Tuesday, 28 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वं जारी

·      बनारस–पुणे आणि अयोध्या–मुंबई या दोन अमृत भारत रेल्वे गाड्यांना प्रारंभ

·      रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष मोहीम

·      स्वतंत्र बियाणे कायदा करण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

आणि

·      सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बीड जिल्हा प्रशासनाचा गौरव

****

वाढतं तापमान आणि उष्णतेच्या लाटांपासून कामगारांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक तत्वं जारी केले आहेत. यासंदर्भात सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना पत्र लिहून, कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि काम तसंच विश्रांतीसाठी थंड जागांची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि कामगार कल्याण महासंचालक यांच्या अखत्यारीतील रुग्णालयं तसंच आरोग्य केंद्रांना उष्माघातावर तत्काळ उपचारासाठी मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच सर्व संस्थांनी याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दर १५ दिवसांनी सादर करण्याचे निर्देशही मंत्रालयाने दिले आहेत.

दरम्यान, राज्यात संपूर्ण विदर्भात पुढचे दोन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

डिजिटल अटकेच्या प्रकारात सहभागी असलेल्या ९ हजार ४०० मोबाइल क्रमांकांवर व्हॉट्सॲपनं जानेवारीपासून बंदी घातली आहे. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. रिझर्व्ह बँक, तंत्रज्ञान कंपन्या आणि केंद्रीय अन्वेषण संस्था-सीबीआय यांच्या सहकार्यानं ही कारवाई करण्यात आली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं यासंदर्भात स्वतः खटला दाखल करून घेतला होता.

****

पंतप्रधान आजपासून उत्तर प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी वाराणसी इथे त्यांचा भव्य रोड शो झाला. महिला संमेलनालाही पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं. या भेटीत बनारस–पुणे आणि अयोध्या–मुंबई या दोन नव्या अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना, पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सहा हजार ३५० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणीही पंतप्रधानांच्या या दौऱ्यात करण्यात येत आहे.

दरम्यान, ईशान्येकडची राज्यं म्हणजे देशाच्या अष्टलक्ष्मी असून, समृद्धी आणि संपत्तीच्या विविध पैलूंचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. सिक्कीम राज्याच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्यानं आज गंगटोकमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सिक्कीमला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी राज्यातली संपर्क व्यवस्था सुधारण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

****

देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था अत्यावश्यक असून या माध्यमातून विकासाचे लाभ समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची गरज राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केली आहे. पिंपरी इथल्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात राष्ट्रीय कुलगुरू परिषदेचे उद्घाटन आज राज्यपालांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. उच्च शिक्षण संस्थांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे युवक घडवावेत, असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं.

****

अमली पदार्थांचा तस्कर मोहम्मद सलीम डोला याला आज पहाटे तुर्कस्तानातून भारतात परत आणण्यात आलं आहे. सलीम डोला हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक असून, गुप्तचर यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यानं त्याच्या प्रत्यार्पणाची कारवाई अंमलात आणली.

****

पंढरपूर कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आज सोलापूर इथं भारतीय जनता पक्षाच्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक सोलापूर अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र शासनानं वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, बार्शी इथं प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं.

****

मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष मोहीम राबवली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, ही घोषणा केली. परिवहन विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यावर ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठी प्रशिक्षणासाठी परिवहन विभाग एक समिती स्थापन करेल, ही समिती ज्यांना मराठीत संवाद साधता येत नाही त्यांची नोंद ठेवेल. तसंच ज्यांना मराठी शिकण्याची इच्छा आहे, त्यांना आरटीओ कार्यालयात जागा उपलब्ध करून दिली जाईल, असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

दरम्यान, अशा चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या, प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या, तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल, त्यांचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

****

राज्याचा सर्व शिफारशींसह स्वतंत्र बियाणे कायदा करण्याबाबत प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. नव्या कायद्यात बियाणे उत्पादक, प्रक्रिया केंद्र, वितरक, विक्रेते आणि रोपवाटिका यांची नोंदणी सक्तीची करण्याचा विचार आहे. शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि ब्रँडेड नाव न वापरता विक्री करणे, यासाठी कायदेशीर संरक्षण देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात येणार आहे.

****

खतांच्या वाढत्या किमती तात्काळ कमी करून त्यावर सबसिडी द्यावी, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते. खतांसंदर्भातल्या कथित गैरप्रकारांकडे सरकारने गांभीर्यानं लक्ष देऊन ‘लिंकिंग’ करणाऱ्या खत कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली आहे.

****

महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा यासाठी राज्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. समिती स्थापन न केल्यास पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड, पुनरावृत्ती झाल्यास दंडाच्या रकमेत वाढ किंवा परवाना रद्द करणे यासारखी कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, महिला आणि बाल विकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे. एखाद्या कार्यालयामध्ये अंतर्गत समितीबाबत माहिती दर्शवणारा फलक नसल्यास महिलांनी १ ८ १ या टोल-फ्री हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान पटकारवलं आहे. गेल्या वर्षात, अधिसूचित सेवांसाठी प्राप्त झालेल्या अर्जापैकी ९१ पूर्णांक ४० टक्के अर्जांचा विहित कालावधीत निपटारा केल्याब‌द्दल बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा आज मुंबईत विशेष सन्मान करण्यात आला. द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना सन्मानित करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज “सेवा हक्क दिन” साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी उपस्थितांना सेवेच्या बांधिलकीची शपथ देत, “लोकसेवा हीच खरी जबाबदारी” असल्याचा संदेश दिला. प्राप्त अर्जांपैकी ९० टक्क्यांहून अधिक अर्जांचा वेळेत निपटारा करणाऱ्या दहा अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं उन्हामुळे डोकेदुखी, पोटदुखी, अतिसार, थकवा यांसह विविध तक्रारींचे दररोज चारशेहून अधिक रुग्ण आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत आहेत. यामध्ये उष्माघाताचे रुग्ण नसल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितलं. नागरिकांनी वाढत्या उन्हापासून बचाव करावा, आणि उष्माघाताची लक्षणं दिसल्यास, तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असं आवाहन धानोरकर यांनी केलं आहे.

****

येत्या तीस तारखेला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतल्या लाभार्थ्यांसाठी कर्जवाटप आणि स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड शहरातल्या शंकरराव चव्हाण सभागृहात हा मेळावा होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...