Tuesday, 14 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 14 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात अभिवादन करण्यात येत आहे. सकाळपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातमधल्या गांधीनगर इथं लोकभवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी संसद परिसरातल्या प्रेरणा स्थळावर आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली.

****

समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्त्वांप्रती बाबासाहेबांची अखंड बांधिलकी त्यांच्या जीवनकार्यांतून स्पष्ट होते. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि महान योगदानामुळे देश अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि समतोल समाजाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

राष्ट्रनिर्मितीत बाबासाहेबांच्या महान योगदानामुळे अनेक पिढ्यांना न्याय्य आणि प्रगत समाज घडवण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे.

मुंबईत चैत्यभूमी इथं राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. मंत्री छगन भुजबळ, आशिष शेलार, संजय शिरसाट, मुंबईच्या महापौर रितू तावडे, माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. मुंबईसह राज्याच्या विविध भागातून अनुयायी चैत्यभुमीवर दाखल होत आहेत. याठिकाणी बाबासाहेबांना शासकीमानवंदना देऊन, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना नागरीकांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आज भारत प्रगती करतोय त्याचं एकमेव कारण भारताचं संविधान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्त्व आणि त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

नागपूरातल्या दीक्षाभूमी इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.

****

परभणी शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं, भिक्खू संघाच्या वतीने सामूहिक महावंदना घेण्यात आली. यावेळी पंचशील ध्वजारोहण समता दलाची रॅली काढून अभिवादनही करण्यात आलं. यानिमित्त शहरात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

रत्नागिरी इथं जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरच्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला मध्यरात्री पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्या वेळी पोलीस बँड पथकाचं सादरीकरणही झालं.

नाशिकमध्ये आंबेडकर जयंती उत्सवाला मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. यानिमित्तानं फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली.

नंदुरबार इथं आज सामूहिक बुद्धवंदना देण्यात आली. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी खासदार डॉ हिना गावित उपस्थित होते.

धुळे आणि बुलडाणा इथं देखील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात येत आहे.

****

धोरणं आणि नीती निर्माण करण्याच्या प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग असल्यास, २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रवासाचा दृष्टीकोन अधिक मजबूत होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या नारी शक्तीला लिहिलेल्या पत्रात पंतप्रधानांनी हे मत व्यक्त केलं असून, नारी शक्ति वंदन अधिनियमाशी संबंधित महत्वपूर्ण सुधारणांवर चर्चा करण्यासाठी आणि हा नियम सदनात पारित करण्यासाठी १६ एप्रिलला संसदेचं सत्र पुन्हा सुरू होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

भाजीच्या कॅरेटच्या सहाय्यानं वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांना नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...