Sunday, 12 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता

****

केंद्र सरकारने डीजेलच्या निर्यात शुल्कात वाढ केली आहे. हे शुल्क आता प्रतिलीटर साडे २१ रुपयांवरून साडे ५५ रुपये करण्यात आलं आहे. विमान इंधनाचं निर्यात शुल्कही साडे २९ रुपये प्रतिलीटर वरून ४२ रुपये प्रतिलीटर करण्यात आलं आहे. पेट्रोलच्या निर्यात शुल्क सध्या जैसे थे ठेवण्यात आलं आहे. यामुळे इंधनाच्या देशांतर्गत पुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

****

देशातल्या पाइप नॅचरल गॅस-पीएनजीच्या ग्राहकांमध्ये ४ लाख १५ हजारांनी वाढ झाली आहे. याशिवाय साडे ४ लाखांहून अधिक ग्राहकांनी यासाठी नोंदणी केल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. दरम्यान, गेल्या २३ मार्चपासून पाच किलो वजनाचे घरगुती वापराचे १२ लाखांहून अधिक एल पी जी सिलेंडर विकल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

****

अशियाई वरिष्ठ गट कुस्ती विजेतेपद स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाइल प्रकारात भारतानं दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. सुजीत कलकल याने पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारातील अंतिम सामना उझबेकिस्तानच्या उमिदजोन जलोलोव्हविरुद्ध ८-१ ने जिंकला. तर, अभिमन्यू मंडवालने पुरुषांच्या ७० किलो फ्रीस्टाइल अंतिम सामन्यात मंगोलियाच्या तुल्गा तुमुर ओचिरचा ५-३ असा पराभव केला. तसंच, पुरुषांच्या ७९ किलो गटाच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात संदीप मान पराभूत झाल्यानं त्याची सुवर्णपदकांची हॅटट्रिक हुकली.

स्पर्धेत यापूर्वीच, अंकुशनं पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकारात कांस्यपदक पटकावले. यासह, भारताच्या पदकतालिकेत एकूण दोन सुवर्ण, चार रौप्य आणि आठ कांस्य अशी १४ पदकांची भर पडली आहे. याचसोबत स्पर्धेच्या अंतिम दिवशी अजुनही भारताला दोन पदकं जिंकण्याची संधी आहे.

****

धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात ‘अभ्यास अभिवादन’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. परिचारिका विभागाच्या विद्यार्थ्यांनी तब्बल बारा तास सलग अभ्यास करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त या महामानवाला अभिवादन केलं.

****

नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं काल सहाव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचं उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते झालं. यावेळी, संमेलनाध्यक्ष म्हणून सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर उपस्थित होते. संमेलनाची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडीने झाली.

****

राज्यातील शून्य ते सात वर्षे वयोगटातील १२ ते १४ टक्के बालकांना अजूनही आधारकार्ड मिळालेले नाही. त्यासाठी आधार केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन घरपोच आधारकार्ड देण्याची सुविधा लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं काल आधार संच वाटप आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकांसोबतच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड बनविण्याचा धोका आधार केंद्र चालकांनी लक्षात घेऊन सजग राहून काम करावं असं आवाहनही शेलार यांनी यावेळी बोलतांना केलं.

****

जनगणनेद्वारे गोळा होणारी माहिती ही राष्ट्रनिर्मितीचा आधार असून यावरच विकास योजना, धोरणनिर्मिती, कल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधांचे नियोजन ठरवले जाते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मे आणि जून २०२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केलं आहे. नांदेड येथे जनगणना फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

****

नांदेडच्या विष्णुपुरी येथे शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत तिसरा टप्पा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास मतदारसंघाचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी उपस्थित राहून विविध विभागांच्या दालनांना भेटी दिल्या. त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून संबंधित विभागांना त्या तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना केल्या. तहसील कार्यालयामार्फत विविध प्रमाणपत्रे विहित मुदतीत दिली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करत, एकाच ठिकाणी नागरिकांना उत्तम सेवा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

****

राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. काल सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंशांवर गेलं होतं. येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

अमेरिका आणि ईराण यांच्यातली चर्चा कोणत्याही निर्णयाविना संपुष्टात आली. पाकिस्तानातल्या इस्लामाबाद इथं ही चर्चा सुरू होती. ईराणकडून अण्वस्त्र तयार न करण्याच्या दीर्घकालीन आश्वासनाच्या मुद्यावर मतभेद असल्याचं, अमेरिकेकडून सांगण्यात आलं. दरम्यान, ईराण अण्वस्त्र तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याच्या कारणावरूनच आपण त्याच्याविरुद्ध कारवाई केल्याचं इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...