Wednesday, 8 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      महावितरण कंपनीचं विभाजन; कृषी ग्राहकांना वीज वितरणासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

·      राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत वितरीत

·      राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

·      स्थलांतरित कामगारांसाठीच्या पाच किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडर्सचं दैनिक वाटप दुप्पट करण्याचा निर्णय

आणि

·      छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाची विशेष मोहीम, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

****

राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महावितरण, या कंपनीचं कृषी सेवा आणि बिगर कृषी सेवा, अशा दोन कंपन्यांमध्ये विभाजन करण्यास काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यातली बिगर कृषी क्षेत्रातली वीज वितरण कंपनी, भांडवली बाजारात सुचिबद्ध करण्यासाठी आयपीओ आणण्यास, तसंच कृषी वितरण कंपनीला सुरुवातीचं भांडवल म्हणून अडीच हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यालाही यावेळी मान्यता देण्यात आली. महावितरणवरचा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी पंधरा वर्ष मुदतीचे सरकारी रोखे जारी करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, हा नवा आणि स्वतंत्र विभाग स्थापन करणं, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन केंद्राची एक कंपनी म्हणून स्थापना करणं, तसंच महाराष्ट्र रेझिलिएंट डेवलपमेन्ट प्रोग्रॅम-अर्थात महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

यावर्षी जानेवारी ते एप्रिल या काळात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती काल मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. मागच्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी १२८ कोटी ६५ लाख रुपये देण्यात आल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.

जुलै २०२२ पासून जलसंपदा विभागाचे एक्केचाळीस प्रकल्प पूर्ण झाले, या प्रकल्पांमुळे अतिरिक्त दोन लाख पंचाण्णव हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण झाल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.

****

राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव‘, या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंढरपूर इथल्या आरोग्य उपकेंद्रात काल जागतिक आरोग्य दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी, रक्तदाब, मधुमेह नियंत्रण, सुदृढ जीवनशैली, पोषण आणि संतुलित आहार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. महानगरपालिकेच्या वतीनं सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून, गरजूंना आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

**

धाराशिव इथं जिल्हा परिषदेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत आरोग्य सेवांचा सर्वांगीण आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवून आरोग्य दिवस साजरा करण्यात आला.

****

राज्यांमधल्या स्थलांतरित कामगारांना वितरीत केल्या जाणाऱ्या पाच किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडर्सचं दैनिक वाटप दुप्पट करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. गेल्या महिन्यातील दोन आणि तीन मार्च रोजी खुल्या बाजारात पुरवठा केलेल्या अशा सिलिंडरची संख्या, हा कोटा दुप्पट करण्यासाठी आधार मानली जाईल.

दुर्गम गावांतून शिक्षण किंवा कामासाठी शहरांमध्ये आलेले विद्यार्थी, स्थलांतरित कामगार, तसंच शहरांमध्ये तात्पुरते वास्तव्य करणारे रहिवासी, पत्त्याचा पुरावा देण्याऐवजी, फक्त आपलं वैध ओळखपत्र दाखवून हे छोटं सिलिंडर मिळवू शकतात.

****

शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त काल देशभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं सिंधी कॉलनीत गुरु तेग बहादूर जयंतीनिमित्त आयोजित अखंड पाठाची काल समाप्ती झाली. यावेळी गुरुबानीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या ठिकाणच्या भव्य लंगरचा भाविकांनी लाभ घेतला.

****

नागपूर शहरात सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरात मेट्रो स्टेशनच्या जवळ काल जिवंत स्फोटकांचा साठा आढळला. एका रहिवाशाने संशयास्पद बॅगची पोलिसांकडे तक्रार केली, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह पोलिसांनी तातडीनं या ठिकाणी दाखल होत, बॅगची तपासणी केली असता, त्यात, जिलेटीनच्या १५ कांड्या, ५८ डिटोनेटर आणि ८ कनेक्टर आढळून आले. ही बॅग गेल्या एक ते दीड महिन्यांपासून या परिसरात पडून होती. पोलिसांनी ही स्फोटकं तातडीने सुरक्षित स्थळी हलवली. या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं काल शहरातल्या काही भागांत विशेष पाहणी मोहीम राबवली. कचऱ्याचं योग्य वर्गीकरण न करता तो रस्तावर टाकला जात असल्याचं, तसंच कचरा नियमांचं उल्लंघन होत असल्याचं यावेळी निदर्शनास आलं. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान एकूण तेरा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. प्राप्त झालेल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यातल्या कावलगुडा इथं भवानी माता मंदिरावर आंबील आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमात आंबीलमधून २०० हून अधिक जणांना विषबाधा झाली. या सर्व रुग्णांना उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सात जणांना नांदेडला हलवण्यात आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी सांगितलं. आंबिलासाठी वापरण्यात आलेल्या दहीच्या माध्यमातून ही विषबाधा झाल्याचा प्रार्थमिक अंदाज आहे.

****

समृद्धी महामार्गावर काल दुपारी जालना नजिक एका टँकरमधून धोकादायक रसायन गळतीची घटना घडली. सुरक्षेसाठी या रस्त्यावरची वाहतूक थांबवून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. गळती झालेलं रसायन निष्प्रभ करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे मोठा अनर्थ टळला. सायंकाळनंतर महामार्गावरील वाहतुकही पूर्ववत करण्यात आली.

****

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव इथं आजपासून १४ एप्रिलपर्यंत सामाजिक समता सप्ताह राबवण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध जनजागृतीपर कार्यक्रम, व्याख्यानं, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, तसंच विशेष उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

**

हिंगोली जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व नियम पाळून, शांततेत साजरी करावी. तसंच डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्य, व्याख्यानमाला, समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरी करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. काल झालेल्या शांतता समिती बैठकीत ते बोलत होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बिडकीन ग्रामीण रुग्णालयातल्या लाचखोर वैद्यकीय अधीक्षक आणि त्याच्या साथीदाराला काल अटक करण्यात आली. डॉ विजय दळवी असं या अधीक्षकाचं नाव असून, त्याने नारायण ब्राह्मणे या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याच्या मार्फत शासकीय योजनेतून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी सहा हजार रुपये लाच मागितली होती. या दोघांविरोधात बिडकीन पोलिस ठाण्यास गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

परभणी जिल्ह्यातली जलजीवन मिशनची अपूर्ण कामं पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पालम आणि गंगाखेड तालुक्यातली टंचाई निवारणासाठी दुरुस्तीची कामं प्राधान्यानं करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

****

नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी सनदी लेखापाल डॉ प्रवीण पाटील यांची तर उपाध्यक्षपदी विधीज्ञ प्रफुल्ल अग्रवाल यांची निवड झाली आहे. डॉ पाटील यांनी याच संस्थेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं, संस्थेच्या विद्यार्थ्याची अध्यक्षपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. विद्यापीठाशी संलग्नित बीड, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या २४० परीक्षा केंद्रावर दोन लाख ८२ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.

****

हवामान

मराठवाड्यात लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यात उद्या नऊ एप्रिलला तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विभागात उर्वरित जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडं राहील. सुमारे ४८ तासांनंतर विभागात तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 08 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 08 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...