Friday, 10 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 10 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० एप्रिल २०२ सकाळी.०० वाजता

****

शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी या संकल्पनेनुसार आज ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ साजरा केला जात आहे. होमिओपॅथी या उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनेमान यांच्या जयंती दिनी हा दिवस साजरा केला जातो. केंद्र सरकार आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून होमिओपॅथी अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. शिक्षण, संशोधन, उपचार सुविधा आणि सार्वजनिक आरोग्यात होमिओपॅथीचा वापर वाढवणं, हा या सर्व उपक्रमांचा मुख्य हेतू आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी हरिवंश यांची नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती केली आहे. नामनिर्देशित सदस्याच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली रिक्त जागा भरण्यासाठी संविधानातील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

दूरदर्शनने नवी दिल्लीत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या भागीदारीचा उद्देश दूरदर्शनच्या दूरचित्रवाणी, रेडिओ आणि डिजिटल अशा विस्तृत परिसंस्थेचा उपयोग करून परिषदेच्या सांस्कृतिक आशयाची पोहोच वाढवणं हा असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटलं आहे. या करारानुसार, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक सामग्री आणि कार्यक्रमांचं प्रसारण दूरदर्शनच्या विविध माध्यमांवर केलं जाणार आहे.

****

आंध्र प्रदेशात काल अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमित बरदार यांच्यासमोर पाच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे नक्षलवादी यापूर्वी दक्षिण बस्तरमध्ये कार्यरत होते आणि ते हिडमा गटासोबत काम करणाऱ्या पीएलजीएचा भाग होते. आंध्रप्रदेश-तेलंगणा सीमेवर झालेल्या अनेक स्फोटांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता.

****

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी नागपूर इथल्या एम्स, बालरोग विभागासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत राज्यातल्या जिल्हा रुग्णालयांमध्ये चाइल्डहूड एन सी डी क्लिनिक्स स्थापन आणि कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून विविध आजारांचे प्रतिबंध, लवकर निदान आणि प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यात येणार आहेत. तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, मानकीकृत उपचार पद्धती, डेटा संकलन प्रणाली आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जाणार आहे. 

****

भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या सन्मानार्थ मुंबईत वानखेडे मैदानावरच्या एका स्टँड आणि तीन प्रवेशद्वारांना त्यांच्या नावांनी गौरवण्यात आलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रवी शास्त्री स्टँड, दिलीप सरदेसाई गेट, डायना एडुलजी गेट आणि एकनाथ सोलकर गेट यांचं अनावरण करण्यात आलं. राज्य सरकार मुंबई क्रिकेटला सर्वतोपरी सहकार्य करेल तसंच मैदानांच्या भाडेपट्ट्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जातील, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भविष्यात मुंबईत ६० ते ८० हजार प्रेक्षक क्षमतेचं आधुनिक स्टेडियम उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली.

****

जालना तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरे आज राबवण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणं निकाली काढणं, जमीन महसूल संहितेअंतर्गत नोंदी अद्ययावत करणं तसंच डिजिटल सेवा पोर्टलवरील अर्जांचा निपटारा करण्यात येणार आहे.

****

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ९ एप्रिल हा शौर्य दिन काल लातूर इथं साजरा करण्यात आला. १९६५ च्या भारत–पाक युद्धात, नऊ एप्रिल रोजी सलग १२ तास चाललेल्या चकमकीत भारताच्या निमलष्करी दलाने पाकिस्तानी लष्कराच्या मोठ्या तुकडीला रोखून धरलं. याच शौर्याचं स्मरण म्हणून काल लातूरच्या रंगरूट प्रशिक्षण केंद्रात विशेष कार्यक्रम पार पडला.

****

धाराशिव इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक जीवनातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी प्रमुख नागरिक संगोष्ठी कार्यक्रम काल पार पडला. संघांचे सह सरकार्यवाह डॉ कृष्णगोपालजी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. नशामुक्त भारत संकल्प असून संस्कारमय पिढी घडवण्याची सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं.

****

मंगोलियात सुरू असलेल्या आशियायी मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाने १० पदकांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. यात चार सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे. पुरुष गटाची अंतिम फेरी आज होणार असून, त्यात  विश्वनाथ सुरेश आणि सचिन हे दोन भारतीय खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे भारताची या स्पर्धेतली दोन पदकं निश्चित झाली आहेत.

****

चीनमध्ये सुरु असलेल्या आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी गटात भारताच्या आयुष शेट्टी यानं तैवानच्या ची यु जेन याला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मात्र एच एस प्रणॉय तसंच पी व्ही सिंधू यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. मिश्र दुहेरीतही भारतीय संघ पराभूत झाला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 10 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...