Wednesday, 22 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण जाहीर; घनकचऱ्याचं पर्यावरणपूरक व्यवस्थापन तसंच हरित गृह वायू उत्सर्जन कमी होण्यास मदत

·      विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ई-निरसनप्रणालीचा शुभारंभ

·      पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण; दहशतवादाविरुद्ध भारताचा निर्धार राष्ट्रपतींकडून व्यक्त

आणि

·      मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी चार संशयित दोषमुक्त

****

महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण २०२६ आज राज्य सरकारने जाहीर केलं. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे घनकचऱ्याचं पर्यावरणपूरक व्यवस्थापन तसंच हरित गृह वायू उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे.

कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार जमिनीचं रुपांतर भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये करण्यासाठीच्या अधिमूल्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. याबाबतची अधिसूचना काढण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातल्या सात आदर्श महाविद्यालयातल्या शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन देण्याचा निर्णयही झाला आहे. या पदावरच्या शिक्षकांना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमधे अतिरिक्त गुण मिळणार आहेत.

****

बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. राहुरीत एकूण तीन लाख ३३ हजार ५४५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना सुरक्षित आणि निर्भयपणे मतदान करता यावं यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सर्व केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे थेट लक्ष ठेवलं जाणार आहे.

****

विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘ई-निरसन’ या अत्याधुनिक डिजिटल प्रणालीचा शुभारंभ आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. लोणेरे इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने ही प्रणाली विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली तक्रारींचं स्वयंचलित वर्गीकरण करून त्या संबंधित विभागाकडे तत्काळ पाठवते, तसंच विद्यार्थ्यांना तक्रारीची सद्यस्थिती ‘लाइव्ह ट्रॅकिंग’ द्वारे पाहता येते. या प्रणालीमुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार असून, विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असल्याचं मंत्री पाटील यावेळी  म्हणाले.

****

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी कथितरित्या केलेल्या अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी भाजपाच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. या प्रकरणी निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी तसंच खरगे यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनदी अधिकाऱ्यांना विकसित भारताच्या उभारणीच्या ध्येयाशी आपले सर्व प्रयत्न जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी आज देशातल्या सनदी अधिकार्यांना लिहिलेल्या पत्रात, या अधिकार्यांच्या सतत शिकण्याच्या आणि क्षमता वाढवण्याच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली. नुकत्याच पार पडलेल्या कर्मयोगी साधना सप्ताहातल्या उत्साही सहभागाबद्दल पंतप्रधानांनी सनदी अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. 'आय गॉट कर्मयोगी' सारख्या व्यासपीठांचा वापर करून शिकण्याची सवय आयुष्यभर लावून घेण्याचं आवाहन त्यांनी सनदी अधिकार्यांना केलं.

****

चारधाम यात्रेत आज सकाळी आठ वाजता केदारनाथ मंदिराची दारं मंत्रांच्या घोषात आणि पारंपारिक विधींनी उघडण्यात आली. यावेळी मंदिरावर आणि भाविकांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यावेळी उपस्थित होते.

केदारनाथ आणि चारधाम यात्रा म्हणजे देशाच्या विश्वास, एकता आणि वैभवशाली परंपरेचा आध्यात्मिक महोत्सव असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. चारधाम यात्रेच्या अनुषंगानं त्यांनी देशवासियांसाठी एक पत्र लिहिलं. उत्तराखंड मधली ही यात्रा म्हणजे देशाचं नैसर्गिक वैभव आहे, त्यामुळे यात्रेदरम्यान या परिसराची स्वच्छता राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

पहलगाम इथं झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना देशभरातून आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दहशतवादाविरुद्ध भारताचा निर्धार पुन्हा व्यक्त करत, हल्ल्यातील मृतांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही देश एकजुटीनं उभा असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “भारत दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही” असा ठाम संदेश दिला, तर गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादाविरुद्ध शुन्य सहिष्णुता धोरण कायम असल्याचं स्पष्ट केलं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचा प्रतिसाद निर्णायक असल्याचं सांगितलं. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. काश्मीरमध्ये स्थानिक नागरिकांनीही ऐक्य दर्शवणाऱ्या रॅली काढत शहीदांना श्रद्धांजली वाहिली असून, बैसरन घाटी इथं स्मारक उभारण्यात आलं आहे.

****

जागतिक वसुंधरा दिवस आज साजरा होत आहे. पृथ्वीचं आरोग्य जपणं आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. १९७० पासून दरवर्षी साजरा होणारा हा दिवस आपल्याला पृथ्वीचं संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असल्याची आठवण करून देतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शुभेच्छा देताना विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत वसुंधरेचं संवर्धन करण्याचं आवाहन केलं आहे.

****

राज्यात अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर, महिला आणि बाल विकास विभागानं विशेष पथकाच्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवलं. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.

****

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी चार संशयितांना मुंबई उच्च न्यायालयानं आज दोषमुक्त केलं आणि त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करायचा विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय रद्दबातल ठरवला. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या पीठानं हा निर्णय दिला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या चौघांविरुद्ध आरोपपत्र करायचे आदेश विशेष न्यायालयानं दिले होते.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रस्ते सुरक्षा अभियानाच्या जनजागृती उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नियुक्ती करार हस्तांतरित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

****

प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत ऑनलाइन लॉटरी पद्धतीद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना बँकांकडून गृहनिर्माण कर्ज मिळवून देण्यासाठी संबंधित विकासकांनी सक्रिय समन्वय ठेवावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. आज विकासकांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ऑनलाइन लॉटरीत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी एकूण रकमेपैकी १० टक्के रक्कम एकरकमी भरणं बंधनकारक असून, उर्वरित रकमेकरता ते बँकांकडून कर्ज घेऊ शकतात. लाभार्थ्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी विकासकांनी कॉल सेंटरची स्थापना करावी, यामुळे प्रक्रियेचा पाठपुरावा करणं सुलभ होईल असं आयुक्तांनी यावेळी सांगितलं.

****

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मध्यवर्ती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं कालपासून संप पुकारला आहे. या संपाला शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटनेचा १०० टक्के प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजीनगर इथं आज संघटनेचे सरचिटणीस देवानंद लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मुद्रणालय विभागासमोर निदर्शनं करण्यात आली.

****

महिला आरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेसने घेतलेल्या विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आज बीड इथं आंदोलन करण्यात आलं. नगरसेविका डॉ.सारिका क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विरोधकांच्या विरोधा घोषणा देण्यात आल्या.

छत्रपती संभाजीनगर इथंही भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने निराला बाजार परिसरात आंदोलन करण्यात आलं. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, नगरसेविका अमृता पालोदकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या.

****

बीड विधानसभा मतदारसंघात महसूल विभागाशी निगडित असलेल्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेंतर्गत बीड मतदारसंघातील वाडी-वस्त्यांच्या रस्त्यासाठी भरीव तरतूद करावी, यासह अनेक महत्वपूर्ण विषयांवर ही बैठक झाली, लवकरच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत बावनकुळे यांनी सकारात्मकता दर्शवली.

****

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरामध्ये व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या आर्थिक लुटीच्या विरोधात सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील माँ जिजाऊ चौक चौफुलीवर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर हळद पेटवून सरकार आणि बाजार समिती प्रशासनाचा निषेध नोंदवला. राष्ट्रीय स्तरावर हळदीचे दर प्रति क्विंटल १६,५०० रुपयांच्या आसपास असताना, स्थानिक बाजार समितीत व्यापारी केवळ १२,००० ते १३,५०० रुपयांनी खरेदी करत आहेत. प्रति क्विंटल ३ ते ४ हजार रुपयांची ही तफावत म्हणजे शेतकऱ्यांची उघड लूट असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

****

हवामान

मराठवाड्यात उद्या अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यात इतर ठिकाणी येत्या पंचवीस तारखेपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...