Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13
April 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ एप्रिल २०२६ दुपारी १.००
वा.
****
स्वातंत्र्य लढ्यापासून ते संविधान सभेच्या सर्व निर्णयांपर्यंत
स्वतंत्र भारताचा पाया रचण्यात भारताच्या नारीशक्तीने अभूतपूर्व योगदान दिल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज नारी शक्ती वंदन संमेलनाला ते संबोधित
करत होते. नारी शक्ती वंदन अधिनियमावर चर्चा करुन ते पारीत करण्यासाठी येत्या १६ ते
१८ तारखेदरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन होणार असून, त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
लोकशाही संरचनेत महिलांना आरक्षण देण्याच्या आवश्यकतेवर
पंतप्रधानांनी यावेळी भर दिला. भारताच्या विकास यात्रेतल्या या महत्त्वाच्या क्षणांदरम्यान, देश २१व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या
दिशेने पुढे जात असल्याचं त्यांनी सांगितलं. याविषयी बोलताना ते म्हणाले -
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
संवाद, सहकार्य आणि सहभागाच्या माध्यमातून हे विधेयक मंजूर करण्याचा
सरकारचा प्रयत्न आणि प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ज्या प्रकारे हा कायदा
मंजूर झाला आणि संसदेची प्रतिष्ठा वाढली, त्याचप्रमाणे या वेळीही या कायद्यातल्या सुधारणा मंजूर होऊन, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून संसदेची प्रतिष्ठा नव्या
उंचीवर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना देशाच्या इतिहासातील
‘एक काळा दिवस’ म्हणून ओळखली जाते. १३ एप्रिल १९१९ रोजी घडलेल्या या घटनेला आज १०७
वर्ष पूर्ण झाली. पंजाब प्रांतातील जालियनवाला बागेत बैसाखी निमित्त जमलेल्या, शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचा लढा देणाऱ्या निष्पाप
भारतीयांवर ब्रिटिशांनी बेछूट गोळीबार केला होता. यात शेकडो भारतीयांना आपले प्राण
गमवावे लागले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
या हत्याकांडातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं आहे. या हुतात्म्यांनी दाखवलेलं धैर्य
आणि निर्धार हे भावी पिढ्यांना स्वातंत्र्य, न्याय आणि प्रतिष्ठा या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी सतत प्रेरणा
देत असल्याचं पंतप्रधानांनी अपल्या संदेशात नमूद केलं.
****
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज मुंबईत
शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यदर्शनासाठी
त्यांचे पार्थिव लोअर परळ इथल्या त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलं आहे. बॉलिवूड
आणि संगीत क्षेत्रातले अनेक दिग्गज कलाकार, गायक, संगीतकार, राजकीत नेते तसंच त्यांचे असंख्य चाहते आशा भोसले यांचे अंत्यदर्शन
घेत आहेत. आशा भोसले यांचं काल निधन झालं, त्या ९२ वर्षांच्या होत्या.
****
राज्यातल्या गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या
रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी
आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची
प्रक्रिया कार्यालयीन आठ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट
कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला
कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. या प्रणालीचं येत्या काही दिवसातच उद्घाटन
करण्यात येणार असल्याच माहिती, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाकडून
देण्यात आली.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई–केवायसी करून
देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचं निदर्शनास आलं असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी
केलं आहे. या योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे, मात्र ई–केवायसी करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त
करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रक्रियेसाठी
कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून, महिला मोबाईलवरून स्वतः ई–केवायसी करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी
सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती तटकरे यांनी दिली.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उद्या साजरी होत
आहे. यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे छत्रपती
संभाजीनगर शहरात आज आणि उद्या वाहतुकीत बदल केले आहेत. महावीर चौक ते अमरप्रीत चौक, गोपाल टी पॉइंट ते सिटी चौक आणि भडकल गेट, मिल कॉर्नर ते सीटी क्लब हे मार्ग उद्या पूर्ण बंद राहणार
असल्याचं वाहतूक विभागाने कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment