणाचं कामकाज अखंड ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करत असल्याचंही शर्मा यांनी सांगितलं.

****

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा, संदिप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह सात खासदारांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. या खासदरांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. राज्यसभेतले हरभजनसिंग, स्वाती मालिवाल, राजेंद्र गुप्ता आणि विक्रम साहनी हे खासदार देखील आपल्या सोबत असून, यासंदर्भातलं पत्र राज्यसभेच्या सभापतींना दिल्याचं त्यांनी सांगितलं. २४४ सदस्यांच्या राज्यसभेत एनडीकडं आता १४५ खासदार आहेत.

****

राज्यातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी मराठीतून संवाद साधण्यासाठी राज्य सरकारनं महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यात वाहनचालकांसाठी मराठी भाषेचं व्यवहारिक ज्ञान अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित आहे. तसंच सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी देताना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासलं जाईल. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचं ज्ञान दाखवणं बंधनकारक असेल. परिवहन आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून, त्यानुसार अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मसुदा नियमांवर नागरिक, संघटना तसंच संबंधित घटकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सूचनांचा शासनाकडून विचार केला जाईल.

****

नाशिक इथं आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी निमित्तानं गोदावरी ते नर्मदा जलयात्रा काढण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. ५०० किलोमीटरचा प्रवास करुन, मध्य प्रदेशातल्या महेश्वर इथं या यात्रेचा समारोप होईल.

****

नांदेड शहरातल्या इस्लामपुरा भागात महापालिकेनं विकास कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाल्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं नांदेड वाघाळा महापालिकेला नोटीस पाठवली आहे. आयोगानं प्रसारमाध्यमांवरिल बातम्यांची दखल घेत पालिकेला दोन आठवड्यात विस्तृत अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

****

बीड जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा योजना तसंच विकासकामांना गती देण्याची सूचना खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाला दिली आहे. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी २७ विभागांचा आढावा घेतला. जलजीवन मिशन आणि पेयजल तसंच स्वच्छता विभागाच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असून, अनेक ठिकाणी नळ योजना केवळ कागदावरच असल्याकडे खासदार सोवनणे यांनी लक्ष वेधून, अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

****

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच झालेल्या निर्णयाप्रमाणे धाराशिव जवळील कौडगाव औद्योगिक वसाहतीत ग्लोबल फोर्ज कंपनी दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यातून संरक्षण विषयक सामग्री तयार करण्यासह भारत बायोगॅस लिमिटेडचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. यातून जवळपास तीन हजार  जणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या आनंदवाडीच्या आनंद उपसा जलसिंचन पाणी वापर सहकारी संस्थेला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रथम राज्यस्तरिय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय समितीनं केलेल्या छाननीनंतर संस्थेचे सिंचन अभिलेख, अद्ययावत व्यवस्थापन आणि कामकाजातील पारदर्शकता पाहून या संस्थेची प्रथम पुरस्कारासाठी निवड केली आहे.

****

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार मॅपिंगचं काम सुरू आहे. या मोहिमेत आतापर्यंत २३ लाख ९६ हजार ३२३ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून एकूण प्रगती ७३.६९  टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधरी यांनी ही माहिती दिली. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून मतदान मॅपिंग प्रक्रियेसाठी घरी येणाऱ्या बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना अचूक माहिती द्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

****

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे २०२२ या वर्षासाठीचे जलभूषण पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या ग्रामविकास संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या संस्थेनं मराठवाड्यातल्या चिते नदीचं पुनरुज्जीवन अभियान राबवलं, या कामामुळे नदी प्रवाहित होऊन झालेल्या जलक्रांतीमुळे २७ गावं कायमची दुष्काळमुक्त झाली. या पुरस्कारामुळं जलसंधारण चळवळीला निश्चित बळ मिळेल, असा विश्वास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी व्यक्त केला, ते म्हणाले.

बाईट – नरहरी शिवपुरे

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय – घाटी मध्ये देहदान केलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांचा काल कृतज्ञता पूर्वक सत्कार करण्यात आला. रुग्णालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची विशेष उपस्थिती होती.

****

जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातल्या पाच हजार ३१२ मुलींना लाभ देण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...