Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27 April
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २७ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज एफटीए अर्थात मुक्त व्यापार
करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय संवादाच्या
मालिकेअंतर्गत काल आग्रा इथं महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे
व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकले सहभागी झाले होते. या संवादात चर्म आणि
पादत्राण उद्योग, आयुष, वैद्यकीय
उपकरणं यांसारख्या क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. पीयूष गोयल यांनी
शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रातल्या संधींबाबत भाष्य करत, भारतीय
विद्यार्थ्यांनी आणि व्यावसायिकांनी या नव्या संधींचा लाभ घ्यावा, असं आवाहन केलं. तसंच या कराराचा लाभ सर्व एमएसएमई आणि लघु उद्योगांपर्यंत
पोहोचवण्यासाठी उद्योग मंडळांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असंही
त्यांनी सांगितलं.
****
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या
टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.
भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्थ २४
परगणा जिल्ह्यात प्रचारसभा घेतली. निवडून आल्यास महिला, बेरोजगार
युवांना दर महिन्याला ३ हजार रुपये, तर गर्भवती महिलांना २१
हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा भाजप नेते अमित शहा यांनी तेहट्टा इथल्या
प्रचारसभेत केली. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या
भवानीपूर या त्यांच्या मतदारसंघात विविध कार्यक्रम घेत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेच्या
दुसऱ्या टप्प्याचं मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. मतमोजणी केरळ, तमिळनाडू,
आसाम, पुदुचेरी यांच्यासह चार मे
रोजी होणार आहे.
****
देशाच्या काही भागांमध्ये हवामानविषयक आव्हाने असूनही
भारतातील गहू उत्पादन स्थिर असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. कृषी आणि शेतकरी
कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२५–२६
या वर्षात सुमारे तीन कोटी ३४ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर गव्हाची पेरणी
करण्यात आली आहे. हे क्षेत्रफळ मागील वर्षांच्या तुलनेत स्थिर असून, उत्पादन क्षमतेसाठी सकारात्मक मानलं जात आहे. हवामान बदलाशी सुसंगत, प्रगत आणि रोगप्रतिरोधक वाणांच्या वापरामुळे पिकांची उपज क्षमता अधिक मजबूत
झाली आहे. तसंच कीड किंवा रोगामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याचे कोणतेही अहवाल
प्राप्त झालेले नाहीत. वाढीव पेरणी क्षेत्र आणि सुधारित वाणांच्या वापरामुळे
राष्ट्रीय पातळीवर गव्हाचे उत्पादन स्थिर राहण्यास मदत होणार असल्याचं मंत्रालयाने
म्हटलं आहे.
****
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाच्या मिसिंग
लिंक प्रकल्पाचं ९९ टक्के काम पूर्ण झालं असून, येत्या
एक मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन
होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन
पाहणी केली. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन
प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार
असल्यानं अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. अत्यंत
आव्हानात्मक असलेला हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळानं पूर्णत्वाला नेल्याचं
त्यांनी नमूद केलं. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक
पूर्णपणे टाळता येणार असून, प्रवासाचा वेळ सुमारे २० ते
३० मिनिटांनी कमी होईल. सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसेसला प्राधान्य
देण्यात येणार असून, त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या
प्रमाणात कमी होईल. मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाला तरीही पथकरात सध्या कोणतीही वाढ
प्रस्तावित नसल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेनं महाबळेश्वर
इथल्या अति उंचीवरच्या प्रयोगशाळेत अत्याधुनिक एक्स बँड ड्युअल-पोलरायझेशन डॉप्लर
वेदर रडार कार्यान्वित केलं. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन
यांच्या हस्ते काल या रडारचं उद्घाटन झालं. मिशन मौसम अंतर्गत कार्यान्वित करण्यात
आलेली ही रडार प्रणाली पाऊस, ढग आणि वादळाचा अंदाज
वर्तवण्यासाठी सतत कार्यरत असेल. या प्रणालीमुळे पुणे, सातारा, कोकण आणि मुंबईच्या काही भागांसाठी तातडीचा अंदाज वर्तवण्याची क्षमता आणखी
वाढणार आहे.
****
इजिप्तमधल्या कैरो इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ कनिष्ठ
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपलं वर्चस्व
कायम ठेवलं आहे. पुरुषांच्या कनिष्ठ गटात ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स प्रकारात
भारतीय नेमबाज हेमंत बर्मन यांनी दमदार खेळी करत रौप्य पदक पटकावलं. या यशामुळे
भारताची एकूण पदकसंख्या १५ वर पोहोचली असून, त्यामध्ये
पाच सुवर्ण,
सहा रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे.
****
देशाच्या अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची तीव्र लाट असून, जगात सर्वाधिक तापमानाची नोंद करणाऱ्या १०० शहरांमध्ये भारतातल्या ९५ शहरांचा
समावेश आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये तापमानानं ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला
असून,
काही ठिकाणी ते ४५ अंश सेल्सिअसच्याही जवळ पोहोचलं आहे.
दिल्ली,
उत्तर प्रदेशात लखनौ, महाराष्ट्रात
नागपूर आणि अकोला, ओडिशामध्ये भुवनेश्वर, आणि मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरांमधलं तापमान सामान्य पातळीच्या खूप वर
पोहोचलं आहे.
****
No comments:
Post a Comment